मनीष कुमार/लखनऊ, 18 ऑगस्ट : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावासाठी मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज, डिसइन्फेक्ट स्प्रे अशा वस्तूंचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात आला आहे. या वस्तू वेगवेगळ्या प्रकारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र सध्या एका छोट्या पॅकेटची चर्चा सुरू आहे. हे पॅकेट कोरोनापासून बचाव करतं, असा दावा केला जातो आहे.
अनेक लोक हे पॅकेट आपल्या खिशाला लटकवून किंवा गळ्यात घालून फिरत आहे. या पॅकेटपासून एक घनमीटर परिसरात येताच कोरोनाचा नाश होतो असा दावा केला जातो आहे. कोरोनापासून बचावासाठी हे पॅकेट उत्तम असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र हे खरंच शक्य आहे, याबाबत न्यूज 18 ने याचं फॅक्ट चेक केलं.
पॅकेट खोलल्यानंतर 60 दिवस याची वैधता असल्याचं सांगितलं जातं आहे. या पॅकेटची किंमत 150 ते 250 रुपये आहे आणि या पॅकेटची मागणी वाढल्याचंही सांगितलं जातं आहे.
लखनऊच्या गोमतीनगरमधील औषध विक्रेते अखिलेश यादव यांनी न्यूज 18 ला सांगितलं, "सध्या या पॅकेटची मागणी खूप वाढली आहे. त्यांच्या दुकानातही याचा स्टॉक आहे. हे पॅकेट कोणत्या कंपनीचं आहे आणि कुठून मागवण्यात आलं आहे याबाबत विचारलं असता अखिलेश यांनी आपल्याला कंपनीबाबत माहिती नाही मात्र जपानहून हे पॅकेट आणल्याचं सांगितलं जातं आहे"
हे वाचा - देशातील कोरोनाबाधितांची संख्या 27 लाख पार, महाराष्ट्रातील आकडेवारीनं दिला दिलासा
या पॅकेटचा वापर करणाऱ्या कानपूरच्या गोल्डी शर्माने सांगितलं, त्याच्या वडिलांनी त्याला हे पॅकेट दिलं आहे आणि हे पॅकेट गळ्यात घातल्याने कोरोनाचा धोका नाही, असं त्यांनी सांगितलं. आपल्या अनेक मित्रांनीही याचा वापर सुरू केल्याचं त्याने सांगितलं.
क्लोरीन बेस्ड मटेरिअल असण्याची शक्यता
एका हेल्थ कंपनीत काम करणाऱ्या मायक्रोबायोलॉजिस्टने आपलं नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं की, या पॅकेटबाबत त्यांना माहिती आहे. लोक एक सुरक्षा म्हणून याचा वापर करतात. या पॅकेटवर डिसक्रिप्शन लिहिलेलं आहे, त्यानुसार त्यामध्ये एखादं क्लोरीन बेस्ड घटक असल्याचं समजतं. तसंही सॅनिटायझेशनसाठी हाइपो क्लोराइडचा वापर केला जातो. या पॅकेटमध्येही क्लोरिन बेस्ड घटक आहे जो हवेसह प्रतिक्रिया करून असेच काहीसे रसायनं सोडतो आणि व्हायरसचा धोका कमी होऊ शकतो.
हे वाचा - बायको जितकी वजनदार नवऱ्याला तितकी लीटर बिअर फ्री; अशी अनोखी स्पर्धा कधी पाहिलीत?
मात्र हे तितकं विश्वसनीय नाही. कारण या पॅकेटमधून जो फ्युम बाहेर येतो तो शरीराच्या चहूबाजूने पसरू शकत नाही. हवा ज्या दिशेनं वाहते त्यादिशेनं तो जाईल. बंद वातावरणात याचा परिणाम थोडा होऊ शकतो. हे पॅकेट मास्क किंवा हँड सॅनिटायझरला पर्याय अजिबात होऊ शकत नाही. दुसरं म्हणजे जर हे पॅकेट फाटलं आणि त्याच्या आतील घटक त्वचेच्या संपर्कात आला तर वेगळंच नुकसान होऊ शकतं, असंही त्यांनी सांगितलं.
आरोग्य विभागानेही फेटाळला दावा
दरम्यान उत्तर प्रदेशचे आरोग्य महासंचालक डॉ. डीएस नेगी यांनी या पॅकेटच्या उपयोगाबाबतचा दावा फेटाळला आहे. त्यांनी सांगितलं या अशा वायफळ वस्तू आहे, यापासून कोणताही बचाव होत नाही. असा उपाय कधीच सूचवण्यात आला नाही किंवा कोणत्याही संस्थेने याचा वापर करण्याचा सल्ला दिलेला नाही. आम्ही आयसीएमआरने सांगितलेल्या गाइडलाइन्सप्रमाणेच बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घेतो. लोकांनीही याबाबत जागरूक राहायला हवं. सरकारने सांगितलेल्या नियमांचंच पालन करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus