वर्षभरात तांदूळ, डाळ, पीठ, तेल, चहा-पावडर, मीठ या वस्तूंचे दर इतके वाढले आहेत की किचनचं बजेट कोलमडलं आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार नवे दर काय आहेत ते पाहुयात.
तांदूळ - भारतीयांच्या जेवणातील अविभाज्य घटक म्हणजे भात. आणि हाच भात आता महागणार आहे. तांदळाचे दर हे 14.65 टक्क्यांनी वाढले आहेत.
खाद्य तेल- कोणताही पदार्थ करायचा म्हटलं तर तेलाशिवाय काहीच होत नाही. हेच खाद्य तेल आता महागलं आहे. जवळपास सगळ्याच प्रकारची खाद्यतेलं महागली आहेत. पाम तेल 87 रुपयांवरून 121 रुपये, सूर्यफूल तेल 106 वरून 157, वनस्पती तेल 88 वरून 121 आणि तीळ तेल 117 वरून 151 रुपये प्रति लीटर वर पोहोचलं आहे. तर शेंग तेल 139 वरून 165 आणि सोया तेल 99 वरून 133 रुपये लीटर झालं आहे.
गहू पीठ - रोजच्या जेवणातील चपाती म्हणजेच गव्हाचं पीठही महागलं आहे. गव्हाच्या पिठाचे दर 3.26 टक्के वाढले आहेत.
डाळी - किचनमधील डाळींचे भावही वाढले आहेत. तूर डाळ 91 रुपये किलो वरून 106 रुपये, उडीद डाळ 99 वरून 109, मसूर डाळ 68 वरून 80 रुपये प्रति किलो वर पोहोचली आहे. मूग डाळसुद्धा 103 वरून 105 रुपये किलो झाली आहे.
दूध - इतर जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच दुधाचे दरही वाढले आहेत. दुधाच्या किमतीत 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
चहा पावडर - भारतीयांची सकाळ, संध्याकाळ ज्याने सुरू होते तो चहादेखील महागला आहे. चहा पावडरचे दर तब्बल 29 पटींनी वाढले आहेत. तर एकाच वर्षात दर 217 रुपयांवरून 281 रुपये किलोवर पोहोचले आहेत.