नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : देशभरात कोरोना रुग्णांची (Coronavirus Patients) संख्या काही प्रमाणात कमी होत असतानाच आता अनेक राज्यांमध्ये कोरोनाव्यतिरिक्त डेंग्यू (Dengue) आणि अनेक विषाणूजन्य ताप येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. डेंग्यू आणि कोरोना हे दोन्ही अगदी वेगळे आजार आहेत. डेंग्यू डासांद्वारे, तर कोरोना तोंडातून, नाकातून निघणाऱ्या थेंबांद्वारे पसरतो. परंतु, या दोन्ही आजारांमध्ये लक्षणं जवळपास सारखीचं असल्यामुळे सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे निदान आणि उपचारांमध्ये येणारी आव्हानं ठरत आहेत.
डेंग्यू रुग्णांमध्ये अचानक वाढ -
डेंग्यू हा दरवर्षी होणारा हंगामी आजार आहे. कोरोना आणि डेंग्यूमध्ये मध्यम ते अति प्रमाणात ताप येणं हे दोन्ही आजाराच्या संक्रमणाचं प्रमुख लक्षण आहे. साध्या व्हायरल इन्फेक्शनमध्येही ताप येत असल्याने, केवळ ताप येणं हे कोरोनाचं लक्षण असू शकत नाही,
परंतु डेंग्यू, मलेरिया आणि कोविड-19 अशा तापासारखे आजार वाढत असताना, या सर्वांमधील फरक ओळखणं आणि त्यानुसार उपचार होणं अधिक महत्त्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीला अनेक दिवसांपासून ताप असेल, तर काही फरक ओळखून योग्य निदान करता येतं.
Dengue आणि Covid-19 लक्षणांमधील साम्य -
- दोन्ही विषाणूजन्य आजार असून यात अंगदुखी, ताप, मळमळ, हाडं दुखणं अशी लक्षणं सर्वसामान्यपणे दिसून येतात.
- दोन्ही आजारांची चाचणी करत असताना रुग्णाने लक्षणं योग्यरित्या सागणं हा निदान अचूक होण्यासाठीचा एकमेव पर्याय आहे. लक्षणांसह रुग्णाने तापावर सतत लक्ष ठेवणं सर्वाधिक महत्त्वाचं ठरतं.
डेंग्यूचा ताप आणि कोविड-19 ताप यात फरक काय?
- दोन्हीमध्ये ताप हे मुख्य लक्षणं असले, तरी सर्वात मोठा फरक हा तापानेच दिसून येतो.
- कोविड-19 मध्ये येणारा ताप हा सर्वसाधारणपणे कमी ते मध्यम स्वरुपाचा आणि पॅरासिटोमॉलने पुन्हा तो पूर्ववत होण्यासारखा असतो. जर ताप 7 दिवसांपेक्षा अधिक काळ राहिला, तर हे संक्रमण गंभीर असल्याचं म्हटलं जातं.
- डेंग्यूमुळे येणारा ताप हा मोठ्या प्रमाणात असू शकतो. तो सतत वाढता 103 ते 105 डिग्रीपर्यंतही जाऊ शकतो. रुग्णाला बरं होण्यासाठी अधिक चांगल्या उपचारांची गरज असते.
- डेंग्यूमध्ये येणारा ताप सतत असू शकतो. तर कोरोनामध्ये येणारा ताप हा येत-जात राहतो. त्यामुळे तापाच्या चढ-उतारावरुन, ताप येण्याच्या प्रकारावरुनच रुग्णाला डेंग्यूची लागण आहे, की कोरोनाची याचा अंदाज लावता येतो.
- डेंग्यू आणि कोरोना लक्षणांमध्ये सुरुवातीला तापाशिवाय इतरही काही फरक दिसू शकतात. कोरोना एकावेळी एक किंवा त्याहून जास्त लक्षणांसह होऊ शकतो. कोरोनामध्ये तापाशिवाय फक्त खोकला किंवा ताप आणि खोकला येऊ शकतो. ही लक्षणं प्रत्येकासाठी वेगळी असू शकतात. तर डेंग्यूच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, अशक्तपणा अशी लक्षणं आढळू शकतात.
डेंग्यूसाठी कोणतीही लस किंवा विशिष्ट उचार उपलब्ध नसल्याने विश्रांती, उपचार आणि रिकव्हरी हाच चांगला पर्याय आहे.
डेंग्यूला दूर ठेवण्यासाठी -
- पाणी साठणाऱ्या जागा नियमितपणे स्वच्छ ठेवा.
- डास न चावण्यासाठी शक्यतो पूर्ण कपडे घाला.
- डासांची उत्पत्ती न होण्यासाठी जवळच्या ठिकाणी पाणी साठा होऊ देऊ नका.
- डास न चावण्यासाठी स्प्रे, जेलचा योग्य तो वापर करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.