मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

PCOS समस्या टाळण्यासाठी आहार कसा असावा?

PCOS समस्या टाळण्यासाठी आहार कसा असावा?

पीसीओएस

पीसीओएस

पीसीओडी हा संप्रेरकांच्या असंतुलनामुळे निर्माण होणारा आजार आहे, तर पीसीओएस हा एंडोक्राइन संस्थेचा आजार आहे. पीसीओएसची समस्या असलेल्यांनी काय खावं व काय खाऊ नये, याबाबतची माहिती घेऊ या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 सप्टेंबर :  पीसीओएस अर्थात पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही आनुवंशिक, संप्रेरकांशी आणि चयापचयाशी निगडित असलेली प्रजनन क्षमतेबाबतची एक समस्या आहे. अनेक महिला व मुलींना या समस्येला सामोरं जावं लागतं. लठ्ठपणा, टाइप 2 डायबेटीस, हृदयरोग, एंडोमेट्रिअल कर्करोग अशा आजारांचं एक कारण पीसीओएस हेही आहे. सप्टेंबर महिना पीसीओएसच्या जनजागृतीसाठीचा महिना म्हणून ओळखला जातो. यात महिला, मुली व इतर सर्वांना पीसीओएसबाबत माहिती दिली जाते. पीसीओएसचे परिणाम भोगत असलेल्या रुग्णांचं आयुष्य सुरळीत करणं आणि डायबेटीस, हृदयरोग, कर्करोग, आतड्याच्या आजारांपासून त्यांची सुटका करणं हा या मोहिमेचा महत्त्वाचा भाग असतो. पीसीओडी हा संप्रेरकांच्या असंतुलनामुळे निर्माण होणारा आजार आहे, तर पीसीओएस हा एंडोक्राइन संस्थेचा आजार आहे. पीसीओएसची समस्या असलेल्यांनी काय खावं व काय खाऊ नये, याबाबतची माहिती घेऊ या.

पीसीओएसमध्ये आहाराचा संप्रेरकांवर कसा परिणाम होतो?

पीसीओएस ही संप्रेरकांची समस्या आहे. यात अँड्रोजेन हे प्रजननाशी निगडित संप्रेरक आणि एंडोक्राइन संप्रेरकं अर्थात इन्सुलिन या दोन संप्रेरकांचा समावेश असतो. अँड्रोजेन अधिक प्रमाणात स्रवलं, तर चेहऱ्यावरचे किंवा शरीरावरचे केस वाढतात. याला हिर्सुटिझम असं म्हणतात. इन्सुलिन अधिक स्रवलं, तर त्यामुळेही अँड्रोजेन हे पुरुष संप्रेरक अधिक तयार होतं.

हेही वाचा - ‘एंझायटी अ‍ॅटॅक’ का येतो?; जाणून घ्या त्याची कारणं, लक्षणं आणि उपचार

पीसीओएसमधल्या आहाराबाबत पाहिलं, तर मूळ असंतुलन इन्सुलीनला विरोध करण्याबाबतचं असतं. त्याचा आहारावर थेट परिणाम होतो. “शरीरातल्या पेशी इन्सुलीनच्या कार्याला विरोध करतात. त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी वाढू शकते. ही वाढलेली साखर कमी करण्यासाठी शरीर पुन्हा इन्सुलीन तयार करतं. यामुळे हायपरइन्सुलिनेमिया होतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी आहाराचं पथ्य काटेकोरपणे सांभाळलं पाहिजे. त्यांनी कर्बोदकं आणि साखरेचं सेवन कमी करावं. त्यामुळे इन्सुलीनला होणारा विरोध कमी होईल,” असं नवी दिल्लीच्या मॅक्स हेल्थकेअरमधल्या रीजनल हेड व आहारतज्ज्ञ रितिका समाद्दार यांचं म्हणणं आहे.

इन्सुलीन, जीआयपी आणि जीएलपी-1 या संप्रेरकांवर आहाराचा (विशेषतः रिफाइन्ड पिष्टमय पदार्थ) थेट प्रभाव पडत असतो. “काही पदार्थांच्या सेवनामुळे आतड्यातून जीआयपी आणि जीएलपी-1 हा संप्रेरकं स्रवतात. ती पॅनक्रिआजमधून इन्सुलीनच्या स्रवण्यासाठी मदत करतात. हायपरइन्सुलिनेमियामुळे अंडाशयातलं अँड्रोजेनचं प्रमाण वाढतं व त्यामुळे पीसीओएस समस्या निर्माण होते,” असं आहार व वेलनेस सल्लागार शीला कृष्णस्वामी यांचं म्हणणं आहे.

पीसीओएसमध्ये काय खावं? काय टाळावं?

पीसीओएस झालेल्यांनी त्यांचं वजन वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. बीएमआय अर्थात बॉडी मास इंडेक्स 21/23 kg/m2 राहील असं पाहावं. म्हणजेच वजन जास्त असणाऱ्या प्रत्येकानं वजन कमी करण्याकरिता आहार सांभाळला पाहिजे. त्यामुळे इन्सुलीनला विरोध होणार नाही.

आहाराची पथ्यं

- अख्खी धान्यं, ज्वारी-बाजरीसारखी धान्यं, फळं, भाज्या अशा तंतुमय पदार्थांचा आहारात भरपूर समावेश करावा.

- रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्सऐवजी कॉम्प्लेक्स कार्बचा वापर करावा.

- अंडी, डाळी, सोयाबीन, नट्स, मांसाहार या उत्तम प्रथिनं असलेल्या पदार्थांचा आहारातला समावेश वाढवावा.

- साखर, मैदा, बिस्किटं, ब्रेड असे प्रक्रिया केलेले आणि रिफाइन्ड कर्बोदकं असलेले पदार्थ टाळा.

- बदाम आणि बियांचं सेवन भरपूर करावं. यामुळे संप्रेरकांचा समतोल साधेल व इन्सुलीनबाबतची शरीराची संवेदनशीलता कमी होईल.

हेही वाचा - पोट वाढण्याच्या चिंतेने गरोदर महिलेने उचललं असं पाऊल; पाहूनच सर्वांना बसला धक्का

पीसीओएससाठी मधल्या वेळचं खाणं

पीसीओएस समस्या असणाऱ्या अनेक तरुण मुली व महिलांमध्ये मधल्या वेळच्या खाण्याबाबत चुकीच्या सवयी असतात. “मधल्या वेळी बिस्किटं, भुजिया, ब्रेड असं जंक फूड स्त्रिया खातात. त्याऐवजी भरपूर तंतुमय पदार्थ व प्रथिनं असणारे, पौष्टिक पदार्थ खाल्ले पाहिजेत. फळं, भाज्यांव्यतिरिक्त सकाळच्या आणि संध्याकाळच्या खाण्यात बदाम असावेत,” असंही समाद्दार यांनी सांगितलं. बदामांमधले तंतुमय पदार्थ व प्रथिनांमुळे इन्सुलीनला असलेला पेशींमधला विरोध कमी होतो, असं संशोधनातून सिद्ध झालं आहे. त्यामुळे थोडे बदाम किंवा मखाणे मधल्या वेळी खाता येऊ शकतात. आवडीप्रमाणे भाज्या घालून त्याचं चाट करूनही खाता येऊ शकतं.

“दोन जेवणांच्या मधे बदाम खाल्ल्यानं लगेच भूक लागत नाही. कारण यामुळे पोट भरल्याची जाणीव होते. स्वयंपाकघरातले वेगवेगळे मसाले लावून बदामांनाही स्वाद देता येऊ शकतो,” असं मत कृष्णास्वामी यांनी व्यक्त केलं. केक, पेस्ट्री, साखर, सरबतं, गोड पेयं, चॉकलेटं, मैद्याचे पदार्थ आणि बेकरी पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.

स्वतःवर प्रेम करा

आरोग्यपूर्ण जीवनशैली, आहाराचं व्यवस्थापन आणि नियमित व्यायाम असेल, तर पीसीओएसच्या समस्येला चांगल्या प्रकारे हाताळता येऊ शकतं. व्यायामामुळे इन्सुनलीनबद्दलची संवेदनशीलता सुधारते. आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारणं हा पीसीओएसवरचा महत्त्वाचा उपाय आहे, असं समाद्दार यांचं म्हणणं आहे. पीसीओएसची समस्या झाल्यावर गेलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीनं भावनिक व मानसिक आधार देण्याची गरज असते. त्याकरिता एखाद्या छंदाची आवड जोपासणं, निसर्गात रमणं, दीर्घ श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करणं, एकाग्रता साधणं अशा काही गोष्टी झालेल्या आजारावरचं लक्ष हटवण्यासाठी मदत करतात, असं कृष्णास्वामी यांना वाटतं.

पीसीओएस ही समस्या वरकरणी गंभीर वाटत नसली, तरी अनेक आजारांना आमंत्रण देणारी ठरू शकते. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी आहाराची पथ्यं पाळणं हा चांगला व सोपा उपाय आहे.

First published:

Tags: Lifestyle