मुंबई, 10 फेब्रुवारी: कधीही काही चटपटीत खावंसं वाटतं तेव्हा पहिलं नाव डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे पाणीपुरी. पाणीपुरीचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. या पाणीपुरीचे स्टॉल तुम्हाला प्रत्येक नाक्यावर अथवा चौकावर पाहायला मिळतात. बरेच लोक पाणीपुरी हेल्दी (Panipuri is beneficial) नसल्याने खाणं टाळतात. मात्र हा पूर्णतः चुकीचा समज आहे. पाणीपुरी खाण्याचे शरीरासाठी बरेच फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठीदेखील पाणीपुरीचा उपयोग होऊ शकतो. बाजारात मिळणारी पाणीपुरी ही अनेकदा स्वच्छ असेलच, याची खात्री नसते. त्यामुळे तीच पाणीपुरी (panipuri) आपण घरी तयार करूनही खाऊ शकतो. पाहूयात पाणीपुरी खाण्याचे फायदे.
पाणीपुरी खाल्ल्याने भूक नाही लागत
लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांसाठी पाणीपुरी हा एक चांगला पर्याय असू शकतो. जर तुम्ही डाएट (diet) करत असाल आणि तुम्हाला पट्कन वजन कमी करायचं असेल, तर 6 पाणीपुरींची फक्त एक प्लेट तुमचं वजन कमी करण्यास मदत करू शकते. याचं कारण म्हणजे पाणीपुरीचं पाणी. हे पाणी मसालेदार आणि चटपटीत असतं. त्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे याचा वजन कमी करण्यास फायदा होऊ शकतो.
हे वाचा-कोमट दूध प्यायल्यानंतर मिळते चांगली झोप, अनेकांच्या या सवयीमध्ये काय आहे तथ्य?
तोंड आलंय, खा पाणीपुरी!
पाणीपुरीचे पाणी तयार करण्यासाठी आंबट आणि तिखट मसाल्यांचा वापर करतात. तुमचे तोंड आले (mouth ulcer) असेल तर हे मसाले त्यावरील रामबाण उपाय आहेत. पाणीपुरीच्या पाण्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.
मळमळीवरही उपयुक्त
कधीकधी कारण नसतानाही मळमळ जाणवते किंवा चिडचिड, मूडस्विंग होतात. ही समस्या दीर्घकाळासाठी राहिली तर नॉशिया येऊन कोणतीही गोष्ट खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी पाणीपुरीची फार मदत होते. नॉशिया फील झाल्यावर पाणीपुरी खाल्ल्याने लगेच व्यक्तीला बरं वाटू शकतं.
घरी केलेली पाणीपुरीच खा
डाइटिशियन घरी तयार केलेली पाणीपुरी (homemade panipuri) खायचा सल्ला देतात. जर तुम्ही घरची पाणीपुरी खात असाल तरच वजन कमी करण्यास मदत होते. तुम्ही घरी गव्हाच्या पुर्या तयार करून कमी तेलात तळू शकता, यामध्ये गोड पाण्याऐवजी जिरे किंवा जलजिरा पाणी वापरू शकता, त्याचा आरोग्यासाठी फायदा होतो.
हे वाचा-Weight Loss साठी सकाळीच नाही तर रात्री देखील प्या गरम पाणी!मानसिक ताणही होतो कमी
पाणीपुरीतील पाण्याचे फायदे
घरगुती पाणीपुरीच्या पाण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही पुदिना, जिरे आणि हिंग वापरून पाणी तयार केले तर त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा वापरू शकता, यामुळे शरीरातील जळजळ थांबण्यास मदत होते. तर, हिंग महिलांच्या मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास फायदेशीर आहे.
पाणीपुरीत गोड चटणी खाऊ नका
पाणीपुरीत गोड चटणी खाणे टाळा कारण तुमच्या लठ्ठपणासाठी गोड चटणी बर्याच प्रमाणात जबाबदार असते. अशाप्रकारे घरगुती पाणीपुरी प्रचंड फायदेशीर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.