मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

#कायद्याचंबोला : आता मीच मालक म्हणून भाडेकरू घरच सोडेना; घरमालकाने काय करावं?

#कायद्याचंबोला : आता मीच मालक म्हणून भाडेकरू घरच सोडेना; घरमालकाने काय करावं?

भाडेकरू घरावर ताबा सांगू शकतो का?

भाडेकरू घरावर ताबा सांगू शकतो का?

Landlord And Tenant Laws: अनेकदा घरमालकाला भीती असते की जर एखादा भाडेकरू त्याच्या घरात जास्त काळ राहिला तर तो कायमचा ताबा घेऊ शकतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

दिपक फार्मा कंपनीत कामाला आहे. नुकतीच घराची वाटणी झाल्यानंतर त्याला दोन फ्लॅट मिळाले. एकामध्ये तो राहत होतो तर दुसरा भाड्याने दिला होता. वाटणी होईपर्यंत भाडेकरुंचं सर्व वडीलच पाहत होते. मात्र, आता त्यांनी या सर्वांतून निवृत्ती स्वीकारली होती. दिपकने त्याच्या वाट्याला आलेल्या फ्लॅटचं नुतनीकरण करण्याचं ठरवलं. जेणेकरुन घराचं भाडं वाढवता येईल. दुसऱ्या दिवशी भाडेकरुला त्यांनी आपला निर्णय कळवला. घराचं रेनोवेशन करायचं म्हणजे घर खाली करावे लागेल. नंतर भाडेही वाढवणार असल्याचे समजल्यानंतर भाडेकरुने घर खाली करण्यास नकार दिला. गेल्या बारा वर्षांपासून आम्ही इथं राहतोय. तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही घर खाली करणार नाही, असं थेट उत्तर त्याला मिळालं. हे एकून दिपकला तर टेंशनच आलं. काय करावं काही सुधरेना.

Kaydyach bola Legal

कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.


तुमच्याही आसपास अशा घटना घडलेल्या तुम्ही वाचल्या किंवा ऐकल्या असतील. अनेकदा एखादा भाडेकरू दीर्घकाळ राहून घरावर हक्क सांगेल अशी भिती घरमालकांना वाटते. कायदा देखील काही विशिष्ट परिस्थितीत भाडेकरूंना दीर्घ कालावधीसाठी घर ताब्यात ठेवल्यानंतर मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार देतो. अशा परिस्थितीत, कायदा काय सांगतो? काही काळानंतर भाडेकरू खरोखरच मालमत्तेवर मालकी सिद्ध करू शकतो का? किंवा घरमालक कधीही भाडेकरूला घर सोडण्यास सांगू शकतो का? हे घरमालक आणि भाडेकरू दोघांनाही माहीत असणे आवश्यक आहे.

कायदा काय सांगतो?

वास्तविक, कोणत्याही भाडेकरुचा कधीही घरमालकाच्या घरावर हक्क नसतो. मात्र, काही परिस्थितींमध्ये, भाड्याने राहणारी व्यक्ती घरमालकाच्या घरावर हक्क सांगू शकते. परंतु, 'मालमत्ता हस्तांतरण कायद्यानुसार, हे एडवर्स पजेशनमध्ये होत नाही. यामध्ये मालमत्ता ताब्यात असलेल्या व्यक्तीलाही ती विकण्याचा अधिकार आहे. म्हणजे, एखाद्या मालमत्तेवर 12 वर्षे एडवर्स पजेशन ठेवल्यास, त्याला मालमत्तेवर हक्क मिळतो. एडवर्स पजेशन म्हणजे अशी परिस्थिती आहे, ज्यामध्ये मालमत्तेचा वास्तविक मालक निर्धारित कालावधीत मालमत्तेतून अतिक्रमणकर्त्याला काढून टाकण्यात अयशस्वी झाल्यामुळे त्याचे मालकी हक्क गमावतो.

वाचा - भाडेकरू म्हणून घरमालकाची कटकट सहन करू नका; तुम्हालाही आहेत हे अधिकार

उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने त्याची मालमत्ता त्याच्या ओळखीच्या व्यक्तीला तेथे राहण्यासाठी दिली असेल आणि तो तेथे 11 वर्षांपेक्षा जास्त काळ राहत असेल, तर तो त्या मालमत्तेवर हक्क सांगू शकतो. याउलट भाडेकरू असेल आणि घरमालक वेळोवेळी भाडे करार करत असेल, तर त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. या स्थितीत त्यांची मालमत्ता कोणीही ताब्यात घेऊ शकत नाही.

काय आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय?

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात म्हटले होते की लिमिटेशन अ‍ॅक्ट 1963 नुसार, खाजगी स्थावर मालमत्तेवरील लिमिटेशन (वैधानिक) कालावधी 12 वर्षे आहे, तर सरकारी स्थावर मालमत्तेच्या बाबतीत तो 30 वर्षे आहे. हा कालावधी ताब्यात घेण्याच्या दिवसापासून सुरू होतो. 12 वर्षांहून अधिक काळ स्थावर मालमत्तेवर ताबा असलेल्या व्यक्तीसोबत कायदा आहे. 12 वर्षांनंतर जर त्याला तेथून काढून टाकले गेले, तर त्याला पुन्हा मालमत्ता मिळविण्यासाठी कायद्याने अधिकार दिला आहे.

त्रास टाळण्यासाठी काय करावे?

घरमालक आणि भाडकरू दोघांनाही भविष्यात होणारा त्रास टाळायचा असेल तर भाडेकरार करणे आवश्यक आहे. भाडेकरारात सर्व अटी आणि नियम दोघांच्या सहमतीने लिहले जातात. परिणामी काही परिस्थिती उद्भवली तर दोघांनाही कायद्याने काही अधिकार दिले आहेत.(कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)

First published:

Tags: Law, Legal