मुंबई, 19 एप्रिल : देशात सध्या कोरोना लसीकरणाचा (Corona vaccination) वेग वाढला आहे. आता 18 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनाही लस दिली जाणार आहे. कोरोना लशीचे (Corona vaccine) दोन डोस घ्यावेच लागतात. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींनाही काही दिवसांनी कोरोना लस (Covid 19 vaccine) दिली जाते. पण त्यांच्या शरीरात कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज तयार झालेल्या असतात. मग त्यांनीसुद्धा कोरोना लशीचे दोन डोस घ्यायला हवेच का? त्यांच्यासाठी एक डोस पुरेसा नाही का? याबाबत संशोधन करण्यात आलं.
कोरोना संसर्ग होऊन गेलेल्यांना कोरोना लशीचे किती डोस आवश्यक आहेत, याबाबत अमेरिकेत अभ्यास करण्यात आला. पेनसिल्व्हानिया युनिव्हर्सिटीमध्ये (Pensylvania University) याबद्दलचं संशोधन झालं आहे. त्या संशोधनानुसार कोरोना संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तींना लशीचा एकच डोस पुरेसा होईल. त्या एका डोसमुळेच त्यांच्या शरीरात कोविडशी लढण्याची क्षमता निर्माण होऊ शकेल. आधीच कोरोना संसर्ग होऊन गेलेल्यांना दुसऱ्या डोसचा फारसा काही फायदा नाही,असा निष्कर्ष त्या संशोधनानंतर काढण्यात आला आहे.
या संशोधनासाठी 44 व्यक्तींचे दोन गट तयार करण्यात आले. एका गटातल्या व्यक्तींना त्यापूर्वी कोरोना संसर्ग झालेला नव्हता. त्यांना कोविड नाइव्ह (Covid Naive) असं म्हटलं गेलं. त्या व्यक्तींच्या रक्ताचे नमुने पहिला डोस घेण्याच्या आधी, दोन डोसच्या मध्ये आणि दोन्ही डोसनंतर घेतले गेले. अशा व्यक्तींच्या शरीरातली प्रतिकारयंत्रणा दोन्ही डोस घेतल्यानंतरच पूर्णतः कार्यान्वित झाल्याचं आढळून आलं.
दुसऱ्या गटात कोरोनोचा संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तींचा समावेश होता. त्यांनी लशीचा पहिला डोस घेतल्यानंतरच त्यांच्या शरीरातल्या अँटीबॉडीजचा स्तर उंचावला होता. अशा व्यक्ती पहिला डोस घेतल्यानंतर जरी विषाणूच्या पुन्हा संपर्कात आल्या, तर त्यांना आजार होण्याची शक्यता अगदी नगण्य किंवा जवळपास नाहीच,असं आढळलं आहे. या संशोधनाचे निष्कर्ष सायन्स इम्युनॉलॉजी या सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले.
हे वाचा - BREAKING! आता 18+ व्यक्तींना मिळणार CORONA VACCINE! PM मोदींचा मोठा निर्णय
कोरोना प्रतिबंधक लस आपल्या शरीरात गेल्यानंतर दोन प्रकारे काम करते. पहिलं म्हणजे लशीमुळे शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. दुसरं म्हणजे लशीमुळे B-सेल्स तयार होतात. पुन्हा विषाणूशी संपर्क आला तर शरीराला अँटिबॉडीची आठवण करून देण्याचं काम या पेशी करतात. त्यामुळे प्रतिकारयंत्रणा (Immune System) सक्रिय होते.
सध्यातरी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात तयार झालेल्या सर्व कोरोना प्रतिबंधक लशींचे दोन डोस घेणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 ते 45 दिवसांच्या अंतराने दुसरा डोस घ्यावा लागतो. दुसरा डोस घेतल्यानंतर शरीरात आवश्यक त्या अँटीबॉडीज (Antibodies) विकसित होतात.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दुसरा डोस वेळेत घेतला गेला नाही तर त्या लशीचा आवश्यक तितका परिणाम दिसणार नाही. त्यामुळे त्रास होऊ शकतो. म्हणूनच लशीचे दोन डोस निर्धारित केलेल्या अंतराने घेणं गरजेचं आहे. तसं केल्यानंतर लशीचा पुरेसा प्रभाव दिसतो. (याला अपवाद आहे तो फक्त जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लशीचा. त्या लशीचा केवळ एकच डोस घ्यावा लागतो.
हे वाचा - संपूर्ण देशाला Remdesivir संकटातून बाहेर काढेल; सोलापूरच्या अशा कंपनीसमोरच अडचणी
सध्या लशीचा दुसरा डोस घेण्यामध्ये काही समस्या दिसून येत आहेत. एक तर लोक ठरलेल्या दिवशी लस घेण्यासाठी जातच नाहीत किंवा काही ठिकाणी लशीच्या पुरवठ्याचा तुटवडा असल्यामुळेही लस उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर,या संशोधनातून काहीसा दिलासा मिळू शकतो. अर्थात, सध्याच्या नियमानुसार लशीचे दोन्ही डोस घेणं आवश्यकच आहे. या संशोधनाच्या निष्कर्षांवर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर कदाचित याची अंमलबजावणी केली जाऊ शकते.
या सगळ्या दरम्यान कोरोनाप्रतिबंधक लशीच्या तिसऱ्या डोसबद्दलही (Booster Dose) चर्चा सुरूआहे. सध्याच्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन डोसमुळे शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीज किती काळ टिकतील, याबद्दल शास्त्रज्ञांना अद्याप पुरेसा अंदाज आलेला नाही. त्यामुळेच तिसऱ्या म्हणजे बूस्टर डोसची तयारी केली जात आहे. हा डोस आधीच्या डोसप्रमाणेच असेल, मात्र त्यात काही सुधारणा असतील. सध्या म्युटंट व्हायरस (Mutant Virus)अर्थात स्वतःमध्ये जनुकीय सुधारणा केलेल्या व्हायरसमुळे लागण होत असल्याच्या केसेस पुढे येत आहेत. व्हायरस म्युटेट झाला,तर आधीच्या डोसमुळे तयार झालेल्या अँटिबॉडीज काम करत नाहीत. त्यामुळे म्युटेट झालेल्या व्हायरसच्या अनुषंगाने लशीमध्ये थोडे बदल करून बूस्टर डोस तयार केला जातो. तो घेतला की आवश्यक तो परिणाम साधतो. त्यामुळेच सध्याच्या काळात बूस्टर डोसच्या आवश्यकतेचीही चर्चा होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.