कोरोनामुळे डायबेटिजचा धोका? रुग्णांच्या शरीरातील वाढत्या ब्लड शुगरमुळे चिंता

कोरोनामुळे डायबेटिजचा धोका? रुग्णांच्या शरीरातील वाढत्या ब्लड शुगरमुळे चिंता

मधुमेह (diabetes) असलेल्या रुग्णांना कोरोनाचा (coronavirus) धोका आहे मात्र हा परिणाम उलटही होऊ शकतो का? याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर : मधुमेही रुग्णांना (diabetes patient) कोरोना संसर्गाचा (coronavirus) धोका हा सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुळे रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत (blood sugar) वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता ज्या रुग्णांना मधुमेह नाही अशा रुग्णांमध्येही रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढत असल्याने डॉक्टरांसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. म्हणून कोरोनातून बरे झाल्यानंतरही आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत.

मधुमेह आणि हृदयविकार असणाऱ्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना कोरोना संसर्गाचा धोका होण्याची शक्यता अधिक असते. इतकंच नाहीतर कोरोनातून बरे झाल्यानंतरही रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतो.

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रूग्णालयातील इंटरनल मेडिकल एक्सपर्ट आणि संचालक डॉ. बेहरम पारडीवाला म्हणाले की, "मधुमेह नसलेल्या व्यक्तींमध्येही कोरोनातून बरे झाल्यानंतर उच्च रक्तातील साखरेची पातळी निर्माण होऊ शकते. याच मुख्य कारण कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे लोकांमध्ये मानसिक ताणतणाव वाढला आहे. या वाढत्या तणावामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत आहे"

हे वाचा -  पौष्टिक आहेत म्हणून अति खाऊ नका; 5 पदार्थांमुळे वाढू शकतं तुमचं वजन

रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास अवयव निकामी होण्याचीही दाट शक्यता असते. त्यामुळे वाढत्या रक्तातील साखरेच्या पातळीकडे दुर्लक्ष करू नका. कोरोनातून पूर्णपणे ठिक झाल्यानंतरही रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनशैलीत आवश्यक तो बदल करा"

रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावं?

1) रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होईल अशा खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा

2) दररोज किमान अर्धा-एक तास व्यायाम करा. धावणं, पोहोणं आणि सायकल चालवणं यांसारख्या शारीरिक क्रिया करणं अतिशय फायदेशीर ठरू शकतं. यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते.

3) धान्य, शेंगदाणे आणि डाळी यांचा जेवणात समावेश करा. याशिवाय नियमित ताजी फळे आणि भाज्या खाव्यात.

4) हायड्रेटेड राहण्यासाठी आपण पुरेसे पाणी पिणं आवश्यक आहे.

हे वाचा - मधुमेहावर उपचार आणि कोरोनापासून बचाव; एक औषध महिलांसाठी ठरतंय फायद्याचं

5) प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाणे टाळावेत, जेवणात अधिक मिठाचा समावेश करू नयेत.

6) दारू पिणं टाळावं

7) तणावामुळे सुद्धा बऱ्याचदा रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यामुळे योगाभ्यास आणि ध्यान करणं आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

8) डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर वेळोवेळी तपासणी करून घ्या. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं वेळेत घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याविना कोणतंही औषध घेऊ नका, यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

9) रात्रीच्या वेळी किमान आठ तास झोप घेणं गरजेचं आहे. यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

Published by: Priya Lad
First published: December 24, 2020, 7:54 AM IST

ताज्या बातम्या