वॉशिंग्टन, 21 ऑक्टोबर : कोरोना व्हायरस महामारीमुळे (Pandemic) समाजावर आरोग्यविषयक परिणामांव्यतिरिक्त इतरही अनेक परिणाम होत आहेत. जगभर झालेल्या लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी आली असून त्याचे चटके सर्वच थरांतील लोकांना बसत आहेत. अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली असून, त्याचा फटका करिअरच्या मध्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा जेष्ठ कर्मचाऱ्यांना अधिक बसत आहे. अमेरिकेतील द न्यू स्कूल विद्यापीठाच्या सर्वेक्षणात असं समोर लक्षात आलं आहे. अमेरिकेच्या इतिहासात गेल्या 50 वर्षांत पहिल्यांदाच मध्यमवयीन नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नोकरदारांना बेरोजगारीचा अधिक प्रमाणात सामना करावा लागत आहे, असं मंगळवारी द न्यू स्कूलने प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात म्हटलं आहे.
या महामारीमुळे सर्व वयोगटातील लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत पण 55 आणि त्याहून अधिक वय असलेल्या जेष्ठांच्या नोकऱ्या 35 ते 54 वयोगटातील नोकरदारांच्या तुलनेत लवकर गेल्या आहेत. तसंच ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्या ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा नोकरी मिळण्यात अडचणी येत आहेत, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून समोर आला आहे. सलग सहा महिने या समस्येला तोंड द्यावे लागत आहेत. 1973 सालानंतर 2020 मध्ये असा प्रकार घडत आहे.
(हे वाचा-दोन दिवसांनी सोन्याचांदीला झळाळी, या आठवड्यात दर आणखी वाढण्याची शक्यता)
1970 मध्ये आलेल्या आर्थिक मंदींमध्ये मध्यमवयीन नागरिकांपेक्षा ज्येष्ठांची नोकरी जाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यांच्या कामातील अनुभवामुळे आतापर्यंत कंपन्या ज्येष्ठांना नोकरीवरून काढत नव्हत्या. पण सध्याच्या मंदीमध्ये महामारी सुरू झाल्यानंतर दर महिन्याला मध्यमवयीन नोकरदाऱ्यांच्या तुलनेत ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना अधिक प्रमाणात नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.
एप्रिल 2020 ते सप्टेंबर 2020 या काळात अमेरिकेतील मध्यमवयीन नोकरदारांमध्ये बेरोजगारीचं प्रमाणा 8.6 टक्के तर ज्येष्ठांमध्ये 9.7 टक्के आहे. म्हणजे सहा महिन्यांची सरासरी पाहिली तर मध्यमवयीन नोकरदारांच्या तुलनेत ज्येष्ठांच्या नोकऱ्या जाण्याचं प्रमाणा 1.1 टक्क्यांनी अधिक आहे. कृष्णवर्णीय, महिला आणि कॉलेजची पदवी न घेतलेल्यांना तर खूपच मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा फटका बसला आहे. या अभ्यासात करिअरमध्ये स्थिर झालेल्या लोकांचा अभ्यास करण्यात आला, अर्थात यामध्ये त्यामुळे 35 वर्षांहून कमी वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात आलेला नाही.
(हे वाचा-मोदी सरकार मास्टरस्ट्रोकच्या तयारीत! चीनच्या दुश्मन देशांशी करणार हातमिळवणी)
ज्येष्ठांना नेहमीच वयातील फरकामुळे भेदभावाचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांना नोकरी शोधणं कठीण होतं आहे. यातील संशोधकांच्या मते कोरोनामुळे ज्येष्ठांच्या आरोग्याची जोखीम लक्षात घेता कंपन्या ज्येष्ठांना नोकरीवर घेत नाही आहेत. या सगळ्यामुळे अनेकांना अनिच्छेनेच निवृत्ती स्वीकारावी लागू शकते.
न्यू स्कूलच्या संशोधकांच्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यापासून 55 वयाच्या वरचे 14 लाख नागरिक बेरोजगार आहेत. यामध्ये एप्रिलच्या आधी नोकरी सोडलेले किंवा नोकरी गेलेल्यांचा समावेश नाही.
ज्येष्ठ नागरिकांच्या नोकरीच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार असून विशेष करून ज्या ज्येष्ठांनी निवृत्तीसाठी पुरेसे पैसे साठवलेले नाहीत आणि दीर्घकाळ नोकरी करण्याच्या विचारात होते त्यांची परिस्थिती खूपच बिकट होण्याची शक्यता आहे असं या संशोधनातून दिसून आलं आहे.