कोल्हापूर, 24 डिसेंबर : ख्रिसमसचा सण 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ख्रिसमस हा प्रभू येशूचा जन्मदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी, ख्रिश्चनांचा प्रभु मानल्या जाणार्या येशू ख्रिस्ताला प्रार्थना केली जाते आणि चर्च सजवल्या जातात आणि विविध समारंभांचे आयोजन देखील केले जाते. घरातील लहान मुलांची ख्रिसमसला वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा असते. म्हणूनच या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ लहान मुलांसाठी घरामध्ये आणले जातात. यापैकीच एक पदार्थ म्हणजे लहान मुलांना आवडणारे डोनट. पण हेच डोनट बाहेरून खरेदी न करता घरच्या घरी कसे बनवायचे याची सविस्तर रेसिपी सुनिता भोसले यांच्याकडून जाणून घेऊया. डोनट म्हणजे काय? डोनट हा एक गोड पदार्थ आहे थोडासा केक सारखा आणि थोडासा बिस्किट सारखा असा हा पदार्थ बरेच जण आवडीने खातात. मैदा पिठीसाखर अशा पद्धतीच्या घटकांचा मिळून तळून हा पदार्थ बनवला जातो. त्यामुळे बरेच दिवस हा पदार्थ चांगला राहू शकतो.
25 प्रकारच्या केक सोबत घ्या ख्रिसमसचा डबल आनंद, पाहा video
डोनट बनवण्यासाठी काय काय घटक लागतात ? डोनट बनवण्यासाठी लोणी, पिठीसाखर, अंडी, मैदा, इसेन्स वेलदोडे-इलायची पूड, दूध इत्यादी घटक लागतात. तर हे डोनट तळण्यासाठी काही प्रमाणात तेलाची देखील आवश्यकता आहे. काय आहे कृती (पाव किलो मैद्यापासून डोनट बनवताना)? 1. प्रथम 3 अंडी, 100 ग्रॅम लोणी आणि 100 ग्रॅम पिठीसाखर हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यावे. मिक्सर मधून जर हे फिरवून घेता आले तरी देखील चालते. 2. या फेटून घेतलेल्या मिश्रणात आपल्याला हवा तो इसेन्स 1 चमचा टाकावा. 3. त्यानंतर यामध्ये पाव किलो मैदा, 1 चमचा वेलदोडे-इलायची पूड टाकून हे पीठ नीट मळून घ्यावे. 4. पीठ मळताना ते नीट लाटता येईल अशा पद्धतीने मळून घ्यावे. त्यात थोडे दूध वापरू शकता. 5. पीठ मळून झाल्यावर ते किमान 1/2 तास झाकून ठेवावे. 6. अर्ध्या तासानंतर पीठाचे मोठे गोळे करून थोडे जाडसर लाटून घ्यावे. 7. लागलेल्या पीठाचे वाटीच्या साहाय्याने डोनट तयार करून घ्यावेत. (ज्या प्रमाणे उडीद वडा असतो त्याप्रमाणे आकार देणे.) 8. कढईमध्ये तेल गरम करून मंद आचेवर तपकिरी रंग येईपर्यंत हे डोनट तळून घ्यावेत. 9. थंड झाल्यानंतर खाण्यासाठी सर्व करावेत.

)







