वॉशिंग्टन, 22 ऑक्टोबर : सध्या कांद्याचे (Onion) दर वाढले आहेत. दराने रडवणाऱ्या कांद्यामुळे आता आजारामुळे रडण्याचीही वेळ ओढावली आहे. कांदा आता आजारही पसरवतो आहे (Onion Salmonella) . कांद्यामुळे तब्बल 652 लोक आजारी पडले आहेत. अमेरिकेतील (America Salmonella) 37 राज्यांमध्ये कांद्यामुळे आजार पसरला आहे (Onion Bacterial Infection).
अमेरिकेत साल्मोनेला (Salmonella) या जिवाणूच्या संसर्गामुळे (Bacterial Infection) होणारा आजार वेगाने पसरू लागला आहे. जवळपास 37 राज्यांमध्ये शेकडो नागरिक या संसर्गामुळे आजारी पडले आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांत 652 जण आजारी पडले आहेत. त्यापैकी 129 जण हॉस्पिटलमध्ये असून, आतापर्यंत कोणीही दगावलेलं नाही. संसर्गग्रस्तांची संख्या यापेक्षाही अधिक असण्याची भीती CDC ने व्यक्त केली आहे. वर उल्लेख केलेला बाधितांचा आकडा 31 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीतला आहे.
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (Centers for disease control & prevention) अर्थात CDCच्या म्हणण्यानुसार, या संसर्गाचा उगम मेक्सिकोमधल्या (Mexico) चिहुआहुआ (Chihuahua) इथून आयात केलेल्या कांद्यात (Imported Onion) असल्याचं लक्षात आलं आहे. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, आजारी पडलेल्या नागरिकांपैकी किमान 75 टक्के जणांनी कच्चा कांदा (Raw Onion) किंवा कच्च्या कांद्यापासून तयार केलेला पदार्थ खाल्ला होता. तसंच, अनेक बाधितांनी एकाच रेस्टॉरंटमध्ये खाल्ल्याचंही दिसून आलं होतं.
हे वाचा - कोंबड्यांमुळे कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसचं संकट; नव्या महासाथीसाठी तयार राहा
त्यानंतर प्रशासन सतर्क झालं असून, लेबल नसलेले लाल, पांढरे आणि पिवळे कांदे खाऊ नयेत, अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे. कोणाच्या घरात अशा प्रकारच्या कांद्यांचा साठा असेल, तर तातडीने त्याची विल्हेवाट लावावी, असंही सांगण्यात आलं आहे.
चिहुआहुआमधून आयात केला जाणारे कांदे खरेदी न करण्याचा, तसंच त्या कांद्याचा काही साठा असल्यास तो आहारात न आणता त्याची विल्हेवाट लावण्याचा सल्ला CDC ने दिला आहे. पॅकेजिंग नसलेले, तसंच पॅकेजिंगवर माहितीचे स्टिकर नसलेले कांदे खरेदी करू नयेत आणि खाण्यासाठी वापरू नयेत, असा सल्ला देण्यात आला आहे. तसंच, स्वयंपाकाची भांडी, कांदे साठवलेली भांडी आदींची स्वच्छता गरम साबणपाण्याने करावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
हे वाचा - बापरे! Hotdog ने घेतला खेळाडूचा जीव; स्पर्धा जिंकण्याच्या नादात मृत्यू
साल्मोनेला जिवाणूमुळे फूड पॉयझनिंग अर्थात अन्न विषबाधा होते. सध्या अमेरिकेत कांद्यातून या जिवाणूचा प्रसार झाला आहे. हा जिवाणू कोणत्याही प्राण्याच्या दुधातही काही प्रमाणात असू शकतो. त्यामुळेच दूध पिण्यापूर्वी उकळवून घेणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून शक्यतो थोडीशी खराब झालेली भाजीही आपल्या आहारात येऊ देऊ नये; मात्र ती कच्च्या स्वरूपात आहारात न येता शिजवून आली असेल, तर त्यातून विषबाधा होण्याची शक्यता थोडी कमी होते.
साल्मोनेला संसर्गाच्या लक्षणांमध्ये हगवण, ताप आणि पोटदुखी आदींचा समावेश आहे. खराब झालेले अन्नपदार्थ आहारात आल्यास सहा तासांपासून सहा दिवसांपर्यंतच्या काळात त्यापासून अशा प्रकारचा त्रास सुरू होत असल्याचं आढळून आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Disease symptoms, Health, Lifestyle, Onion, Serious diseases