मुंबई, 14 जुलै : आता पावसाळा सुरू झाला आहे. थंडगार पाऊस पडू लागला की गरमागरम तिखट भजी आणि चहा याचा आस्वाद घ्यायला प्रत्येकालाच आवडतो. पण जिभेचे हे चोचले पुरवण्यात तुमचं तोंडच कदाचित अडथळा ठरू शकतं? म्हणजे तुम्हालाही तोंड येण्याची (Mouth ulcer) समस्या असेल तर इच्छा असूनही तुम्ही चमचमती, तिखट, गरमागरम पदार्थांची साधी चवही चाखू शकत नाही.
तोंड येण्याची विविध कारणं (Mouth ulcer cause) असतात पण विशेषतः तो पोटाच्या व्याधींमुळे तोंड येतं. तोंडात विशिष्ट ठिकाणी, ओठांवर, जिभेवरची आणि तोंडाच्या आतली त्वचा सोलली जाते त्यामुळे जीभ लाल होते (Mouth ulcer symptoms). तोंडाला वास येतो. तोंड आल्याने आपल्याला नीट खायला येत नाही किंवा बोलताही येत नाही. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन कामावरही पडतो. राहूनराहून तोंड आलेल्या ठिकाणी दुखत राहतं, ठसठसतं, गरम, तिखट पदार्थ (Spicy Food) खाल्ल्यावर तिथं जास्त त्रास होतो. त्यामुळे आपले इतर कामांतही लक्ष लागत नाही. यावर मेडिकलमध्ये विविध ट्यूब्ज आणि औषधं मिळतात, पण काहींवर याचा परिणाम होत नाही. तर तोंड येण्याच्या त्रासावर काही घरगुती उपायांची (Home remedies for Mouth Ulcers) आपण माहिती घेऊया.
1. बेकिंग सोडा(Baking Soda) – तोंडातल्या अल्सरवर उपाय करण्यासाठी बेकिंग सोडा उत्तम उपाय आहे. कोमट पाण्यात बेकिंग सोडा घालून त्या पाण्याने काहीवेळा गुळण्या केल्याने त्रास कमी होतो.
2. बर्फ – जर तोंड पोटातील उष्णतेमुळे आलं असेल तर बर्फ हा त्यावरील योग्य उपाय आहे. सोलवटलेल्या जागेवर बर्फाचा तुकडा (Ice Piece) चोळावा आणि लाळ खाली गळत असेल तर गळू द्यावी. यामुळे त्या जागी थंडावा मिळतो आणि त्यातून होणारा दाह कमी होतो.
हे वाचा - घरबसल्या करा अशी Nail test; नखांवरूनच ओळखा तुम्हाला कोणता आजार आहे
3. तुरटी ( Alum) - तुरटी ही कित्येक रोगांसाठी उपयुक्त असते. त्याचप्रकारे ती तोंड येण्याच्या आजारासाठीदेखील उपयुक्त मानली जाते. तोंड आलेल्या ठिकाणी तुरटी फिरवल्याने त्या ठिकाणी होणारा त्रास कमी होतो. पण कधीकधी तुरटीमुळे तोंड आलेल्या ठिकाणी चुरचुरही होऊ शकते.
4. कोमट पाणी - कोमट पाणी हा तर सर्वात सोपा उपाय आहे. कोमट पाण्यात एक चमचा मीठ घालून दिवसातून काहीवेळा गुळण्या केल्याने तुम्हाला तोंडाला आराम मिळेल.
5. वेलदोडा (Cardamom) – तोंड आलं असेल तर हिरवा वेलदोडादेखील उत्तम उपायांपैकी एक आहे. वेलदोड्याचे दाणे बारीक करून त्यामध्ये मधाचे काही थेंब टाकून ते तोंड आलेल्या भागावर लावावे. यामुळे, तोंडातील उष्णता कमी होते आणि आराम मिळतो.
6. हळद (Turmeric) - तोंड येण्यावर हळद सकारात्मक परिणाम करते. त्यामुळे थोड्या पाण्यात काही प्रमाणात हळद टाकून ती उकळावी आणि त्या पाण्याने गुळण्या कराव्यात, यामुळे आलेलं तोंड कमी होईल.
हे वाचा - थोडंसं काम केल्यावर येणारा थकवा सामान्य नव्हे; शरीर देतंय गंभीर आजाराचं संकेत
तोंड येणं हे बद्धकोष्ठता, पोटातील उष्णता, पचनासंबंधित समस्यांशी निगडित असतं. त्यामुळे जर आपल्याला अशा प्रकारची समस्या सारखीच उद्भवत असेल असेल तर अतितिखट, गरम पदार्थ खाणं टाळावं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Home remedies, Lifestyle, Mouth ulcer