Corona Vaccination : कधी पूर्ण होणार देशातील 18+ लोकांचं लसीकरण?

Corona Vaccination : कधी पूर्ण होणार देशातील 18+ लोकांचं लसीकरण?

18+ नागरिकांना कोरोना लस (Corona vaccination) देणं सुरू होताच लसीकरण मोहिमेवर परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे.

  • Share this:

मुंबई, 09 मे : देशातल्या कोरोना लसीकरणाच्या मोहिमेचा वेग (Corona Vaccination) त्याने गाठलेल्या सर्वोच्च पातळीच्या तुलनेत जवळपास निम्म्यावर आला आहे. 5 एप्रिल रोजी देशभरात 43 लाखांहून अधिक जणांचं लसीकरण (Covid 19 Vaccination) झालं होतं. 6 मे रोजी हा आकडा केवळ 23.70 लाख एवढाच होता. म्हणजेच लसीकरणाच्या वेगात तब्बल 45 टक्के घट झाली आहे. या वेगाने 18 वर्षांवरच्या सर्वांचं लसीकरण करायचं झालं, तर भारतातल्या सगळ्या पात्र लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण होण्यासाठी सुमारे 32 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. कसं ते पाहू या.

सध्या देशात नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढते आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. असं असतानाही प्रत्यक्षात भारतातल्या लसीकरणाचा वेग दर आठवड्याला कमी कमी होत चालला आहे. तीन ते नऊ एप्रिल या आठवड्यात देशभरात 2.48 कोटी डोस दिले गेले. 10 ते 16 एप्रिल या आठवड्यात 2.07 कोटी, 17 ते 23 एप्रिल या आठवड्यात 1.7 कोटी, 24 ते 30 एप्रिल या आठवड्यात 1.48 कोटी, तर मे महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांत केवळ 99.83 लाख डोस दिले गेले. म्हणजेच जवळपास 50 टक्के घट झाली आहे. एप्रिल महिन्यात देशात दररोज सरासरी 30 लाख लोकांचं लसीकरण होत होतं. मे महिन्यातल्या आतापर्यंतच्या दिवसांचा विचार केला, तर ते प्रति दिन 16 लाख एवढं म्हणजे 44.46 टक्के खाली आलं आहे.

2011 च्या जनगणनेनुसार, एक एप्रिलपासून सुरू झालेल्या लसीकरणाच्या टप्प्यात (45) 34.5 कोटी लोकांचं लसीकरण व्हायला हवं आहे. तसंच एक मेपासून 18 वर्षांवरच्या व्यक्तीही लसीकरणास पात्र झाल्या आहेत. त्यामुळे लसीकरणास पात्र असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या आता 94 कोटी आहे. एक किंवा दोन डोस घेतलेल्या एकूण 12.71 कोटी लोकांना वगळलं, तर अजूनही तब्बल 81कोटींहूनअधिक लोकांचं लसीकरण होणं बाकी आहे.

हे वाचा - कोरोनातून वाचले पण दृष्टी गेली; Mucormycosis मुळे काढावे लागले 8 जणांचे डोळे

लसीकरणाच्या प्रमाणात घट झाल्याचं मुख्य कारण म्हणजे लशींचा तुटवडा आणि लशीसाठी पात्र (Eligible for Vaccination) असलेल्या नागरिकांच्या संख्येत झालेली वाढ.

रोजच्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यावर राज्यांनी त्यांच्या लसीकरणाचा वेग वाढवला. मात्र त्या वेगाला पुरेल एवढा लशींचा साठा नसल्याने तो वेग कमी झाला. महाराष्ट्र हे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेलं राज्य. महाराष्ट्रात रोज आठ लाख लोकांचं लसीकरण होऊ शकतं. मात्र राज्याच्या साठ्यात फक्त 4,84,287 डोसच शिल्लक आहेत.

केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना 17.35 कोटी डोस दिले आहेत. या पुरवठ्यात नजीकच्या भविष्यात वाढ करता येणार नाही. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या भारतातल्या दोन्ही लस उत्पादक कंपन्या सध्या दर महिन्याला सात ते आठ कोटी डोसेसची निर्मिती करत आहेत. प्रत्यक्षात लसीकरण मोहीम पूर्ण क्षमतेने राबवायची असेल, तर महिन्याला 20 ते 25 कोटी डोसेसची गरज आहे. उत्पादनक्षमता एका रात्रीत वाढवता येणार नाही, असं सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.

हे वाचा - लस मिळाली नाही, पण प्रेम मिळालं, लग्नानंतर जोडप्याने मानले राजेश टोपेंचे आभार


या सगळ्याचा परिणाम काय? केवळ 12 राज्यं आणि जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश या ठिकाणीच 18 वर्षांवरच्या लोकसंख्येचं लसीकरण अंशतः सुरू झालं आहे. आतापर्यंत या वयोगटातल्या केवळ 11.64 लाख व्यक्तींचं लसीकरण झालं असून, प्रति दिन सरासरी 1.94 लाख व्यक्ती एवढीच आहे. या 12 राज्यांपैकी छत्तीसगड आणि राजस्थान या दोन राज्यांनी नुकतंच जाहीर केलं आहे, की लशींच्या तुटवड्यामुळे तिथे लसीकरण थांबवण्यात येत आहे. तमिळनाडू, केरळ या राज्यांनी अद्याप या वयोगटासाठी लसीकरण सुरूच केलेलं नाही. कोविडची स्थिती भयानक असलेल्या राज्यांत 45 वर्षांवरच्या नागरिकांसाठीही लशींचा तुटवडा आहे.

देशातल्या 18 वर्षांवरच्या सर्वांचा विचार केला, तर केवळ17.55 टक्के लोकसंख्येला किमान पहिला डोस देऊन झाला आहे. तसंच, केवळ 3.29 कोटी म्हणजे 3.5 टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस देऊन झाले आहेत. एप्रिल महिन्यात 8.98 कोटी डोस देण्यात आले. त्या वेगाने संपूर्ण भारतातल्या 18 वर्षांवरच्या सर्व लोकसंख्येला पहिला डोस देण्यासाठीच नऊ महिने लागतील. दुसऱ्या डोसचा विचार केला, तर त्यासाठी 32 हून अधिक महिने लागू शकतात. एप्रिल महिन्यात 2.79 कोटी लोकांचा दुसरा डोस घेऊन झाला. म्हणजे 91.21 कोटी लोकसंख्या उरली आहे. त्यांचे दोन्ही डोस पूर्ण होण्यासाठी 32 महिन्यांहून अधिक काळ लागू शकतो.

First published: May 9, 2021, 9:35 AM IST

ताज्या बातम्या