मुंबई, 08 जून : त्वचेशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारचे घरगुती उपाय करून पाहतो. त्वचेच्या सौंदर्याचा विचार केला तर त्यासाठी बटाट्याचा रसही महत्त्वाची भूमिका बजावतो. बटाटा इतका लोकप्रिय आहे की, तो प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध आहे. स्कीन केअरसाठी देखील याचा वापर करता येतो. बटाट्याच्या रसाने चेहऱ्याला मसाज केल्यास त्वचेवरील काळे डाग कमी होतात. एवढेच नाही तर बटाट्याच्या रसात अंड्याचा पांढरा भाग मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची छिद्रे चांगली राहतात आणि आपण अधिक तरुण दिसतो. त्याचा कसा वापर (Potato Juice for Skin Care) करायचा ते जाणून घेऊया.
त्वचेला चमक येते -
आपल्या चेहऱ्यावर डाग पडले असतील आणि वृद्धत्वाचा प्रभाव दिसत असेल तर तुम्ही अर्धा बटाटा बारीक करून त्याचा रस काढा आणि त्यात दोन चमचे दूध मिसळा. हे मिश्रण कापसाच्या साहाय्याने चेहरा आणि मानेवर लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा याचा वापर केल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होतील आणि चेहरा तरुण दिसेल.
काळपट डाग जातील -
चेहऱ्यावर काळपट डाग जास्त दिसत असतील तर ते घालवण्यासाठी आपण बटाटा बारीक करून त्याचा रस दररोज 20 मिनिटे चेहऱ्यावर लावावा. मुरुमे-पिंपल्समुळे चेहऱ्यावर आलेले डाग कमी होतीलच, शिवाय काळे डागही फिके दिसू लागतात.
सुरकुत्या जातील -
सुरकुत्या म्हणजेच चेहऱ्यावर येणाऱ्या बारीक रेषांमुळे आपण वयाच्या अगोदरच वयस्क दिसू लागतो. सुरकुत्या घालवण्यासाठी पार्लरमध्ये उपचार आहेत, पण हे महागडे उपचार प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसतात. यावर सुरकुत्यांसाठी बटाट्याचा रस दररोज 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा. काही दिवसातच तुम्हाला फरक दिसू लागेल.
बटाटा आणि लिंबाचा रस -
बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस काढा आणि तो मिसळा, नंतर कापसाच्या मदतीने त्वचेवर लावा. 20 मिनिटांनी चेहरा धुवा. लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेसाठी सर्वोत्तम जीवनसत्त्वांपैकी एक मानले जाते. हे तुम्ही आठवड्यातून 3 वेळा चेहऱ्यावर लावू शकता.
हे वाचा - ही फळं 5 फ्रिजमध्ये ठेवायची चूक इथून पुढं तरी करू नका; पोषक घटक कमी होतात
बटाट्याचा रस आणि मुलतानी माती फेस मास्क -
मुलतानी माती आणि बटाट्याच्या रसामध्ये गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. असे आठवड्यातून दोनदा करू शकतो. आपल्याला पिंपल्सचा त्रास जास्त असेल तर चिमूटभर हळद घालून त्याचा वापर करू शकता.
हे वाचा - Monkeypox चं संक्रमण वेगानं, 'या' देशातल्या आकड्यानं वाढवली जगाची चिंता
टोनर म्हणून बटाट्याचा रस -
एक मध्यम आकाराचा बटाटा घ्या आणि त्याचा रस काढा. आता त्यात एक कप पाणी घालून स्प्रे बॉटलमध्ये ठेवा. टोनर म्हणून तुम्ही बटाट्याचा रस वापरू शकता. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा, परंतु 2 ते 3 दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवू नका.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.