कोल्हापूर, 12 जानेवारी : नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे, मकर संक्रांत. मकरसंक्रांतीच्या आधीचा दिवस ‘भोगी’ म्हणून साजरा केला जातो. संक्रांती प्रमाणेच वेगवेगळ्या ठिकाणी भोगीला देखील वेगवेगळी नावे आहेत. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ असे वयोवृध्दांच्या तोंडून या सणाबद्दल बऱ्याच जणांनी ऐकले असेल. या भोगीदिवशी बनवण्यात येणाऱ्या भाजीला देखील एक विशेष महत्त्व आहे. भोगीच्या दिवशी सकाळच्या वेळी महिला वर्गात मोठी गडबड असते. कारण या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टिक पदार्थ तयार करण्यात येतात. यावेळी भोगीची भाजी ही विविध प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्यात तीळ टाकून चविष्ट भाजी बनवली जाते. वेगवेगळ्या प्रांतात या भाजीला वेगवेगळी नावे आहेत. खरंतर या दिवशी प्रत्येक ठिकाणी तिळाचा वापर केला जातो, असे मंदाकिनी पाटील या गृहिणीने सांगितले. त्यांनी ही भोगीची भाजी कशी बनवतात हे देखील सांगितले आहे. संक्रांतीला बनवा पराठ्यासारखे दिसणारे गोड आणि तिखट वडे, पाहा Recipe Video का साजरी करतात भोगी ? माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी हा सण साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी देवराज इंद्र यांची मनोभावे पूजा करण्यात येते. यादिवशी करण्यात येणाऱ्या पुजेमागे अशी मान्यता आहे की, त्यांच्याकडुन आपल्या शेतात भरपूर प्रमाणात पिक बहरावे यासाठी भोगी दिवशी कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना केली जाते. भोगीच्या भाजीत प्रामुख्याने वांगे, पावटा, घेवडा, हरभरा, गाजर, शेंगदाणा, हिरवा वाटाणा, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात. तर कांद्याची पात, चाकवत, मेथी आदी भाज्या भोगीच्या भाजीसोबत वेगळ्या बनवल्या जातात, असे मंदाकिनी पाटील यांनी सांगितले आहे. भोगीच्या भाजीचं साहित्य तेल, मोहरी, जिरे, तीळ, आले-लसुण पेस्ट, हळद, हिंग, लाल तिखट (साधी बिना मसाल्याची चटणी), वांगे, पावटा, घेवडा, हरभरा, गाजर, काच्चे शेंगदाणे, हिरवा वाटाणा, फ्लॉवर, टोमॅटो, शेंगदाण्याचे कूट, कोर्ट्याचे कूट, कांदा-लसूण मसाला चटणी, मीठ
कशी करतात भाजी? 1) सुरुवातीला एका भांड्यात थोड तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, जिरे, आणि तीळ टाकावे. तीळ आणि मोहरी चांगली तडतडू द्यावी. 2) त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आले-लसूण पेस्ट टाकावी. ती तेलात थोडी भाजून घ्यावी. 3) यामध्ये एक चमचा हळद आणि थोडीशी हिंग पावडर टाकावी. 4) या नंतर विना मसाल्याचे लाल तिखट टाकावे. यामुळे भाजीला छान रंग येण्यास मदत होते. 5) आता सर्व धुवून घेतलेल्या भाज्या (वांगे, पावटा, घेवडा, हरभरा, गाजर, हिरवा वाटाणा, फ्लॉवर, टोमॅटो) एकेक करून टाकाव्यात. एकेक भाजी टाकताना मिश्रण हलवत रहावे आणि गॅस मध्यम आचेवर ठेवावा. Makar Sankrant : पिवळ्या रंगाच्या बांगडीला महिला हात न लावण्याचं कारण काय? 6) सर्व मिश्रण २ मिनिट परतून झाल्यावर त्यावर कच्चे शेंगदाणे टाकावेत. 7) टाकण्यात आलेल्या सर्व भाज्या झाकण लावून वाफवून घ्याव्यात. 8) त्यानंतर त्यात आवडीनुसार शेंगदाणा कूट, कोर्ट्याचे कूट आणि कांदा-लसूण मसाला चटणी टाकावी आणि शेवटी चवीपुरते मीठ टाकावे. 9) भाजी एकजीव केल्यानंतर सगळे मसाले एकत्र झाले की आपल्याला भाजी सुकी हवी की पातळ यानुसार त्यामध्ये बाजूला गरम केलेले पाणी टाकायचे. 10) सर्व भाज्या शिजण्यासाठी भांड्याला ५-७ मिनिटे झाकण लावून मध्यम आचेवर ठेवावे. त्यानंतर ही भोगीची भाजी तयार आहे.