नवी दिल्ली, 17 मार्च : अनेक देशांमध्ये AstraZeneca च्या कोरोना लशीवर (corona vaccine) तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ही लस दिलेल्या व्यक्तींना गंभीर समस्या उद्भवल्यानंतर ही लस देणं बंद करण्यात आलं आहे. दरम्यान भारतात ही लस कोविशिल्ड नावानं दिली जाते. भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनं अॅस्ट्राझेनका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या मदतीने ही लस तयार केली आहे. त्यामुळे इतर देशांनी या लशीवर बंदी घातल्यानंतर भारतात नेमकं काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान याबाबत आता भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
भारतात अॅस्ट्राझेनकाच्या लशीचं लसीकरण थांबवलं जाणार नाही, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं की, युरोपिअन मेडिसीन एजन्सीने या लशीबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. तसंच जागतिक आरोग्य संघटनेनंदेखील लस देणं बंद करण्याची गरज नाही, असं सांगितलं आहे. भारतातही या लशीचं निरीक्षण नोंदवण्यात आलं, त्यामध्ये कोणतेही गंभीर परिणाम दिसून आले नाहीत. त्यामुळे कुणीही चिंता करण्याची गरज नाही. लस घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
हे वाचा - 'कृपया कोरोना लस वाया घालवू नका', पंतप्रधान मोदींची कळकळीची विनंती
अॅस्ट्राझेन्का कोविड-19 लशीचा वापर तात्पुरता थांबवणारा डेन्मार्क हा पहिला देश ठरला आहे. कारण गत आठवड्यातील अहवालानुसार, ही लस घेतल्यानंतर अनेक लोकांच्या शरीरात रक्ताची गुठळी तयार होत असल्याचं दिसून आलं. त्यापैकी एका व्यक्तीच्या शरीरात लशीचा एक डोस घेतल्यानंतर रक्ताच्या अनेक गुठळ्या झाल्याचं दिसून आलं. अवघ्या दहा दिवसांतच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याबाबत डेनिश आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की दोन आठवड्यांसाठी लसीकरण थांबवण्यात आलं आहे. या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. मात्र लस आणि रक्ताच्या गुठळ्या यांच्या काही संबंध आहे का हे आत्ताच सांगता येणार नाही.
नॉर्वे, बल्गेरिया, आईसलँड, थायलंड आणि कॉंगो यांनी अशाच पध्दतीचा निर्णय घेतला आहे. नॉर्वेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, वय वर्षे 50 खालील चार व्यक्तींनी अॅस्ट्राझेन्का लस घेतल्यानंतर त्यांच्या शरीरातील प्लेटलेटस (Platelaets) कमी होऊन त्यांना तीव्र रक्तस्त्राव झाला.
हे वाचा - ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला तर..., पंतप्रधानांनी व्यक्त केली भीती
रविवारी आयर्लँड आणि नेदरलँडने देखील अॅस्ट्राझेन्का लस वापरणं तात्पुरतं थांबवत असल्याचे जाहीर केलं. याबाबत नेदरलँडमधील अधिकाऱ्यांनी म्हटलं की खबरदारीचा उपाय म्हणून अॅस्ट्राझेन्का लस देणं थांबवण्यात आलं आहे. सावधगिरी पाळण्यात आम्ही चूक केली. परंतु आता खबरदारीचा उपाय म्हणून थांबणं शहाणपणाचं ठरेल, असं डचचे आरोग्यमंत्री ह्युगो डी जोंगे म्हणाले. मात्र अनेक देशांमध्ये ही लस देणं सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine