मुंबई, 21 डिसेंबर : आज जे ब्रँड्स जगभरातल्या मार्केटवर राज्य करत आहेत, त्यांपैकी बहुतेकशा ब्रँड्सची सुरुवात अगदी छोट्या स्तरावर आणि प्रतिकूल परिस्थितीत झाली आहे. नाइकी (Nike) हा अशा ब्रँड्सपैकी एक होय. नाइकी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ब्रँडेड शूज. नाइकी हा जगभरातल्या शूजच्या दुनियेचा बादशाह मानला जातो. आज नाइकी जगप्रसिद्ध ब्रँड असला तरी या कंपनीची सुरुवात अगदी साधेपणानं आणि प्रतिकूल परिस्थितीत झाली. नाइकी या ब्रँडनेमप्रमाणेच त्याची स्लोगन आणि लोगोदेखील विशेष प्रसिद्ध आहे. या कंपनीची स्थापना, स्लोगन आणि लोगोच्या निर्मितीमागे खास कहाणी आहे. या कंपनीच्या वाटचालीबाबत सविस्तर जाणून घेऊ या. नाइकी म्हटलं, की आपल्या लगेच आठवते ती जस्ट डू इट ही टॅगलाइन. आज जगातल्या जवळपास प्रत्येक देशात नाइकी कंपनीची आउटलेट्स आहेत. सर्वसामान्यांपासून ते सेलेब्रिटीजपर्यंत प्रत्येकाला नाइकीचे शूज, कपडे आणि अन्य वस्तू आवडतात. नाइकी ब्रँडची स्थापना 1964 मध्ये झाली. 1964 ते 1978 दरम्यान हा ब्रँड ब्लू रिबन स्पोर्ट्स नावानं ओळखला जात होता. या कंपनीची स्थापना फिल नाइट आणि बिल बोरमन यांनी केली आहे. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान फिल हा एक रेसर होता, तर बिल त्याचा प्रशिक्षक होता. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून एमबीए केल्यानंतर फिलने आपल्या प्रशिक्षकाची पुन्हा भेट घेऊन कंपनी सुरु करण्याविषयीची कल्पना त्यांना सांगितली. सुरुवातीच्या काळात ब्लू रिबन कंपनीने (नाइकी) जपानमधल्या Onitsuka Tiger या कंपनीशी करार केला. ही कंपनी आता ASICS या नावाने ओळखली जाते. करारानुसार हे दोघं या कंपनीचे शूज अमेरिकेत आणून विकत होते. अशा प्रकारची कंपनी सुरू करण्याचं स्वप्न फिल नाइटने एमबीए करत असताना पाहिलं होतं. पदवी घेतल्यानंतर त्याने आपली कल्पना प्रत्यक्षात उतरवली. त्यासाठी तो टुरिस्ट व्हिसाच्या मदतीने जपानमधल्या कोबे शहरात पोहोचला. त्या वेळी त्याचं लक्ष Onitsuka Tiger च्या स्टोअरकडे गेलं. त्याकाळी Onitsuka Tiger जपानमध्ये विशेष लोकप्रिय होती; पण तिची उत्पादनं अमेरिकेतल्या बाजारात मिळत नव्हती. ही कंपनी धावपटूंसाठी शूज डिझाइन करत असे. या कंपनीचे शूज हलके आणि आरामदायी असल्याने त्यांना मागणी असायची. फिल नाइटने त्याच्या ‘शूज डॉग’ या आत्मचरित्रात याविषयी उल्लेख केला आहे. फिल म्हणतो, `या बैठकीत स्वतःला प्रेझेंट करणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. माझं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं आणि उद्योगक्षेत्रात उतरण्याची माझी तीव्र इच्छा होती. त्या वेळी मी Onitsuka Tigerच्या मालकाची भेट घेतली आणि त्याला मी ब्लू रिबन स्पोर्ट्सचा मालक असल्याचं सांगितलं. आमची कंपनी अमेरिकेत Onitsuka चे शूज विक्री करू इच्छिते असं मी त्यावेळी आवर्जून नमूद केलं.` आतापर्यंत अशी कोणतीही कंपनी नव्हती. त्याची कल्पना फक्त फिल नाइटच्या मनात होती. पहिल्याच भेटीत फिलने Onitsuka ला प्रभावित केलं आणि कंपनीने त्याला शूज देण्याचं मान्य केलं. वाचा - क्रेडिट कार्डचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? फायदेही समजून घ्या कंपनीच्या सुरुवातीच्या काळात ब्लू रिबन कंपनी कारच्या डिकीतून शूजची विक्री करत होती. 1964 मध्ये ब्लू रिबन कंपनीने 1300 जपानी शूज जोड्या विकून 8000 डॉलर्सचं उत्पन्न मिळवलं. त्यानंतर 1965 मध्ये नाइकीची विक्री 20 हजार डॉलर्सपर्यंत पोहोचली आणि कंपनीने 1966 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये आपलं पहिलं स्टोअर सुरू केलं. 1971 मध्ये ब्लू रिबनचा जपानी कंपनीशी असलेला करार संपुष्टात आला. त्यानंतर कंपनीने मेक्सिकोत स्वमालकीची शूज फॅक्टरी सुरू केली. 1971 मध्ये नाइकी कंपनीचा लोगो डिझाइन करण्यात आला. हा लोगो एका ‘बरोबर’च्या चिन्हासारखा होता. तो लोगो स्वोश नावानं ओळखला जायचा. हा लोगो त्यावेळी कॅरोलिन डेव्हिडसनने 35 डॉलर्समध्ये डिझाइन केला होता. जून 1981 मध्ये या लोगोचा पहिल्यांदा वापर केला गेला. दरम्यान, 1974 मध्ये कंपनीने या लोगोचं पेटंट घेतलं. कंपनीच्या नावाची संकल्पना ब्लू रिबनचा पहिला कर्मचारी जेस जॉन्सनची होती. स्वोशपासून प्रेरणा घेऊन जॉन्सनने नाइकी हे नाव सुचवलं. ग्रीक पौराणिक कथांमधल्या नाइकी देवीच्या नावावरून हे नाव घेतलं गेलं आहे. पंख असलेल्या या देवीचं नाव फिल नाइटला आवडलं आणि त्याने लगेच ते पेटंट करून घेतलं. वाचा - बँक कसं ठरवते कोणाला किती लोन द्यायचं? नेमका काय आहे नियम वायडेन-केनेडी जाहिरात एजन्सीने नाइकीसोबत काम सुरू केल्यानंतर 1988मध्ये `जस्ट डू इट` ही स्लोगन दिली. एजन्सीचे सहसंस्थापक डॅन वायडेन यांनी एका खुन्याने उच्चारलेल्या `लेट्स डू इट` या शब्दांमध्ये बदल करून कंपनीसाठी जस्ट डू इट ही स्लोगन तयार केली. 19 जुलै 1976 रोजी गॅरी गिलमोर याने अमेरिकेतल्या उटाह राज्यातल्या ओरेममधल्या एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकला आणि पंपावरच्या क्लार्कची हत्या केली. दुसऱ्या दिवशी त्याने उटाहमधल्या प्रोवो इथलं एक मोटेल लुटलं. या मोटेलमध्ये तो त्याच्या मानसिक आजार असलेल्या एप्रिल नावाच्या बहिणीसोबत राहत होता. यानंतर पोलिसांनी गॅरीला अटक केली आणि न्यायालयाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेनंतर गिलमोरने स्वतःला गोळी मारून घेण्याची शिक्षा निवडली. `मला लवकरात लवकर मारून टाका,` असं त्यानं अधिकाऱ्यांना सांगितलं. 1977मध्ये त्याला मारण्यात आलं. मृत्यूपूर्वी त्याला त्याचे शेवटचे शब्द विचारले असता त्याने `लेट्स डू इट` असे शब्द उच्चारले. त्यावरून नाइकी कंपनीची स्लोगन ‘जस्ट डू इट’ अशी तयार करण्यात आली.
1976मध्ये नाइकीने कंपनीची पहिली जाहिरात एजन्सी म्हणून जॉन ब्राउन आणि त्याच्या भागीदारांची निवड केली. त्या वर्षी कंपनीने एक जाहिरातदेखील तयार केली होती. या पहिल्या जाहिरातीत `There Is NO Finish Line` अशी टॅगलाइन होती. त्यानंतर 1980मध्ये नाइकीने अमेरिकेतल्या शूज मार्केटमध्ये 50 टक्के भागीदारी मिळवली आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये कंपनी सार्वजनिक बनली.