छत्रपती संभाजीनगर, 6 जुलै : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक मंदिरामध्ये फलक लावले जात आहेत. ते फलक म्हणजे मंदिरामध्ये दर्शनासाठी येताना ड्रेस कोड असावा. छत्रपती संभाजीनगरमधील 20 मंदिरांमध्येही हे फलक माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने लावण्यात आलेले आहेत. मंदिरात दर्शनासाठी येताना भारतीय परंपरेला साजेसे शोभेल असेच पारंपारिक वस्त्र परिधान करून महिलांनी आणि पुरुषांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी यावं असं या फलकामध्ये सांगितले आहे. या निर्णयाचे कुठे स्वागत होते तर कुठे याला विरोध होत आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून संमिश्र प्रतिक्रिया या निर्णयाबाबत येत आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरामधील तरुणांना या निर्णयाबद्दल काय वाटते जाणून घेऊया.
चांगले कपडे परिधान करून जावं हा निर्णय माझ्या दृष्टीने योग्यच आहे. मंदिर हे आपल्या परंपरेत एक महत्त्वाचा भाग आहे. आम्हाला सगळ्या गोष्टी मान्य आहेत. आपण आधुनिक झालो आहोत पण मंदिरामध्ये जाताना तरी आपण आपले पारंपरिक कपडे परिधान करून मंदिरात जावं. आधुनिकता ही इतर ठिकाणी दाखवावी. त्याचबरोबर मंदिरामध्ये लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व हे दर्शनासाठी येतात. त्यामुळे चांगले कपडे परिधान करून मंदिरामध्ये जावं मी या मताचा आहे, असं तरुण शिवशंकर शेरे याने सांगितले. हा निर्णय चुकीचा आपण कोणावरही बंधन हे लावू शकत नाही किंवा आपण प्रत्येक मुलीला हे सांगू शकत नाही की तुम्ही मंदिरात जाताना कंपल्सरी पंजाबी ड्रेस घालून जावं. ज्याला जे वाटतं ते घालून ते मंदिरात दर्शनाला जाऊ शकतो. मुली या एवढ्या लहान नाहीत की त्या मंदिरामध्ये छोटे कपडे घालून या दर्शनासाठी जातील. मी मंदिरामध्ये जीन्स पण घालून जाऊ शकते आणि पंजाबी ड्रेस पण घालून जाऊ शकते याचा मला अधिकार आहे. त्यामुळे मला तरी वाटतं की हा निर्णय चुकीचा आहे, असं तरुणी स्नेहल गिरीहिने सांगितले.
Solapur News: खरा श्रावण कधी? काय झाला गोंधळ, ऐका पंचागंकर्त्यांकडून VIDEO
हा निर्णय योग्यच दिवसेंदिवस आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. प्रत्येक जण मंदिरामध्ये मानसिक शांतीसाठी जात असतो. त्या ठिकाणी असं कंपल्शन नाही आहे की हेच कपडे घालून तुम्ही जावं पण आपली संस्कृती काय आहे आपल्याला कळायला पाहिजे ती आपण विसरत चाललो आहोत त्याचबरोबर मंदिरामध्ये सर्व लोक येतात तर ते योग्य दिसत नाही माझ्या दृष्टीने हा निर्णय योग्यच आहे, असं तरुण रितेश राठोड याने सांगितले. मी समर्थन करतो आपण आपल्या संस्कृतीला जपलं पाहिजे त्याचबरोबर मंदिर हे कुठला पिकनिक स्पॉट नसून तिथे तुम्ही जाऊन आधुनिक आहेत हे दाखवायच. तर मी या मताचा आहे की मंदिरामध्ये जो ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे त्याचे मी समर्थन करतो, असं मत तरुण अथर्व दिवणे याने व्यक्त केले. चांगले कपडे घालूनच दर्शनासाठी जावं आपण आधुनिक होत चाललेलो आहोत पण आपली संस्कृती आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहोत. देव असं म्हणत नाही की तुम्ही हे कपडे घाला किंवा घालू नका पण आपल्याला समजायला हवे की आपण चांगले कपडे घालूनच दर्शनासाठी जावं, असं तरुण उत्कर्ष उदावंत याने सांगितले.