मुंबई, 9 जुलै : परदेशातील भारतीयांचा गणेशोत्सव आणि बदलापूर मधील गणपती बाप्पांची मूर्ती हे समीकरण सध्या जगभरात पोहचले आहे. मुंबईतील इको फ्रेंडली गणेश मूर्तींना परदेशात मोठी मागणी आहे. बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून हजारो गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जातात. यंदा चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून तब्बल 60 हजार पेक्षा जास्त गणेशमूर्ती परदेशात पाठवण्यात येत आहेत. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. गणेशमूर्तींची परदेशात निर्यात बदलापूरमधील चिंतामणी क्रिएशनच्या गणेश मूर्तींना परदेशात मोठी मागणी असते. उद्योजक निमेश जनवाड यांनी परदेशात गणेश मूर्तींची आयात निर्यात सुरु केल्यानंतर, परदेशातील भारतीय आणि चिंतामणी क्रिएशनचे एक वेगळे नाते तयार झाले आहे. मागील काही वर्षांपूर्वी निमेश जनवाड यांनी गणेश मूर्ती परदेशात पाठवण्यास सुरवात केली.
मूर्तिकार लागले तयारीला गणेशोत्सवाला अद्याप तीन महिने बाकी असले, तरी मूर्तिकार मात्र आत्तापासूनच तयारीला लागलेत. त्यातही परदेशात असलेल्या भारतीयांनाही बाप्पाचा पाहुणचार करता यावा, यासाठी बदलापूरचे तरुण उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशन्सकडून दरवर्षी हजारो गणपती बाप्पा परदेशात पाठवले जातात. बाप्पांचा हा प्रवास लांबचा असल्यानं अगदी 6 महिने आधीपासूनच गणपती बाप्पांच्या परदेशवारीला सुरुवात होते. यंदा 60 हजार मूर्तींची निर्यात मूर्ती एप्रिल मे महिन्यापासून परदेशात पाठवायला सुरवात होते. यंदा एप्रिल महिन्याच्या सुरवातीला कॅनडा आणि दुबईत गणेश मूर्ती पाठवण्यात आल्या आहेत. 30 दिवसांचा प्रवास करत या गणेशमूर्ती सातासमुद्रा पार पोहचतात. मागील वर्षी चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून 45 हजार गणेश मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या होत्या. तर यंदा तब्बल 60 हजार पेक्षा जास्त गणेश मूर्ती परदेशात पाठवण्याचे उद्दिष्ट जनवाड यांचे आहे. Temple Dress code : मंदिरामध्ये ड्रेस कोड असला पाहिजे का? छ.संभाजीनगरच्या तरुणांना काय वाटतं? VIDEO इको फ्रेंडली गणेशमूर्ती चिंतामणी क्रिएशन गेल्या सात वर्षापासून सुरू असून भारतीय सणांना लागणाऱ्या वस्तू तयार करून परदेशात पाठविण्यात येत. आमचं सर्वात मोठं लक्ष हे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती असून आम्ही त्या तयार करून परदेशात मोठ्या संख्येने पाठवत असतो. यामध्ये सर्व पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचा समावेश आहे. शाडू मातीची मूर्ती, कागदी गणेश मुर्ती, गाईच्या शेणापासून तयार होणाऱ्या मूर्ती या सर्व मूर्तींचा या मध्ये समावेश आहे. 6 इंचापासून - 7 फुटांपर्यंत गणेश मूर्ती तयार करून परदेशात पाठवतो, असं जनवाड सांगतात. भारतीय संस्कृतीचं जतन दरम्यान, दुबई आणि कॅनडा नंतर सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, बेहरिन, मॉरीसिस, यांसह इतर देशात गणेश मूर्ती पाठवण्यात येतात. गणेश मूर्ती पर्यावरण पूरक असल्याने परदेशातील भारतीय गणेशोत्सवाच्या 6 महिने आधीच आपली मूर्ती चिंतामणी क्रिएशनकडे बुक करतात. भारतीय संस्कृती आणि परंपरेच जतन झालं पाहिजे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव जगभरामध्ये साजरा झाला पाहिजे. हे आमचे उद्दिष्ट आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जगभरात एक लाखांपेक्षा जास्त गणेश मूर्ती आम्ही जगभरात पाठवणार आहोत, असं निमेश जनवाड सांगतात.