मुंबई, 21 ऑक्टोबर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. नवे कोरोना रुग्ण कमी प्रमाणात दिसून आले आहेत. मृत्यूच्या संख्येत घट झाली आङे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट हा 86.5 इतका झाला आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचं हे दिलासादायक चित्र. मात्र यामुळे बिनधास्त होऊ नका. कारण अजूनही धोका टळलेला नाही. पुढील काही आठवडे अति धोक्याचे आहेत. याबाबत तज्ज्ञांनी सावध केलं आहे.
अमेरिकेच्या (America) मिनेसोटा युनिव्हर्सिटीतील (University of Minnesota) संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. माइकल ऑस्टरहोम ( Dr. Michael Osterhom) यांनी कोरोनाव्हायरसबाबत सावध केलं आहे. महासाथीचे पुढील तीन महिने धोकादायक ठरू शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे. रविवारी एबीसी न्यूजच्या मीट द प्रेस कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले.
ऑस्टरहोम यांनी सांगितलं, "2021 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत कोरोनाची लस येण्याची शक्यता नाही. त्यामुळे मोठ्या संख्येनं लसीकरण करता येणं शक्य नाही. महासाथीच्या या टप्प्यात लोकांपर्यंत योग्य संदेश पोहोचवला जात नाही आहे, त्यामुळेच लोक धोक्याबाबत सावध नाहीत. थंडीच्या दिवसात कोरोनाची स्थिती अधिक भयंकर होऊ शकते"
हे वाचा - COVID-19 वर नाही प्रभावी औषध; मग कसे सुरू आहेत कोरोना रुग्णांवर उपचार पाहा
दरम्यान याआधी जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील हिवाळ्यात कोरोनाचा कहर आणखी वाढणार असल्याचं म्हटलं आहे. हिवाळ्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणंही वाढेल असा इशारा WHO ने दिला आहे.
हिवाळ्यामध्ये तरुणांना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढेल आणि अधिक लोकांना रुग्णालयात दाखल केले जाईल आणि मृत्यूचे प्रमाण वाढेल असं युरोपमधील WHO चे प्रादेशिक संचालक हेनरी क्लग म्हणाले आहेत. यावेळी पुढच्या काही महिन्यांसाठी 3 मुख्य कारणांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला हेनरी क्लग यांनी दिली आहे.
पावसाळी आणि हिवाळ्यातील हवामान सामान्यत: संसर्गासाठी अनुकूल असते, यावेळी कोरोना संक्रमणाचा आकडा पुन्हा वाढेल. WHOच्या संसर्गजन्य रोगाच्या तज्ज्ञ मारिया व्हॅन केरखॉव्ह यांनी सांगितले की सध्या सर्व देशांना हाय अलर्ट असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने वेगवान चाचणी प्रणाली तयार केली पाहिजे.
हे वाचा - सणाच्या काळात हँडशेक नको, आपला राम रामच बरा गड्या
तर भारतात केंद्र सरकारनेदेखील हिवाळ्याच्या महिन्यांत कोरोना संक्रमण अधिक पसरू शकतो, असं म्हणत मास्क घालूनच सर्व सण साजरे करण्याचा सल्ला दिला आहे.
हिवाळा श्वसनसंबंधी आजारांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या व्हायरससाठी पोषक आहे, त्यामुळेच हिवाळ्यात कोरोना अधिक पसरू शकतो, असं नीती आयोगाचे सदस्य आणि भारताच्या कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के पॉल यांनी सांगितलं. कोरोनाचा अधिक संसर्ग होऊ नये, यासाठी पुढील काही महिन्यात आपल्याला मास्कवाली पूजा, मास्कवाली छटपूजा, मास्कवाली दिवाळी, मास्कवाला दसरा, मास्कवाली ईद साजरी करावी लागेल, असं डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले.