मुंबई, 19 नोव्हेंबर : चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता फार महत्त्वाची ठरते. शरीर स्वच्छतेसह आपण राहत असलेल्या जागेची आणि परिसराचीदेखील स्वच्छता गरजेची आहे. स्वच्छ आणि सुरक्षित जीवन जगण्यासाठी घरामध्ये टॉयलेट म्हणजेच शौचालय असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होतं. आपल्याकडे दोन प्रकारची टॉयलेट वापरली जातात, एक वेस्टर्न स्टाईल आणि दुसरं इंडियन स्टाईल. या दोन्हींपैकी कोणत्या प्रकारचं टॉयलेट जास्त चांगलं आहे, याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? कोणतं चांगले आहे. याबाबत रिचर्सदेखील झाला आहे. या रिसर्चनुसार दोन्ही प्रकारच्या टॉयलेटचे काही फायदे आणि तोटे समोर आले आहेत. ‘ एबीपी ’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वेळ आणि गरजेनुसार दोन्ही टॉयलेटचं स्वतःचं वेगळं महत्त्व आहे. पण, टॉयलेट कितीही दर्जेदार आणि आरामदायी असलं तरी त्याचे काही फायदे-तोटे आहेत. याबाबत या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. वेस्टर्न टॉयलेटचे फायदे - वेस्टर्न स्टाईल टॉयलेट हे इंडियन स्टाईलपेक्षा अधिक आरामदायक मानलं जातं. याचा वापर केल्याने तुमच्या कोणत्याही स्नायूंवर ताण येत नाही. विशेषतः वृद्ध व्यक्तींसाठी वेस्टर्न टॉयलेट्स सोयीची आहेत. ज्या व्यक्ती ऑस्टियोआर्थ्रारायटिसच्या रुग्ण आहेत किंवा ज्यांची नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे, ज्यांना जास्त उठण्याची आणि बसण्याची परवानगी नाही, अशांसाठी वेस्टर्न स्टाईल टॉयलेट उपयुक्त ठरतं. वेस्टर्न टॉयलेटचे तोटे - वेस्टर्न स्टाईल टॉयलेटच्या फायद्यांपेक्षा तोट्यांची संख्या आणि गांभीर्य जास्त आहे. त्यामुळे त्याचा वापर करण्यापूर्वी आपल्याला हे तोटे माहिती पाहिजेत. 1) एका संशोधनानुसार, इंडियन स्टाईल टॉयलेटमधील बैठक आरोग्यासाठी जास्त चांगली आहे. त्यामध्ये संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. वेस्टर्न स्टाईल टॉयलेटमधील बैठक खुर्चीवर बसल्याप्रमाणे आहे. यामध्ये शरीराची फारशी हालचाल होत नाही. 2) इंडियन टॉयलेटमध्ये बसल्यानंतर फ्रेश व्हायला साधारण दोन ते तीन मिनिटे लागतात. पण, आज वेस्टर्न टॉयलेटमध्ये पाच ते 10 मिनिटं बसूनही व्यक्ती फ्रेश होत नाही. ही बाब आपल्यासाठी अनेक समस्यांचं कारण बनू शकते. 3) इंडियन टॉयलेटपेक्षा वेस्टर्न टॉयलेटमध्ये जास्त पाणी लागते. म्हणजे त्यात अनेक लिटर पाणी वाया जातं. शिवाय जास्त पाण्याचा वापर करूनही स्वच्छता राखली जात नाही. त्यामुळे टॉयलेट पेपरचा वापर करावा लागतो. परिणामी पाण्यासोबतच कागदाचाही अपव्यय होतो. 4) वेस्टर्न टॉयलेट वापरल्याने संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे यूटीआयसारख्या संसर्गांचा धोका वाढतो. कारण तुमच्या त्वचेचा टॉयलेट सीटशी थेट संपर्क येतो. हे टॉयलेट सीट अनेकांनी वापरलेलं असतं, त्यामुळे कोणाकडूनही आजार पसरण्याचा धोका असतो. इंडियन टॉयलेटचे फायदे 1) ज्या लोकांना नियमित व्यायाम करता येत नाही, त्यांच्यासाठी इंडियन स्टाईल टॉयलेटचा वापर फायद्याचा ठरतो. यामध्ये हात-पायांची हालचाल होते. इंडियन टॉयलेटमध्ये उठबस होते, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशनला चालना मिळते. 2) इंडियन स्टाईल टॉयलेटमध्ये बसल्यानंतर तुमच्या संपूर्ण पचनसंस्थेवर दबाव पडतो, त्यामुळे तुमचं पोट व्यवस्थित साफ होतं. याउलट वेस्टर्न टॉयलेटमध्ये तुम्ही आरामात बसता त्यामुळे प्रेशर कमी होतो. अशा स्थितीत अनेक वेळा पोट नीट साफ होत नाही आणि पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात.
- गरोदर महिलांसाठी इंडियन स्टाईल टॉयलेटचा वापर खूप फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. असं म्हटलं जातं की, सतत इंडियन टॉयलेट वापरल्यानं नैसर्गिक प्रसूतीमध्ये खूप मदत होते. 4) इंडियन टॉयलेट वापरल्यानं संसर्गाचा धोकाही कमी असतो. कारण, आपला टॉयलेट सीटशी थेट संपर्क येत नाही. हे वाचा - भारतीय पुरुषांसाठी धोक्याची घंटा; स्पर्म काउंट होतोय वेगाने कमी 5) इंडियन स्टाईल टॉयलेट वापरल्यानं बद्धकोष्ठता सारख्या समस्यांचा धोका कमी होतो. डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात असं निदर्शनास आलं आहे की, भारतीयांच्या तुलनेत पाश्चिमात्य देशांतील लोकांमध्ये पोटाशी संबंधित समस्या जास्त आहेत. 6) इंडियन टॉयलेटचा वापर केल्याने कोलन कॅन्सर आणि पोटाशी संबंधित इतर आजारांचा जास्त धोका राहत नाही. भारतीय टॉयलेट सीटवर बसल्याने आपल्या शरीरातील कोलनमधून विष्ठा पूर्णपणे काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठता, अॅपेन्डिसायटिस, कोलस कॅन्सर आणि इतर प्रकारच्या रोगांची शक्यता कमी करण्यास मदत करते. हे वाचा - रक्त पिऊन त्रास देणाऱ्या उवांचं मूळ अमेरिकेत; दर वर्षी 1.20 कोटी जणांना भेडसावते इंडियन टॉयलेटचे तोटे 1) वृद्ध व्यक्ती, ऑस्टियोआर्थ्रायटिसचे रुग्ण किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींसाठी इंडियन स्टाईल टॉयलेट उपयुक्त नाही. यामुळे त्यांची समस्या आणखी वाढू शकते. 2) इंडियन टॉयलेट वापरताना जास्त दबाव टाकल्याने मेंदूतील एन्युरिझम पेशींना नुकसान होऊ शकतं. त्यामुळे मृत्यू होण्याचीही शक्यता असते. एकूणच, दोन्ही प्रकारच्या टॉयलेटचे फायदे आणि तोटे आहेत. आपण हे फायदे आणि तोटे लक्षात घेऊन आपल्या सोयीनुसार त्यांची निवड करावी.