नवी दिल्ली, 04 एप्रिल: पोस्ट ऑफिसमधील खातेधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला हे माहित असणं आवश्यक आहे की, पोस्ट ऑफिस (Post Office) मधील बचत खात्याशी संबंधित काही नियमात बदल झाला आहे. हे नवे नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू झाले आहेत. India Post Payment Bank ने आता पैसे काढणे, जमा कणे आणि AEPS (आधार आधारित पेमेंट सिस्टमवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात तुम्हाला पैसे जमा करणे आणि भरण्यासाठी देखील शुल्क द्यावे लागेल. जाणून घ्या कोणत्या खात्यांवर हे नियम लागू होणार आहेत.
बेसिक सेव्हिंग अकाउंटवर किती द्यावे लागणार शुल्क?
जर तुमचे बेसिक सेव्हिंग खाते आहे तर तुम्हाला 4 वेळा पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. त्यापेक्षा अधिक वेळा ट्रान्झॅक्शन करण्यासाठी 25 रुपये किंवा 0.5 टक्के शुल्क द्यावे लागेल. तर पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही आहे.
बचत आणि चालू खात्यावर किती द्यावे लागेल शुल्क?
जर तुमचे सेव्हिंग आणि करंट अकाउंट आहे तर दर महिन्याला तुम्ही 25000 रुपये पैसे काढू शकता. यापेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी 25 रुपये शुल्क द्यावे लागेल. तर 10 हजार रुपयांच्या कॅश डिपॉझिटवर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र त्यापेक्षा जास्त पैसे जमा करण्यासाठी कमीतकमी 25 रुपये शुल्क द्यावे लागेल.
(हे वाचा-सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! तांदूळ, तेल, डाळ, दूध महागलं; पाहा काय आहेत दर)
इंडिया पोस्ट AePS खात्यावर लागणारे शुल्क
याअंतर्गत आयपीपीबी नेटवर्कमध्ये येणाऱ्यांसाठी अमर्यादित ट्रान्झॅक्शन आहे. मात्र नॉन आयपीपीबीसाठी केवळ तीन वेळा मोफत ट्रान्झॅक्शन मिळेल. हा नियम मिनी स्टेटमेंट, पैसे काढणे आणि जमा करणे यासाठी आहे. ही मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला शुल्क द्यावे लागेल. याकरता तुम्हाला जमा रकमेवर 20 रुपये शुल्क आकारले जाईल.
मिनी स्टेटमेंटवर देखील आकारले जाईल शुल्क
याशिवाय ग्राहकांना जर मिनी स्टेटमेंट काढायचे असेल तर तुम्हाला 5 रुपये शुल्क द्यावे लागेल. जर तुम्ही मर्यादा संपल्यानंतर देखील आर्थिक व्यवहार करत असाल तर तुमच्या खात्यातून व्यवहाराच्या रकमेच्या 1 टक्के रक्कम कापली जाईल. ही रक्कम कमीत कमी 1 रुपया ते जास्तीत जास्त 25 रुपये असेल. या शुल्कावर जीएसटी आणि सेस देखील लावण्यात येईल.