मेड इन इंडिया स्वस्त कोरोना टेस्ट तयार; फक्त Paper ने एका तासात कोरोनाचं निदान होणार

मेड इन इंडिया स्वस्त कोरोना टेस्ट तयार; फक्त Paper ने एका तासात कोरोनाचं निदान होणार

काही आठवड्यांतच कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) निदानासाठी पेपर टेस्ट (corona paper test) सुरू केली जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर :  सध्या कोरोनाव्हारसचं (Coronavirus) निदान करण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट (RT-PCR TEST) केली जात आहे. मात्र ही टेस्ट खूप महागडी आहे, शिवाय या टेस्टसाठी स्वॅब नमुने घेण्यासाठी प्रशिक्षित लोकांचीही गरज लागते. तसंच त्याचा रिझल्ट यायला वेळही लागतो. मात्र आता लवकरच भारतात कोरोनाची स्वस्त अशी टेस्ट उपलब्ध होणार आहे. फक्त एका पेपरने कोरोनाचं निदान होणार आहे आणि एका तासातच रिझल्ट हातात मिळणार आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाची चाचणी करण्यासाठी एक खास पेपर टेस्ट (Paper Test) विकसित केली आहे. प्रेग्नन्सी टेस्ट किटप्रमाणे कोरोना टेस्टसाठी पेपर स्ट्रिपवर तयार करण्यात आली आहे. स्ट्रिपच्या बदलत्या रंगावरून त्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे किंवा नाही हे कळणार आहे. फक्त एका तासात त्याचा निकालही आपल्याला कळू शकतो.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR), इन्स्टिट्युट ऑफ जिनोमॅटिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजीच्या (IGIB) संशोधकांनी ही टेस्ट तयार केली आहे. या टेस्टचं नाव ‘फेलुदा’ ठेवण्यात आलं आहे. ड्रग्ज कंट्रोलकर जनरल ऑफ इंडियाने याआधीच ही टेस्ट करायला मान्यता दिली आहे. आता काही आठवड्यात भारतात ही टेस्ट सुरू केली जाणार आहे.

हे वाचा - कोरोना रुग्णांची संख्या घटली पण धोका कायम; पुढील 6 ते 12 आठवडे सर्वात भयानक

पारंपरिक आरटी-पीसीआर टेस्ट इतका अचूक निकाल टाटा सीआरआयएसपीआर या नव्या टेस्टमधून मिळतो. त्याचबरोबर कमी वेळात, कमी खर्चात ही टेस्ट होणार असून, ती सोप्या पद्धतीने करता येईल असा दावा कंपनीने केला. जर या पेपर स्ट्रिपवर कोरोना विषाणू आला तर ती स्ट्रिप लगेच रंग बदलते. या टेस्टने दिलेल्या निकालांपैकी 96 टक्के निकाल अचूक आल्याचं मतही शास्रज्ञांनी व्यक्त केलं आहे.

‘फेलुदा’ या स्वदेशी टेस्टमुळे रुग्णांची तपासणी मोठ्या प्रमाणात करणं तसंच त्याचा लवकर निकाल सांगणं शक्य होऊ शकतं. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याची दिशा ठरवणंही सोपं होईल. भारतीय शास्रज्ञांच्या या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या देशातील लढाईमध्ये खूप मोठी मदत होणार आहे. त्यामुळे टेस्ट करण्याची क्षमता वाढेल आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पावलं उचलणं आणखीन सोपं होऊ शकतं.

हे वाचा - कोरोनाचा फटका! मध्यमवयीन नोकरदारांपेक्षा ज्येष्ठांनी गमावल्या सर्वाधिक नोकऱ्या

या टेस्टची किंमत अद्याप जारी करण्यात आली नाही. मात्र दिल्लीतल्या स्थानिक मीडियानुसार याची किंमत जवळपास  500 रुपये असू शकते. जी आरटी-पीसीआर टेस्टपेक्षा खूपच स्वस्त आहे.

Published by: Priya Lad
First published: October 21, 2020, 3:58 PM IST

ताज्या बातम्या