मुंबई, 13 मार्च: लहान मुलांमधल्या (Children Health Issue) काही समस्या वय वाढत गेल्यावर कमी होत जातात. वय वाढत जातं तसे लहान मुलांमध्ये अनेक बदल होत जातात; मात्र लहान मुलांमधले काही आजार असे असतात, की ज्यावर लहानपणीच उपचार केले नाहीत तर वाढत्या वयातही ते कायम राहतात. इतकंच नाही, तर असे आजार कायमस्वरूपी राहण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. सपाट पाय अर्थात फ्लॅट फीट (Flat Feet) ही अशी समस्या आहे, की जी कायमस्वरूपी त्रासदायक ठरू शकते. फ्लॅट फीटची समस्या वाढत्या वयानुसार कमी होत जाते, असं अनेक पालकांना सांगितलं जातं. परंतु, ही गोष्ट खरी नाही. यावर वेळीच उपचार करणं आवश्यक असतं. याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी किंमत मोजावी लागू शकते. वाढत्या वयानुसार सपाट पाय अर्थात फ्लॅट फीटची समस्या कमी होत नाही तर ती वाढतच जाते, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. ‘बहुतांश केसेसमध्ये सपाट पायांची समस्या सुरुवातीला इलाज केल्यास दूर होऊ शकते; मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास बालकाच्या विकासात अडथळा निर्माण होतो. यामुळे बालकाचे पाय आणि अन्य अवयवांवर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे आयुष्यभर अशा पोश्चरसह अनेक समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्या वाढत जातात. त्यामुळे लहान मुलांच्या सपाट पायांच्या समस्येवर तत्काळ आणि वेळीच इलाज करणं गरजेचं आहे’, असं ऑस्ट्रेलियातल्या ला ट्रोब युनिव्हर्सिटीतले पेड्रिअॅट्रिक सर्जरीचे लेक्चरर स्टीव्हन एडवर्ड्स यांनी सांगितलं. टीव्ही9 हिंदी ने याविषयी वृत्त दिले आहे. हे वाचा- हे व्यायाम प्रकार केल्यानं वाढू शकतं आयुष्य! इतका वेळ केल्यानंतर दिसतो परिणाम आपल्या रिसर्च पेपरमध्ये स्टिव्हन लिहितात, की प्रौढांमध्ये वेदनादायी सपाट पायाची समस्या सहसा बालपणापासून असलेल्या फ्लॅट फीट समस्येमुळे उद्भवते, याच्याशी तज्ज्ञ सहमत आहेत. लहान मुलांची हाडं (Bones) काही प्रमाणात मऊ असल्याने आणि त्यांचं शारीरिक वजन कमी असल्याने पायावर ताण कमी असतो. त्यामुळे मुलं क्वचितच पाय दुखत असल्याची तक्रार करतात. तरी ते पाय, गुडघे आणि वाढत्या वेदनांविषयी तक्रार करत असतात. काही जण यामुळे शारीरिक हालचाली (Physical Activity) कमी करतात. वारंवार सांगूनही आपलं मूल सरळ उभं राहत नसल्याची तक्रार काही पालक करतात. मोठे झाल्यानंतर, किशोरवयीन किंवा वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत त्यांना वेदना जाणवत नाहीत. त्यापूर्वी खेळाच्या किंवा अन्य गोष्टींच्या माध्यमातून त्यांची शारीरिक क्रिया वाढते तेव्हा त्यांना वेदना जाणवतात. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या इरविंग मेडिकल सेंटरमधले ऑर्थोपेडिक सर्जन आणि टखना सर्व्हिसचे प्रमुख जस्टीन ग्रीसबर्ग यांच्या म्हणण्यानुसार, ‘प्रौढांमधल्या फ्लॅट फूटवर सर्वांत महत्त्वाचा उपचार म्हणजे प्रतिबंध होय. फ्लॅट फूटचा धोका असलेला पाय ओळखता आला, तर लवकर खबरदारी घेतल्यास विकृती टाळता येऊ शकते.’ लहान मुलांमधल्या फ्लॅट फूटवर उपचार न करता, त्याकडे दुर्लक्ष करणं ही एक क्लिनिकल चूक (Clinical Mistake) आहे आणि या समस्येवर नंतरच्या काळात उपचार अशक्य आहेत. सुरुवातीच्या काळात दातांचे विकार दूर करण्यासाठी ब्रेसिज लावणं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे लवकर उपचार हे पायाच्या योग्य आकारात विकासाला प्रोत्साहन देणारे आहेत. याचा अर्थ असा नाही की सर्व प्रकारच्या फ्लॅट फूट समस्येला उपचारांची गरज असते. कुशल डॉक्टरांनी समस्याग्रस्त संशयित रुग्णाला वेळीच ओळखणं गरजेचं आहे. बालकाच्या सपाट पायांकडे कधी तरी लक्ष दिल्यानं स्थिती आणखी बिघडू शकते. कारण नंतर उपचार केल्यास त्यातून अपेक्षित फायदा मिळू शकत नाही. या उपचारांमध्ये बळकटी देणारे व्यायाम, बॅले आणि सर्जरीचा (Surgery) समावेश असू शकतो. हे वाचा- कच्चं आलं खाण्याचे इतके आहेत फायदे; BP, पोटाशी संबंधित आजारांवरही गुणकारी मुलांचे सपाट पाय आपोआप बरे होतात, या दाव्याला कोणत्याही दीर्घकालीन अभ्यासातून समर्थन मिळालेलं नाही. याउलट प्रकाशित डाटा सूचित करतो, की मुलांचे सपाट पाय कालांतराने अधिक सपाट होतात आणि शेवटी प्रौढत्वात याचं रूपांतर वेदनादायी फ्लॅट फूट विकारात होतं. मुलांचे सपाट पाय बरे होतात, असा अनेक चिकित्सकांचा दावा मूलतः 1957 च्या अभ्यासावर आधारित होता. यात दोन आणि दहा वर्षांच्या मुलांच्या पायांचं मूल्यांकन करण्यात आलं होतं. या मुलांच्या वयाच्या तुलनेत पायाची रुंदी 4 टक्के कमी झाली,असं लेखकांना आढळून आलं. त्यात त्यांनी असा निष्कर्ष काढला, की सपाट पाय वयाच्या दहाव्या वर्षी बरे होतील. परंतु, त्यांनी मुलांच्या हाडाचं संरेखन विचारात घेतलं नाही आणि सपाट पाय वेळेत बरे होतात, असा निष्कर्ष काढण्याइतका डेटा पुरेसा नव्हता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.