नवी दिल्ली 23 जून : चुकीची दिनचर्या, व्यायामाचा अभाव आणि आहारावर नियंत्रण नसल्याने अनेक आजारांचा सामना सध्या करावा लागत आहे. परंतु, यातील काही असे आजार आहेत ज्यावर आपण अगदी साधे घरगुती उपाय करून मात करू शकतो. या उपयांना सवयीचा भाग बनवला तर दीर्घकाळासाठी त्याचे फायदे होऊ शकतात. किडनीतील संसर्गाचा (Kidney Infection) धोका सध्या अनेक जणांना आहे. यावर वेळीच उपाय न केल्यास त्यात वाढ होऊन गंभीर समस्येला सामोरं जाण्याची वेळही येऊ शकते. त्यामुळे अँटिबायोटिक औषधं न घेता महत्त्वाचे उपाय केल्यास किडनीतील संसर्ग रोखण्यास मदत होईल. याबद्दल ‘द हेल्थ साईट डॉट कॉम हिंदी’नं वृत्त दिलं आहे.
जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया (Bacteria) जेव्हा आपल्या किडनीत प्रवेश करतात तेव्हा मूत्रमार्ग व ब्लॅडरपर्यंत (Bladder) पोहचतात. बहुतांश वेळा किडनीतील संसर्ग सहज थांबवता येऊ शकतो; पण उपचारांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. एका किडनीतून दुसऱ्या किडनीपर्यंत संसर्ग पोहोचू शकतो. किडनी संसर्गामुळे दुखणंही वाढू शकतं. नैसर्गिक पद्धतीने आपण यापासून दिलासा मिळवू शकतो; पण हे उपाय करताना वैद्यकीय सल्ला घेणंही अत्यावश्यक असतं.
बॉडी-माईंड रिलॅक्सेशनसोबत हवे आहे सौंदर्य? तर या 4 ब्युटी टिप्स वापरून पाहा
ब्लॅडरच्या संसर्गात करवंदाचे ज्यूस उपयोगी
लघवीचा मार्ग आणि ब्लॅडर संसर्गात (Urinary Tact & Bladder Infection) करवंदाच्या ज्यूस (Cranberry Juice) उपयोगी ठरतो. काही वेळा किडनी संसर्ग झाल्यानंतर या ज्यूसचं सेवन केलं जातं. काही जण तर हा ज्युस पाण्यात मिसळून घेतात. यात स्वीटनर मिसळलं जात असल्याने एका मर्यादेतच त्याचं सेवन करायला हवं.
दिवसभरात 10 ते 12 ग्लास प्या पाणी
किडनीत संसर्ग झाला, याचा अर्थ किडनीत बॅक्टेरियाचा प्रवेश झालेला असतो. या बॅक्टेरियाला बाहेर काढण्याची आवश्यकता असते. त्यामुळे दिवसातून किमान 10 ते 12 ग्लास पाणी प्यायला हवं. यामुळे संसर्ग निघून जाईल. एखाद्या व्यक्तीच्या किडनी निकामी झाल्या असतील तर तिला पाणी कमी पिण्याचा सल्ला दिला जातो. वारंवार पाणी पिणं हा सर्वांत स्वस्त आणि प्रभावी असा उपाय आहे. विना अँटिबायोटिक संसर्गाच्या धोक्यापासून दूर ठेवण्यात पाणी महत्त्वाची भूमिका बजावते.
Piles Problem : मूळव्याधीचा त्रास नकोच असेल तर आहाराची आजपासूनच घ्या अशी काळजी
पार्स्ले ज्युसमध्ये असतात पोषक तत्त्व
करवंदाप्रमाणे पार्स्ले या परदेशी भाजीचा ज्युस (Parsley Juice) किडनी संसर्गात गुणकारी ठरतो. यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्त्वं असतात. पार्स्लेचा ज्युस घेतल्यास वारंवार लघवी येते. त्यामुळे किडनीतील बॅक्टेरिया शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. शिवाय अँटिबायोटिक औषधाला त्यांचं काम करण्यासाठी गती देत असतं. चव चांगली नसल्यास यात करवंद मिसळू शकता. याशिवाय प्रोबायोटिकही (Probiotics) किडनी संसर्ग रोखण्यासाठी मदत करत असतात. किडनीचं कार्य उत्तमरित्या चालण्यासाठी प्रोबोयोटिकचा चांगला फायदा होतो.
सर्वांत स्वस्त अन् गुणकारी लसूण
किडनीतील स्वच्छता करण्यासाठी सर्वांत स्वस्त घरगुती उपाय म्हणजे लसणाचं सेवन. शरीरातील मीठ आणि विषयुक्त पदार्थ शरीराबाहेर काढण्यासाठी लसूण मदत करतो. किडनी संसर्ग रोखण्यासाठी रोजच्या आहारात लसणचा वापर करायला हवा. लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या किडनी संसर्ग रोखण्यासाठी मदत करतात.
आरोग्याशी निगडीत एखादी समस्या उद्भवली की वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं कधीही चांगलं; पण घरगुती छोटे उपाय करून आपण किडनी संसर्गावर मात करू शकतो. फक्त या सवयी आपल्या दिनचर्येचा भाग बनायला हव्यात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Home remedies, Kidney sell