नवी दिल्ली, 20 एप्रिल: जगभरात सध्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) विळख्यातून सुटण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. यासाठी सर्व देश एकत्र येऊन लस (Corona vaccine) उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक औषध निर्मात्या कंपन्या लस निर्मितीत गुंतल्या आहेत. काही कंपनी आपल्या लशीला परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. औषधनिर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या (Johnson & Johnson) कंपनीनेही आपल्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांसाठी (Clinical Trials) भारताकडे (India) परवानगी मागितली आहे.
सध्या तातडीच्या वापरासाठी लशीच्या चाचण्यांच्या अनिवार्यतेच्या अटी शिथील करण्यात आल्या असून, जागतिक आरोग्य संघटना आणि विविध देशांमधील औषध नियामक यंत्रणा ठराविक चाचण्या पूर्ण केलेल्या लशींना मान्यता देत आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीलादेखील जागतिक आरोग्य संघटनेसह (World Health Organization) युरोप, अमेरिका आणि जपानमधील नियामकांची परवानगी मिळाली असून आता कंपनीने भारताकडे अर्ज केला आहे.
हे वाचा - भारतात कोरोना लशींचा अपव्यय; मोठ्या प्रमाणात लशींचे डोस वाया
अमेरिका, युरोप किंवा जपानमधील नियामकांकडून तसंच जागतिक आरोग्य संघटनेकडून कोणत्याही प्रकारची मान्यता प्राप्त झालेल्या लशींना तातडीच्या वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने भारतीय औषध नियामक संस्थेकडे अर्ज केला आहे. लशीच्या आयातीकरताही (Import License) परवान्याची मागणी केली आहे. आपल्या अर्जावरील निर्णयासाठी लवकरात लवकर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या (CDSCO) कोविड-19 च्या तज्ज्ञ समितीची बैठक बोलवण्याची विनंतीही कंपनीने केली आहे.
हे वाचा - Corona Vaccine: केंद्र सरकार Serum आणि Bharat Biotech ला देणार आगाऊ 4500 कोटी
जॉन्सन अँड जॉन्सनने 12 एप्रिल रोजी सुगम (Sugam) ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून ग्लोबल क्लिनिकल ट्रायल (Global Clinical Trial) विभागात अर्ज केला होता. मात्र तांत्रिकअडचणीमुळे कंपनीने पुन्हा सोमवारी अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनची लस 3 ते 8 डिग्री सेल्सियस तापमानावर 3 महिन्यांसाठी ठेवता येते. या लशीचा एकच डोस घ्यावा लागतो. सध्या देशात परवानगी देण्यात आलेल्या तिन्ही लशींचे दोन डोस घ्यावे लागतात.या लशीची किंमत 8.5 डॉलर ते 10 डॉलर म्हणजे साधारण 637 ते 750 रुपये असू शकते. माध्यमांच्या अहवालानुसार, जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीचा परिणाम जगभरात 66 टक्के तर अमेरिकेत 72 टक्के दिसून आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, India, Lifestyle, Who