मुंबई, 25 मे : लग्नात वेगवेगळ्या विधी पार पाडल्या जातात. त्यामध्ये मंगळसुत्र उलटं घालणं , वरमाला घालणं आणि अक्षता टाकणं. अशा काही विधींचा समावेश आहे. त्यांपैकी आज आपण अक्षता टाकण्याबद्दल बोलणार आहोत. अखंड तांदळाचे दाणे घेऊन त्यांस तेल व कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळवून तयार करण्यात येतात त्या म्हणजे अक्षता. मंत्र बोलून झाल्यानंतर नवरा-नवरीच्या डोक्यावर अक्षता टाकल्या की त्यांचं लग्न लागलं किंवा पूर्ण झालं असं म्हणतात. पण कधी विचार केलायका की वधू आणि वराच्या डोक्यावर अक्षता का टाकतात किंवा त्याचं लग्नात महत्व काय आहे? चला याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ लग्नात अक्षताच का वापरतो याची खालील काही महत्वाची कारणे: १. हे एक असे धान्य आहे की जे आतून कधीच किडत नाही, म्हणजेच ते आतून शुद्ध आहे. म्हणून तर शुद्ध चारित्र्याला धुतलेल्या तांदळाची उपमा दिली जाते. २. तांदूळ हे धान्य एकदल धान्य आहे याचे दोन भाग होत नाहीत किंवा ते दुभंगत नाही. आयुष्याचा संसार सुद्धा दुभंगू नये ही त्यामागे भावना असते. ३. तांदूळ पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावावे लागते, तेव्हा ते खरे बहरते. त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे, आणि नंतर ती दुसऱ्याच्या घरी जाते आणि तेथे बहरते. म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी मानली जाते. असेच मुलीने बहरावे म्हणून अक्षता वापरल्या जातात.
तसेच तांदळाला सौभाग्य आणि सुखाचं प्रतिक देखील मानलं जातं आणि त्यामुळे नवरा-बायकोवर अक्षता म्हणून तांदूळ टाकले जातात. प्राचीन काळी ग्रीसमध्येही वधू-वरांवर याच कारणासाठी पीठ आणि मिठाई उधळण्याची रीत होती.