मुंबई, 11 मार्च : देशातील कोरोना (Coronavirus) रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण (Active Coronavirus Cases in Maharashtra) हे महाराष्ट्रात आहे. राज्यात या वर्षातील सर्वाधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्यातील दुसरी धक्कादायक आकडेवारी समोर येते आहे. देशातील दहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यापैकी 8 जिल्हे फक्त महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) लागू होणार की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, अमरावती, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद या आठ जिल्ह्यांमध्ये देशातील सर्वात जास्त ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यातही पुण्यात 18,474 इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्यानंतर अनुक्रमे नागपूर, ठाणे आणि मुंबईचा क्रमांक लागतो.
सर्वाधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असलेले देशातील 10 जिल्हे
पुणे - 18,474
नागपूर - 12,724
ठाणे - 10,460
मुंबई - 9,973
बंगळुरू - 5,526
एर्नाकुलम - 5,430
अमरावती - 5,259
जळगाव - 5,029
नाशिक - 4,525
औरंगाबाद - 4,354
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. पण, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणखी वाढत राहिली तर जिथे गरजेचा वाटेल त्या ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
'कदाचित काही ठिकाणी लॉकडाउन लागू करावा लागणार आहे. म्हणून माझी सर्व लोकांना विनंती आहे की, लसीकरण करून घ्या, अनावश्यक गर्दी करू नका, मास्क वापरा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करा, जर कुठे नियमांचे पालन केले जात नसेल तर काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन लावावा लागणार आहे, एक दोन दिवसांमध्ये बैठक घेणार आहोत, त्यानंतर लॉकडाउनचा कडक निर्णय घ्यावा लागणार आहे', असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
राज्यात सध्या एकूण 99008 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी नव्या कोरोना रुग्ण संख्येनं उच्चांक गाठला. एकाच दिवसात तब्बल 13659 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर 9913 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2099207 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूणराज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.21% झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona hotspot, Coronavirus, Covid19, Fight covid