मुंबई, 19 एप्रिल : कोरोना लसीकरणाबाबत (Corona vaccination) मोठी बातमी समोर येत आहे. आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस (above 18 years to be eligible to get COVID-19 vaccine) दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra modi) हा मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे, 2021 पासून लसीकरणाचा पुढचा सर्वात मोठा टप्पा आता सुरू होणार आहे. ज्यामध्ये 18 पुढील सर्व वयाच्या लोकांना लस दिली जाणार आहे.
देशात 16 जानेवारी, 2021 पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यानुसारच टप्प्याटप्प्याने लसीकरण केलं जातं आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना लस देण्यात आली. केंद्र सरकारने लसीकरणाचा प्राधान्यक्रम ठरवला. त्यानंतर 1 मार्चपासून ज्येष्ठ आणि इतर आजार असलेल्या 45 पेक्षा जास्त वयांच्या नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं. 1 एप्रिलपासून 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्वच नागरिकांना कोरोना लस देणं सुरू झालं.
Everyone above 18 years to be eligible to get COVID-19 vaccine from May 1 as Govt liberalises vaccination strategy
— Press Trust of India (@PTI_News) April 19, 2021
यानंतर 45 पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना कोरोना लस द्यावी अशी मागणी महाराष्ट्रासह काही राज्यांनी केली. सुरुवातीला केंद्र सरकारने ही मागणी नाकारली होती. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना कोरोना लस द्यावी, असा निर्णय घेतला आहे. देशातील आरोग्य तज्ज्ञांसह बैठक घेतल्यानंतर मोदींनी हा निर्णय घेतला आहे.
हे वाचा - राज्यातील निर्बंध अधिक कडक; किराणा दुकानाच्या वेळांमध्ये झाला मोठा बदल
लस उत्पादक कंपन्यांना त्यांच्या लसीकरणाचं उत्पादन वाढण्यास सांगण्यात आलं आहे. त्यापैकी 50% पुरवठा हा केंद्र सरकारला केला जाईल आणि उर्वरित 50 टक्क्यांपैकी काही पुरवठा राज्य सरकारला करण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारमार्फत ठरलेल्या निकषांनुसार राज्यांना लस मिळेल. पण लशीचा तुटवडा असेल किंवा अतिरिक्त लस हवी असेल तर राज्य सरकारला आता केंद्राकडे लस मागण्याची गरज नाही. थेट लस उत्पादकांकडून त्यांना लस घेता येईल. याच 50 टक्क्यांपैकी काही पुरवठा बाजारात आणण्याची मुभा लस उत्पादक कंपन्यांना देण्यात आली आहे. लशीची एक किंमत ठरवून ती बाजारात आणावी, असं केंद्राने सांगितलं आहे. केंद्र सरकारमार्फत प्राधान्य गटासाठी सुरू असलेली मोफत लसीकरण मोहीम मात्र सुरूच राहिल, असंही केंद्राने स्पष्ट केलं आहे.
हे वाचा - संपूर्ण देशाला Remdesivir संकटातून बाहेर काढेल; सोलापूरच्या अशा कंपनीसमोरच अडचणी
देशातील जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. या दिशेने सरकारने टाकलेलं हे मोठं आणि महत्त्वपूर्ण असं पाऊल आहे. 1 मेपासून लसीकरणाचा हा सर्वात मोठा टप्पा सुरू होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine