नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : पती-पत्नीच्या नात्यात प्रेम आणि विश्वासाबरोबरच आदरही महत्त्वाचा असतो. एकमेकांशी संवाद साधताना, त्यांच्याविषयी इतरांमध्ये बोलताना जोडीदाराचा योग्य आदर राखला गेला नाही, तर मनं दुखावतात. काही वेळेला एकमेकांना गृहित धरलं गेल्यानं किंवा मजामस्करीचा अतिरेक झाल्यानं जोडीदाराचा अनादर होतो. सायकोथेरेपिस्ट एमिली एच. सॅन्डर्स यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या संदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी जोडीदाराविषयी आदर व्यक्त करण्याचे कोणकोणते (Ways To Respect Each Other) मार्ग आहेत, याबाबत सांगितलं आहे. हिंदुस्थान टाइम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. आदर हा सुखी आणि प्रगल्भ नात्याचा पाया असतो. “प्रत्येक नात्यामध्ये कठीण काळ येत असतो. मात्र अशावेळी एकमेकांविषयीचा आदर कायम ठेवणं गरजेचं असतं,” असं सायकोथेरेपिस्ट एमिली एच. सॅन्डर्स यांनी म्हटलं आहे. एकमेकांशी किंवा एकमेकांविषयी बोलताना काही गोष्टी पाळल्या तर आदर राखणं सोपं होऊ शकतं. ‘Husband’ शब्दावरुन राडा; महिलांनी केला विरोध, परंतू नेमका काय आहे याचा अर्थ? जोडीदाराशी मजा-मस्करी तर नेहमीच सुरू असते. मात्र त्याचा अतिरेक झाला किंवा त्याची मर्यादा पाळली गेली नाही, तर यामुळे समोरच्याचा अनादर होऊ शकतो. माणूस म्हणून जगताना काही ना काही चुका होतात. अशा वेळी त्या चुकांबद्दल फार ताणून न धरता क्षमा करणं (Forgive) खूप अवघड असलं तरी नात्यासाठी महत्त्वाचं असतं. जोडीदाराला त्याची चूक समजून स्वतःला बदलण्यासाठी वेळ दिला पाहिजे. चांगलं बोलणं (Good Talks) नाती जोडतं. म्हणूनच नातं टिकवण्यासाठी जोडीदाराशी चांगलं बोलणं ही आदर देण्याची पहिली पायरी आहे. केवळ जोडीदाराशी नाही, तर जोडीदाराविषयीही इतरांसमोर चांगलं बोलल्यानं एकमेकांविषयीचा आदर वाढतो. नात्यात वाद, भांडणं होतातच. अशा वेळी जोडीदाराला त्याचं म्हणणं मांडू दिलं पाहिजे. मध्ये-मध्ये बोलणं तोडणं, निष्कर्ष काढणं टाळलं पाहिजे. जोडीदाराविषयी आदर दाखवताना त्याचं बोलणं काळजीपूर्वक (Listen Carefully) ऐकणं, त्यावर चर्चा करणं गरजेचं असतं. नाहीतर समोरच्याच्या मनात कमी लेखल्याची भावना निर्माण होऊ शकते. नात्यात दुरावा आला, हे कसं ओळखाल? तज्ज्ञांनी सांगितल्या महत्त्वपूर्ण गोष्टी आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना आपण करत असतो. त्या कठीण परिस्थितीत जोडीदारासोबत प्रेमाची, काळजीची वागणूक ठेवली पाहिजे. नाहीतर त्यांना एकटं वाटू शकतं. नातं टिकवण्याची जबाबदारी दोघांची असते. त्यासाठी दोघंही प्रयत्न करत असतात. याची जाणीव दोघांनीही ठेवणं अपेक्षित असतं. आदर व्यक्त करण्याचा तो एक भागच असतो. एखादी चूक झाली तर ती कबूल करणंही महत्त्वाचं असतं. त्यात कमीपणा वाटू देऊ नये. तसंच छोट्या-छोट्या गोष्टींचं कौतुकही करायला विसरू नये. अशा छोट्या-छोट्या गोष्टी नात्याला हुरुप देणाऱ्या असतात. एकमेकांना आदर दिल्यानं नातं अधिक मजबूत होतं. काहीवेळा ही गोष्ट लक्षात येत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक गोष्टी कराव्या लागतात. त्यानं नातं समृद्ध होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.