नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी : हाड हा आपल्या शरीरातील मजबूत असा भाग आहे. एखादा मोठा धक्का लागला तरच हाड मोडतं पण तुम्हाला माहिती आहे का साधी शिंक आणि खोकलाही हाडं मोडण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. असं तेव्हाच होऊ शकतं, जेव्हा तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis) असेल. ऑस्टिओपोरोसिस हा असा एक आजार आहे जो हाडं कमकुवत करतो. निरोगी हाडामध्ये मधमाशीच्या पोळ्यासारखी लहान लहान छिद्रं असतात. या आजारात या छिद्रांचा आकार वाढतो. म्हणजेच, हाडांची घनता कमी होते, परिणामी हाडं पातळ आणि कमकुवत होतात आणि हाडं मोडण्याचा (Bone Fracture) धोका वाढतो. हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. पण वृद्ध आणि स्त्रियांमध्ये याची शक्यता अधिक असते. हेल्थलाइनमध्ये (Healthline) प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अमेरिकेत (USA) सुमारे 53 दशलक्ष लोक या आजाराशी झुंज देत असून, बर्याच लोकांना हा आजार होण्याचा धोका जास्त आहे. ऑस्टिओपोरोसिस झाला असेल तर दररोजच्या कामकाजादरम्यानदेखील बरगड्या, हिप, मनगट आणि पाठीच्या मणक्याची हाडं मोडण्याचा धोका अधिक असतो. ऑस्टिओपोरोसिसची लक्षणं या आजाराची सुरुवातीला हाडांशी संबंधित अशी कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळत नाहीत. पण तुमच्या हिरड्यांना त्रास होत असेल, हाताची पकड कमकुवत होत असेल, नखं तुटत असतील किंवा आपल्या कुटुंबातील कोणाला आधी ऑस्टिओपोरोसिस झालेला असेल, तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधणं आवश्यक आहे. ऑस्टिओपोरोसिसवर वेळेवर उपचार केले नाहीत तर तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो. ऑस्टिओपोरोसिसची कारणं ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढण्यामागे बरेच घटक कारणीभूत ठरतात. त्यापैकी वाढतं वय आणि रजोनिवृत्ती हे सर्वात मोठे घटक आहेत. साधारण वयाच्या तिशीनंतर, वय वाढतं तसं हाडांची घनता कमी होते आणि हाडं कमकुवत होऊ लागतात आणि हाडं मोडण्याची शक्यता निर्माण होते. 45 ते 55 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये रजोनिवृत्ती सुरू होते तेव्हा हार्मोन्स बदलतात. यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त वाढते. पुरुषांमध्ये फ्रॅक्चर होत नाही असं नाही. पण पुरुष 65 ते 70 वर्षे वयाचे होतात तेव्हा त्यांना फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते. हे वाचा - सावधान! वजन कमी करण्यासाठी चुकूनही करून नका 10 विचित्र उपाय ऑस्टिओपोरोसिसच्या जोखमीच्या घटकांमध्ये अयोग्य पोषण, धूम्रपान, कमी वजन, ऑस्टिओपोरोसिसचा कौटुंबिक इतिहास आणि कमी शारीरिक हालचाली थोडक्यात व्यायामाचा अभाव अशा अनेक घटकांचाही समावेश आहे. काय काळजी घ्याल? ऑस्टिओपोरोसिसवर निश्चित असा कोणताही इलाज नाही. पण काही गोष्टींची काळजी घेतली तर हाडं मोडण्याचा धोका कमी करता येतो. हाडं निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या रोजच्या आहारात काही पौष्टिक पदार्थांचा समावेश केला पाहिजे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी. आपल्या आहारात प्रथिनं, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ‘के’ आणि लोहाचा समावेश करा. वजन वाढवण्यासाठी व्यायाम करा. धूम्रपान करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.