मेलबर्न, 24 डिसेंबर : कोरोना विषाणूची (Corona Virus) लागण झालेले जे लोक त्यातून बरे झाले आहेत त्यांना पुन्हा किमान आठ महिने या विषाणूची लागण होऊ शकत नाही. त्यांच्यात या विषाणूशी लढण्यासाठी तयार झालेली प्रतिकार शक्ती (Immunity) किमान आठ महिने प्रभावी राहत असल्याचं एका अभ्यासात सिद्ध झालं आहे. त्यामुळं कोविड 19 वरील (Covid19) लसही (Vaccine) दीर्घकाळ प्रभावी राहू शकते याला पुष्टी मिळाली आहे.
या आधीच्या अभ्यासात कोरोना विषाणूशी लढणाऱ्या अँटीबॉडीज पहिल्या काही महिन्यातच नष्ट होत असल्याचं आढळलं होतं त्यामुळं लस दिल्यानंतर निर्माण झालेली प्रतिकारशक्ती लवकर नष्ट होईल, अशी चिंता सतावत होती. सायन्स इम्युनॉलॉजी जर्नलमध्ये (Science Immunology Journal)प्रकाशित करण्यात आलेल्या या नवीन अभ्यासातील निष्कर्षांमुळे ही चिंता दूर झाली आहे.
ऑस्ट्रेलियातील (Australia) मोनाश युनिव्हर्सिटीतील (Monash University) शास्त्रज्ञांसह अन्य शास्त्रज्ञांच्या मतेही, प्रतिकारशक्ती यंत्रणेतील काही पेशी ज्यांना मेमरी बी पेशी (Memory B Cells) म्हणतात, त्या या विषाणूमुळे झालेला संसर्ग लक्षात ठेवतात. पुन्हा याच विषाणूचा संसर्ग झाला तर त्या संरक्षणकर्त्या प्रतिकार पेशींना उत्तेजित करून प्रतिकार करणाऱ्या पेशींचे वेगानं उत्पादन करण्यास उद्युक्त करतात.
हे वाचा - मेड इन इंडिया कोरोना लशीचे सकारात्मक परिणाम; COVAXINला आपात्कालीन मंजुरी मिळणार?
या अभ्यासात शास्त्रज्ञांनी कोविड 19 ची लागण झालेल्या 25 रुग्णांचे लागण झाल्यानंतर चार दिवसांनी आणि 242 दिवसांनी असे रक्ताचे 36 नमुने घेतले. लागण झाल्यानंतर 20 दिवसांनी अँटिबॉडींची (Antibodies) संख्या कमी होण्यास सुरुवात होते, असं शास्त्रज्ञांना आढळलं. तरीही सर्व रुग्णांमधील मेमरी बी पेशींनी या विषाणूमधील एक घटक ओळखला. या मेमरी बी पेशी विषाणूची लागण झाल्यानंतर आठ महिने प्रभावी राहत असल्याचं या विश्लेषणावरून सिद्ध झालं असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. यामुळं लशीची प्रभाव क्षमता दीर्घकाळ टिकून राहण्याबाबत आशा वाढल्या आहेत. तसंच अनेकांना पुन्हा या विषाणूची लागण झाल्याचं आढळलं आहे, त्यामागचं कारणही सिद्ध झालं आहे.
हे वाचा - COVAXIN किती कालावधीसाठी सुरक्षा देणार? स्वदेशी कोरोना लशीबाबत महत्त्वाची माहिती
या अभ्यासाचे सहलेखक मोनाश युनिव्हर्सिटीतील मेन्नो व्हान झेल्म यांच्या मते, हे निष्कर्ष अतिशय महत्त्वाचे आहेत. ज्या रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, त्यांची या विषाणू आणि आजाराशी लढण्याची प्रतिकारशक्ती कायम आहे, हे यातून स्पष्ट झालं आहे. कोविड 19 ची लस दिल्यानंतर हे संरक्षण कवच किती काळ टिकू शकेल याबाबत शंका होती, ती आता दूर झाली असून कोविड 19 वरील लशी दीर्घकाळ प्रभावी राहू शकतात ही अतिशय आशादायी बाब आहे, असंही झेल्म यांनी नमूद केलं.