Corona vaccination : कोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाल्यास पहिला डोस पुन्हा घ्यायचा का?

Corona vaccination : कोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाल्यास पहिला डोस पुन्हा घ्यायचा का?

Corona vaccination : अनेकांच्या पहिल्या कोरोना लसीकरणाला चार ते सहा आठवड्यांचा कालावधी होऊन गेलेला आहे. तरीही त्यांना दुसरा डोस अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे त्या लोकांमध्ये भीती आणि चिंता आहे.

  • Share this:

मुंबई, 12 मे : कोरोनाला रोखण्यासाठी आता केवळ लसीकरण (Corona Vaccination) हाच उपाय असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर लसीकरणासाठी गर्दी वाढू लागली आहे. मात्र लशींच्या उत्पादन क्षमतेला मर्यादा असल्याने लशींचा (Corona vaccine) तुटवडा देशभरात जाणवतो आहे. देशातल्या एकूण लसीकरणाची टक्केवारी फार मोठी नसली, तरी पहिला डोस (Corona vaccine First Dose) घेतलेल्या व्यक्तींची संख्या काही कोटींमध्ये आहे. त्यापैकी अनेकांच्या पहिल्या लसीकरणाला चार ते सहा आठवड्यांचा कालावधी होऊन गेलेला आहे. तरीही त्यांना दुसरा डोस अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे त्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ठरलेल्या मुदतीत लशीचा दुसरा डोस (Corona vaccine Second Dose)  घेतला नाही तर पहिल्या डोसचा काही उपयोग होणार नाही, तसंच दुसरा डोस (Second Dose) निष्प्रभ ठरेल,अशी शंका त्यांच्या मनात उपस्थित होत आहे. पहिला डोस पुन्हा घ्यावा लागेल का, अशी शंकाही अनेक जण उपस्थित करत आहेत. मात्र ही भीती किंवा शंका मनात ठेवण्याची काहीच गरज नसल्याचं देशातल्या आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केलंआहे.

लसीकरणानंतर काही जणांना साइड इफेक्ट्स (Side Effects) जाणवतात. अशा व्यक्तींचा अभ्यास आणि त्यांना मदत करण्यासाठी एक राष्ट्रीय समिती तयार करण्यात आली आहे. त्या समितीचे एक सदस्य डॉ. एन. के. अरोरा यांनी याबद्दल 'टाइम्स ऑफ इंडिया'ला माहिती दिली.

'लशीचा पहिला डोस घेतलेल्या अनेक व्यक्तींचा दुसरा डोस लांबणीवर पडला आहे, याची आम्हाला कल्पना आहे. मात्र त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. कोविशिल्ड (Covishield) किंवा कोव्हॅक्सिन (Covaxin) या लशींच्या दोन डोसमध्ये (लशीनुसार) 4 ते 6 आठवड्यांचं अंतर असणं अपेक्षित असतं. मात्र ते 8 ते 10 आठवड्यांपर्यंत लांबलं, तरी काहीही फरक पडत नाही. एवढ्या अंतराने दुसरा डोस घेतला, तरी तो प्रभावीच ठरतो. दोन डोसमधलं अंतर वाढलं तरी पुन्हा पहिला डोस घेणं गरजेचं नाही,' असं डॉ. अरोरा यांनी सांगितलं.

हे वाचा - कोरोना लस घेतली म्हणजे झालं नाही; लसीकरणानंतर न विसरता करा एक काम

पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) या संस्थेतल्या इम्युनॉलॉजिस्ट डॉ. विनिता बाळ यांनी सांगितलं, 'पहिल्या डोसमुळे शरीरातल्या प्रतिकारशक्तीला जी चालना मिळालेली असते, ती दुसऱ्या डोसला उशीर झाल्यामुळे नाहीशी होत नाही. पहिल्या डोसमुळे तयार झालेला प्रभावाचा दर्जा आणि परिणाम वाढवण्याचं काम दुसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस (Booster Dose) करतो.'

'लसीकरण केंद्रावर गर्दी करणं ज्येष्ठांनी टाळावं. कारण त्यांना तिथे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येतनाही,' असंही डॉ. बाळ यांनी सांगितलं.

पहिल्या डोसमुळे शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज (Antibodies) काही कालावधीनंतर विघटित होतात. त्यामुळे पहिल्या लशीमुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती साधारणतः चार ते पाच महिन्यांनी कमी व्हायला सुरुवात होते.

कोविशिल्ड लशीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये असं आढळलं, की दोन डोसेसमध्ये जास्तीत जास्त 12 आठवड्यांचं अंतर असलं, तरी लशीचा प्रभाव तितकाच राहतो, तो कमी होत नाही. कोव्हॅक्सिन लशीच्या दोन डोसमधल्या अंतराबद्दल अशा चाचण्या मानवामध्ये घेण्यात आलेल्या नाहीत.

'कोव्हॅक्सिन लशीच्या निर्मात्यांनी 28 दिवसांच्या अंतराची चाचणी घेतली आहे. त्यामुळे त्या लशीचा दुसरा डोस 28 दिवसांनी घेण्याची शिफारस केली जाते. ज्या अर्थी चार आठवडे तो प्रभाव कायम राहतो, त्या अर्थी तो पाचव्या आठवड्यातही टिकून असणार. मात्र तसे पुरावे अद्याप तरी आपल्याकडे नाहीत,' असं डॉ. बाळ यांनी सांगितलं.

हे वाचा - पहिली कोरोना लस मिळतानाच मुश्किल; तज्ज्ञ म्हणतायेत तिसरा डोसही घ्यावा लागेल


पहिला डोस घेतल्यानंतर कोविड-19 चा संसर्ग झाला आणि त्यातून बरं व्हायला 6 ते 10 आठवडे लागले, तरी त्यानंतर त्या व्यक्तींनी लशीचा दुसरा डोस घ्यायला हवा, असं तज्ज्ञ सांगतात.

इंटरनॅशनल पेडिअॅट्रिक असोसिएशनचे कार्यकारी संचालक आणि गुजरात कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. नवीन ठाकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं, 'लस कोणतीही असली, तरी दोन डोसमधला कालावधी जास्त असलेलं बऱ्याच जणांसाठी श्रेयस्कर ठरतं. कोव्हॅक्सिनच्या बाबतीत आतापर्यंत प्रसिद्ध झालेली माहिती असं सांगते, की चार ते सहा आठवड्यांचं अंतर दोन डोसमध्ये असावं. पण त्यापेक्षा जास्त कालावधी कदाचित अधिक प्रभावी ठरू शकतो. थोडक्यात सांगायचं तर, उशीर झाला म्हणून कोणीही दुसरा डोस घ्यायचं टाळू नये. उशीर झाला तरी पहिला डोस पुन्हा घ्यावा लागत नाही.' राज्याचे कोविडविषयक सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांनीही असंच मत व्यक्त केलं.

First published: May 13, 2021, 9:30 AM IST

ताज्या बातम्या