मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Covid-19 महासाथीचा सामना करताना स्ट्रेस, भीती आणि गिल्टला कसं दूर ठेवायचं?

Covid-19 महासाथीचा सामना करताना स्ट्रेस, भीती आणि गिल्टला कसं दूर ठेवायचं?

पश्चात्ताप योग्य वेळी सोडला नाही तर आयुष्य आपला वेग पकडू शकत नाही.

पश्चात्ताप योग्य वेळी सोडला नाही तर आयुष्य आपला वेग पकडू शकत नाही.

'2021मध्येही बराच काळ असंच घरात राहावं लागण्याची मला भीती आहे. थोडा गिल्ट आणि पश्चातापही होतोय.' मानसिक आरोग्य तज्ज्ञ या वाटण्याला Niederland’s theory म्हणतात. इतर लोक मरण पावल्यास किंवा त्याहूनही वाईट गोष्टी घडतात तेव्हा आपल्या अस्तित्वासाठी किंवा हतबलतेसाठी दोषी मानत असल्याचं तुम्हालाही कधी वाटलं का?

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 21 जानेवारी: 'हे गुंतागुंतीचं आहे. त्याचं काही स्पष्टीकरण देता येत नाही. मी काहीही चुकीचं केलेलं नाही. तरीही मला अपराधी वाटतं....' अमेरिकास्थित असलेल्या बालसाहित्यकार श्रुती राव फोनवर बोलताना आपल्या भावना व्यक्त करत होत्या. मी त्यांचं बोलणं ऐकताना विचार करत होते, की गेल्या वर्षभराहून अधिक काळ जे काही घडतं आहे, त्याचा याच्याशी काही संबंध आहे का? हा लेख मी माझ्या लिव्हिंग रूममध्ये बसून लिहीत आहे, जिथे मी कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) अडकून पडले आहे. 2021मध्येही बराच काळ तेच करत राहावं लागण्याची मला भीती वाटत आहे. येणाऱ्या दिवसांबद्दल मला रागही येतोय, भीतीही वाटतेय आणि पश्चातापही होतोय.

माझ्या म्हणण्याचा भलता अर्थ काढू नका. मला दोन वेळचं उत्तम जेवण, चहा-पाणी मिळतंय, माझ्या डोक्यावर सुरक्षित घराचं छत्र आहे आणि माझी रोगप्रतिकारशक्तीही तुलनेने चांगली आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. चांगलं, सुरळीत सुरू असणारं इंटरनेट आणि 'वर्क-लाइफ बॅलन्स' (Work-Life Balance) साध्य करू देणारं कुटुंब या गोष्टींसाठी मी सुदैवी आहे; पण जेव्हा अर्धपोटी स्थलांतरितांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या कहाण्या, गंभीर आजारी असलेल्या आणि जवळच्या व्यक्तींना कायमचं गमावण्याची भीती असलेल्या कुटुंबांच्या गोष्टी माझ्यावर येऊन आदळतात, तेव्हा मला माझ्या तथाकथित विशेषाधिकारांची (Privilage) लाज वाटते, अपराधी भावना मनात तयार होते. जिथे अनेक जण एका रात्रीत उद्ध्वस्त झाले, तिथे माझ्याकडे तुलनेने काही सुरक्षितता आहे. विज्ञान असं सांगतं, की अपराधी भावना (Guilt) ही स्वयंजागृत भावना असून, लोकांना स्वतःहून कार्य करायला उद्युक्त करते, आपल्या वागण्यातल्या नैतिकतेची आठवण करून देते; पण मी ज्या अपराधी भावनेला तोंड देते आहे, ते 'मी हे करू शकते की केलं पाहिजे,' अशा परस्परविरोधी विचारांचं एक न संपणारं वर्तुळ आहे. अत्यंत वाईट स्थिती येण्यापासून मी तुलनेने सुरक्षित आहे, ही भावनाच मला प्रचंड घाबरवून टाकते आहे.

आजूबाजूच्या परिस्थितीच्या तुलनेत माझं तसं चांगलं चाललं आहे. आणि खरं तर 2020 हे माझ्यासाठी खरंच संस्मरणीय क्षणांचं वर्ष आहे. डिप्रेशन अर्थात औदासीन्य दूर होण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून मी घेत असलेले औषधोपचार आणि थेरपी यांमुळे माझं मानसिक आरोग्य (Mental Health) आता सुधारत आहे. करिअरदृष्ट्या विचार केला, तर हे वर्ष जास्त समाधानाचं आहे. कारण मी माझ्या स्वतःच्या क्षमतेवरच शंका घेत अनेक वर्षं घालवल्यानंतर आता माझं लेखनातलं करिअर वेग घेत आहे. तरीही मला प्रत्येक गोष्ट विचित्र वाटते आहे, अगदी माझ्या स्वतःच्या अस्तित्वासह...

मला कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागत नाही, म्हणून मी अनेक रात्री वाईट बातम्या वाचून, अशा बातम्यांचा अक्षरशः माझ्या स्वतःवर मारा करून काढल्या आहेत. ज्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत, ज्यांना हॉस्पिटलच्या बेडसाठी संघर्ष करावा लागतो आहे किंवा अन्नासाठी धडपडावं लागतं आहे, असे माझे सहकारी, ओळखीच्या व्यक्ती आणि देशभरातले नागरिक यांच्याप्रति माझी सहवेदना असावी, दयाळूपणा असावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. उदरनिर्वाहासाठी अनेक कामं करणारी मंडळी, घरातल्या खूप जबाबदाऱ्या असूननही मुलांना घरीच शिकवावं लागणारी मंडळी किंवा माझ्यापासून एका रात्रीत दूर अंतरावर राहावं लागलेली माझी भावंडं यांच्या गोष्टी ऐकून मला अस्वस्थ व्हायला होतं.

श्रुती राव यांच्या शब्दांनी माझं एकप्रकारे सांत्वन झालं आणि माझ्या लक्षात आलं, की अशी वेदना असलेली मी एकटीच नाही. आपल्यापैकी अनेकांना निराश करून टाकणारी, भावनिकदृष्ट्या दमवणारी आणि पांगळं करून टाकणारी अशी ही भावना नेमकी काय आहे, याबद्दल मी माझे मित्र आणि सहकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू केली. मला विविध प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या. काहींनी मी अतिविचार करत असल्याची प्रतिक्रिया दिली. काहींनी तर माझा दृष्टिकोन आयुष्याकडून वरदान मिळालेल्या गोष्टींकडे कृतघ्न भावनेनं बघण्याचा असल्याचं सांगितलं. 'रिकामं मन सैतानाचं घर' असल्याचं काही जणांनी सांगितलं. आपले सामाजिक संबंध जपण्यापासून दूर जावं लागल्यामुळे, तसंच आनंद देणाऱ्या कृती करता न आल्यामुळे कोरोना योद्ध्यांनी फार त्रास होत असल्याचं, निराशावादी आणि संवेदनाशून्य झाल्याच्या तक्रारी केल्या.

'मी ध्यानधारणा आणि प्रार्थना करते,' माझ्या आईने ठासून सांगितलं.

सौम्या भारती या ओरल सर्जन असून, सध्या लेखनात करिअर करण्यासाठी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रापासून ब्रेक घेतला आहे. त्या म्हणतात, 'वैद्यकीय क्षेत्रात माझी अनेक मित्रमंडळी आहेत. त्यांच्यासाठी हा फारच कसोटीचा काळ आहे. दंतवैद्यकशास्त्रासाठी तर हा फार कठीण काळ होता. काही दवाखान्यांमध्ये नेहमीइतके पेशंट्स येत नव्हते. अनेक दवाखाने जबरदस्तीने बंद करावे लागले. या सगळ्यामुळे आर्थिक उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला. मी करिअर ब्रेक घेण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी ठरवून घेतला होता. तरीही मला अपराधी वाटतं आहे. कारण मी लोकांना मदत करणाऱ्या आघाडीत असायला हवं होतं. दुसऱ्या बाजूला, मला हेही वाटतं, की अशा अनपेक्षितरीत्या आलेल्या कठीण काळातही मला जोडीदाराची सक्षम साथ आहे. त्यामुळे मला नियमित उत्पन्नासाठी काळजी करण्यासारखी परिस्थिती उद्भवली नाही.' भारती यांनी नंतर हेही स्पष्ट केलं, की त्यांनाही काही कालावधीपूर्वी कोरोनाचा संसर्ग होऊन गेला. चांगल्या आरोग्यसुविधांमुळे आपण बरं झाल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यातूनही त्यांची अपराधी भावना जागृत झाली.

ही वेदना समजून घेण्याच्या शोधात मी डॉ. विल्यम जी. निडरलँड (Dr William G. Niederland) या न्यूयॉर्कमधील मानस-विश्लेषकाने नोंदवलेल्या निरीक्षणांपर्यंत पोहोचले. ते स्वतः हिटलरच्या छळछावणीतून वाचलेल्यांपैकी एक होते. त्यांनी त्या छळछावणीतल्या सहकाऱ्यांच्या निरीक्षणातून 'सर्वायव्हर सिंड्रोम'ची (Survivor Syndrome) कल्पना मांडली. मानसिक त्रास असलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. तसंच, हिटलरच्या छळछावणीतून वाचलेली मुलं आणि प्रौढ व्यक्ती यांच्यावर नंतर झालेले मानसिक दुष्परिणाम या विषयावर त्यांनी सखोल संशोधन केलं. 1961मध्ये त्यांनी 'दी प्रॉब्लेम्स ऑफ दी सर्वायव्हर्स - पार्ट 1' हे पुस्तक प्रकाशित केलं. नाझींनी केलेल्या छळामुळे झालेले भावनिक आघात त्यांनी पहिल्यांदा या पुस्तकाद्वारे उजेडात आणले. त्यामुळे वैद्यकीय वर्तुळामध्ये या महत्त्वाच्या विषयावर चर्चेला प्रथमच वाचा फुटली.  छळछावणीत असलेल्यांवर झालेल्या शारीरिक आणि मानसिक परिणामांकडे त्यांनी लक्ष वेधलं. तसंच या वेदनादायी अनुभवांची तीव्रता, भयावहता आणि कालावधी यांमुळे यातून वाचलेल्या अनेकांमध्ये नंतर 'सर्वायव्हर सिंड्रोम' विकसित झाला. त्यांनी पुढे असंही म्हटलं, की अशा व्यक्तींना आपण शिक्षाच भोगत असल्याची संवेदना होऊ शकते.

त्यानंतर क्लेशकारक स्थितीतून बाहेर पडलेल्यांना जाणवणाऱ्या ताणातून उद्भवणाऱ्या विकाराचा महत्त्वाचा निदर्शक म्हणून सर्वायव्हर सिंड्रोमचा वापर केला जाऊ लागला. त्यात एड्समधून वाचलेल्या, युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या किंवा नोकरी गेलेल्या आदी व्यक्तींच्या ताणाचा समावेश आहे.

आताच्या कोरोना महामारीमुळे आपलं 'नॉर्मल' जीवनच बदललं आहे. अशा परिस्थितीत अन्य व्यक्ती मरत असताना किंवा त्यांची परिस्थिती वाईट होत असताना आपण मात्र जगलो आहोत, चांगलं चाललं आहे, अशा प्रकारची अपराधी भावना लोकांमध्ये वाढीला लागू शकते, असा इशारा मानसिक आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे. नानावटी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असलेल्या डॉ. शर्मिला बनावत यांनी सांगितलं, की महामारी सुरू झाल्यापासून आपण सर्व जण सार्वत्रिक दुःख, हानी आणि शोक या भावनांना सामोरं जात आहोत. 'हानीचा पहिला टप्पा हा ती नाकारण्याचा असतो; पण आपण तो बराच मागे टाकून आता पुढे आलो आहोत. हा टप्पा बार्गेनिंग अर्थात घासाघिसीचा आहे. कोरोना लशीवरून लोकांच्या मनात राग, नैराश्य, दुःख आणि अनिश्चितता अशा भावना आहेत. जे लोक यातून वाचले आहेत, ते मनातल्या मनात आपली समजूत काढत असतील, की हे अधिक चांगल्या किंवा वेगळ्या प्रकारे करता आलं असतं. नॉर्मल जीवन उद्ध्वस्त होण्यासाठी ते स्वतःला जबाबदार धरत असतील. ही अपराधी भावना कायम राहिली आणि दुर्लक्षित राहिली, तर अँक्झायटी डिसॉर्डर, डिप्रेसिव्ह डिसॉर्डर किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक डिसॉर्डर अर्थात ताणातून उद्भवणारे मनोविकार होऊ शकतात.'

काही शास्त्रज्ञ सांगतात, की 'सर्वायव्हर्स गिल्ट'चं विश्लेषण करताना मायर्स-ब्रिग्ज टाइप इंडिकेटर फ्रेमवर्कमधील 'थिंकिंग-फीलिंग' या बाजूचा विचार करायला हवा. थिंकिंग पर्सनॅलिटी असलेल्या व्यक्ती वस्तुनिष्ठ तर्काच्या आधारे निर्णय घेतात. फीलिंग पर्सनॅलिटी असलेल्या व्यक्ती मूल्यांच्या आधारावर आणि आपल्या निर्णयाचा दुसऱ्या व्यक्तींवर कसा परिणाम होईल, याचा विचार करून निर्णय घेतात.

पोद्दार फाउंडेशनमधील मानसिक आरोग्यतज्ज्ञ प्रकृती पोद्दार म्हणतात, 'सर्व्हायव्हर्स गिल्ट ही संकल्पना नेमकी समजून घ्यायची असेल, तर विविध व्यक्तिमत्त्वं त्याचं प्रकटीकरण कसं करतात, ते तपासावं लागेल. अपराधी भावनेची लक्षणं ज्यांच्याकडून प्रकर्षानं दर्शवली जात आहेत, त्या व्यक्ती पर्फेक्शनिस्ट किंवा सुपरहिरो टाइप पर्सनॅलिटी असलेल्या असतील, ज्या प्रत्येक गोष्ट योग्यच करू इच्छितात. ज्या व्यक्ती अबोल, एकट्या आणि अंतर्मुख आहेत, त्यांच्याकडून अधिक संवेदनशीलपणे ते व्यक्त होईल.'

डेव्हिड केसलर (David Kesseler) हे दुःख या विषयातील तज्ज्ञ असून, त्यांनी एलिझाबेथ कब्लर-रॉस यांच्यासह 'ग्रिफ अँड ग्रिव्हिंग : फाइंडिंग दी मीनिंग ऑफ ग्रिफ थ्रू दी फाइव्ह स्टेजेस ऑफ लॉस' हे पुस्तक लिहिलं आहे. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूला गेल्या मार्चमध्ये दिलेल्या मुलाखतीत डेव्हिड यांनी म्हटलं आहे, 'आपल्याला अँटिसिपेटरी ग्रिफ अर्थात भविष्यातल्या काही घटना-घडामोडींच्या विचारांमुळे दुःखाची भावना येते. अनिश्चिचतता उद्भवते तेव्हा भविष्याबद्दल दुःख तयार होतं. साधारणतः मृत्यू हा या दुःखाच्या केंद्रस्थानी असतो. जेव्हा एखाद्याला दुर्धर आजाराचं निदान होतं किंवा कोणाच्याही मनात कधी तरी असा विचार येतो, की आपल्या आई-वडिलांना आपण एक दिवस गमावणार आहोत.'

आपण अशा पळणाऱ्या मनाला कसं सांभाळायचं, यासाठी पोद्दार यांनी काही मूलभूत गोष्टी सुचवल्या आहेत. 'ध्यानधारणा करणाऱ्या व्यक्तींनी या महामारीत चांगला तग धरला असल्याचं अभ्यासातून दिसून आलं आहे. जीवन आणि अनिश्चितता या गोष्टींशी कसं जुळवून घ्यायचं, याचं कौशल्य त्यांनी मिळवलेलं आहे. जीवनाचा प्रवास कसा असतो आणि आपण कसं काम करतोय, या गोष्टींपासून त्यांनी स्वतःला दूर केलेलं असतं.  बिंदू निश्चित करून त्यावरच लक्ष केंद्रित करणं श्रेयस्कर. आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार करणं, पौष्टिक आहार, व्यायाम, कृतज्ञता, मनमोकळेपणा आदी गोष्टी यासाठी मदत करू शकतात.'

हे देखील वाचा - ही आहेत DEPRESSION ची प्रमुख 2 लक्षणं; ती दिसली तर व्यक्तीशी कसं बोलायचं, काय करायचं?

केसलरही पोद्दार यांच्याशी सहमत आहेत. इतरांसाठीची आणि स्वतःसाठीची सहवेदना यात फरक केला पाहिजे, असं ते सांगतात.

माझ्या वैयक्तिक अनुभवांवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, की ही बाब समजून घेणं हीच लोकांना त्याच्याशी जुळवून घेण्यासाठीची एक चांगली सुरुवात ठरू शकेल. आमच्या पिढीच्या अनेकांना सुरक्षितता हरपल्याची भावना एकत्रितरीत्या पहिल्यांदाच अनुभवायला मिळते आहे. विषाणूचं अस्तित्व अजूनही आहे. त्याच वेळी आपली मनं प्रामुख्याने भविष्यातली काही काल्पनिक चित्रं जोडू पाहत आहेत, काही तरी अदृश्य आणि वाईट तिथे आहे, अशी भावना त्यामागे आहे. त्यामुळे सुरक्षिततेची संवेदना मोडून पडते.

परिस्थिती स्वीकारणं आणि इतरांप्रमाणेच स्वतःसाठीही करुणा दाखवणं, यातच एकत्रित शक्ती आणि नियंत्रणाची गुरुकिल्ली दडलेली आहे.

लेखिका मनःस्वास्थ्यावर लिहिणाऱ्या मुक्त पत्रकार असून  @SRFmentalhealth संस्थेशी जोडलेल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Covid19