Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

फक्त स्टेरॉइड्स नाही तर काढ्यामुळेही फंगल इन्फेक्शनचा धोका; डॉक्टरांनी केलं सावध

फक्त स्टेरॉइड्स नाही तर काढ्यामुळेही फंगल इन्फेक्शनचा धोका; डॉक्टरांनी केलं सावध

कोणत्याही गोष्टीचं अति प्रमाणात सेवन केल्यास समस्या निर्माण होऊ शकते.

कोणत्याही गोष्टीचं अति प्रमाणात सेवन केल्यास समस्या निर्माण होऊ शकते.

कोणत्याही गोष्टीचं अति प्रमाणात सेवन केल्यास समस्या निर्माण होऊ शकते.

मुंबई, 17 जून : गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून देश कोरोना विषाणूशी (Coronavirus) दोन हात करतो आहे. यंदा कोरोनासोबत बुरशीनेही (Fungal infection) थैमान घातल्याने माणसांना अधिक धोका निर्माण झाला आहे. काळी बुरशी (Black Fungus) आणि पांढरी बुरशी (White Fungus) सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. त्यांची सर्वांना भीतीही वाटत आहे. या बुरशीबद्दलची ही माहिती.

1. ब्लॅक फंगस आणि व्हाइट फंगस म्हणजे काय?

- म्युकर्मायकॉसिस (Mucormycosis) किंवा ब्लॅक फंगस (Black Fungus) हा संसर्ग बुरशीच्या ज्या प्रकारामुळे होतो, ती बुरशी संसर्गग्रस्त पेशींमध्ये काळ्या रंगाचे समूह तयार करते. कँडिडा (Candida) किंवा व्हाइट फंगस (White Fungus) हा संसर्ग बुरशीच्या ज्या प्रकारामुळे होतो, ती बुरशी संसर्गग्रस्त पेशींमध्ये पांढऱ्या रंगाचे समूह तयार करते.

2. प्रसार/संसर्ग कसा होतो?

- हवेत उपस्थित असलेले बुरशीचे स्पोअर्स (Fungal Spores) श्वसनावाटे शरीरात गेल्यामुळे या बुरशीचा संसर्ग होतो. तसंच त्वचेवरच्या जखमांद्वारेही या रोगाचा संसर्ग होऊ शकतो.

3. ही बुरशी येते कुठून?

- जिवाणू, विषाणू यांच्याप्रमाणेच बुरशीही आजूबाजूच्या वातावरणात, हवेत उपस्थित असते. बुरशी मातीत, तसंच माणसाच्या नाकातल्या श्लेष्मल द्रव्यातही आढळते.

4. हवेतून प्रसार होतो?

- बुरशीचे स्पोअर्स हवेत उपस्थित असतात. त्यामुळे हवेतून होणारा प्रसार थांबवणं अशक्य आहे.

5. एका माणसापासून दुसऱ्या माणसाला संसर्ग होऊ शकतो का?

- बुरशीजन्य संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. (Non Contagious)

6. आपल्यापैकी कोणालाही हा संसर्ग होऊ शकतो का?

- नाही. हवेत असलेले विषाणू, जिवाणू, बुरशी यांचा शरीरात होणारा प्रवेश टाळता येत नाही; मात्र सर्वांना त्याचा त्रास होत नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांची ती शक्ती यांच्याशी लढते.

7. कोणाला हा संसर्ग होऊ शकतो?

- ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा व्यक्तींना हा संसर्ग होऊ शकतो. 60 वर्षांवरच्या व्यक्ती, अनियंत्रित डायबेटीस असलेल्या व्यक्ती, मूत्रपिंडाचा गंभीर विकार, अस्थमा, टीबी असलेल्या व्यक्ती, व्यसन करणाऱ्या व्यक्ती आदींना हा संसर्ग होऊ शकतो.

8. प्रत्येक कोविड रुग्णाला ब्लॅक किंवा व्हाइट फंगसचा संसर्ग होतो का?

- हे दुर्मिळ इन्फेक्शन आहे. सर्व कोविड रुग्णांनाच होतं असं काही नाही.

9. कोविड रुग्णांमध्ये (Covid19) हा संसर्ग का वाढतो आहे?

- कोविडमुळे प्रतिकारशक्ती (Immunity) घटते. त्यामुळे जिवाणू आणि बुरशी संधी साधून शरीरात शिरकाव करतात. कोविडच्या उपचारांमध्ये स्टेरॉइड्ससारखी औषधं वापरली जातात. त्यामुळे लिम्फोसाइट्स हा पांढऱ्या पेशींचा प्रकार घटतो. त्यामुळे अशा काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस किंवा कँडिडाचा संसर्ग होत असल्याचं दिसतं. शिवाय कोविडमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन थांबवण्यासाठी अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. त्यामुळे बुरशीशी दोन हात करणाऱ्या उपयुक्त बॅक्टेरियाची वाढही मंदावते.

हे वाचा - कोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश

झिंकचा अतिरिक्त वापर, कृत्रिम ऑक्सिजनचा दीर्घ काळ वापर, तसंच वाफेचं अति प्रमाण आदींमुळेही बुरशीची वाढ होते.

10. मग ही औषधं थांबवायची का?

- नाही. ही औषधं कोविडमध्ये जीवरक्षक आहेत.

11. मग ही औषधं घेत असताना बुरशीजन्य संसर्ग रोखायचा कसा?

- रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावेत. कारण व्यक्तिपरत्वे किती डोस द्यायचा, याचं त्याला नेमकं ज्ञान असतं. सेल्फ-मेडिकेशन घातक ठरू शकतं.

12. काढ्यासारखे नैसर्गिक घटकही घातक ठरू शकतात?

- अति प्रमाणात कोणतीही गोष्ट घेतली गेल्यास समस्याच निर्माण होऊ शकते. काढ्यात अँटीबॅक्टेरियल आणि स्टेरॉयडल गुण असतात. त्यात झिंक आणि लोहही असतं. त्यामुळे त्यातून बुरशीच्या वाढीला चालना मिळू शकते.

13. कोविड झालेला नसतानाही हा संसर्ग होऊ शकतो?

- प्रतिकारशक्ती कमी असलेल्या कोणाही व्यक्तीला हा संसर्ग होऊ शकतो.

14. ब्लॅक फंगसच्या संसर्गामुळे मृत्यू येऊ शकतो का?

- म्युकरमायकॉसिस किंवा ब्लॅक फंगस हा संसर्ग दुर्मिळ आहे. मात्र त्यातून मृत्यूही ओढवू शकतो.

15. ब्लॅक फंगसची लक्षणं कोणती?

- ऱ्हायनो ऑर्बायटल सेरेब्रल म्युकरमायकोसिस : हा संसर्ग बुरशीचे स्पोअर्स श्वासाद्वारे शरीरात गेल्यामुळे होतो. त्यामुळे नाक, डोळ्यांची खोबणी, तोंडाची आतील पोकळी आणि मेंदू आदी भागांना संसर्ग होऊ शकतो. डोकेदुखी, नाक चोंदणं, नाकातून हिरवा स्राव वाहणं, चेहऱ्यावर सूज येणं आणि चेहऱ्याला सेन्सेशन नसणं, त्वचेचा रंग जाणं अशी लक्षणं दिसू शकतात.

हे वाचा - अस्थींमधून कोरोना पसरतो? जाणून घ्या काय आहे सत्य

- पल्मनरी म्युकरमायकोसिस : यात श्वासाद्वारे आत गेलेले स्पोअर्स श्वसनयंत्रणेत जातात आणि त्यांचा संसर्ग फुप्फुसात होतो. ताप, खोकला, छातीत दुखणं, खोकल्यातून रक्त पडणं आदी लक्षणं दिसतात. आतड्यांनाही हा संसर्ग होऊ शकतो. मात्र पहिला प्रकार होण्याचं प्रमाण जास्त आहे.

16. ब्लॅक फंगसचं इन्फेक्शन ओळखायचं कसं?

- लक्षणं आणि MRI सारख्या टेस्ट्सद्वारे हे इन्फेक्शन ओळखता येतं. बायोप्सीही केली जाते.

17. यावर उपचार करता येतात का?

- लवकर निदान झालं, तर अँफोटेरिसिन आणि पोसाकोनॅझोल यासारख्या औषधांच्या सहाह्याने यावर उपचार करता येतात. काही केसमध्ये सर्जरी करून संसर्गित भाग काढून टाकावा लागतो.

18. व्हाइट फंगसमुळे मृत्यू येऊ शकतो का?

- नाही.

19. व्हाइट फंगसवर उपचार करता येतात का?

- होय. तुलनेने कमी खर्चिक अँटी-फंगल औषधांच्या साह्याने व्हाइट फंगसवर उपचार करता येतात.

20. स्वतःचं संरक्षण कसं करायचं?

- स्वच्छ फेस मास्क वापरावा. ठरावीक वेळ वापरल्यानंतर मास्क धुवावा.

- जखमा झाल्यास त्या वारंवार धुवाव्यात.

- कोविड झाल्यास रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.

First published:

Tags: Corona, Corona patient, Coronavirus, Health, Lifestyle