Home /News /lifestyle /

Covid मुळे तुमचे नातेसंंबंधही बदलतायत का? लॉकडाऊनचा तणाव घरीही जाणवत असेल तर हे वाचा

Covid मुळे तुमचे नातेसंंबंधही बदलतायत का? लॉकडाऊनचा तणाव घरीही जाणवत असेल तर हे वाचा

वादविवाद किंवा भांडणं मिटणं ही काही साधीसोपी गोष्ट निश्चितच नाही. आणि बऱ्याचदा घरगुती भांडणाचं कारण पैसा हे असतं. काय करायचं अशा वेळी?

    लीना परांजपे कोविड १९ महासाथीमुळे आपले वैयक्तिक नातेसंबंध अभूतपूर्व पद्धतीने बदलले आहेत. या विषाणूने आपल्याला काही जणांच्या जवळ तर अनेक लोकांपासून दूर राहण्यास भाग पाडलं आहे. विलगीकरणाच्या परिस्थितीतून निर्माण झालेला ताण तसंच आर्थिक आव्हानं यांमुळे जोडप्यांतील वादांमध्ये वाढ झाली आहे. कोणत्याही नातेसंबंधात आर्थिक समस्यांमुळे ताण निर्माण होतो. लग्नव्यवस्था ही एक दीर्घकालीन वचनबद्धता असली तरी खर्चावरुन किंवा पैशांवरुन होणाऱ्या दररोजच्या भांडणांमुळे वैवाहिक नात्याचा पायाही डळमळू शकतो. म्हणूनच नवरा-बायकोने त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांना तसंच आर्थिक आव्हानांना एकत्रितपणे सामोरं जायला हवं. जोडीदारासोबतचे आर्थिक वाद कसे टाळाल? तुमचे वैवाहिक नातेसंबंध सुरळीत नसतील तर जोडीदारासोबतच्या दररोजच्या भांडणांमुळे आपोआपच  गोष्टी अधिकाधिक गंभीर वळण घेऊ शकतात. पैशाचं व्यवस्थापन ही मुळातच एक गुंतागुंतीची गोष्ट आहे. त्यामुळे पैशांवरून वाद उद्भवणं ही एक स्वाभाविक बाब आहे. आर्थिक आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी एकमेकांशी संवाद आणि सोबतीची भावना असणं खूप महत्वाचं आहे. नातेसंबंधांच्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच जोडप्यांनी आर्थिक आव्हानांविषयी खुलेपणाने चर्चा करायला हवी, त्यावर उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. जितक्या लवकर या समस्या सुटतील तितके उत्तम. ऑनलाईन शाळांविषयी आणि शाळेच्या फीविषयी तुमचं मत काय आहे? आमच्या सर्व्हेमध्ये सहभागी व्हा वादविवाद किंवा भांडणं मिटणं ही काही साधीसोपी गोष्ट निश्चितच नाही. जर तुम्हाला आर्थिक धक्का बसला असेल तर आधी स्वत:ची आर्थिक सद्यस्थिती ओळखा आणि जोडीदारासोबत दोघांचीही आर्थिक उद्दिष्टं निश्चित करा. पैशांची बचत आणि खर्च यांबाबत वेगवेगळ्या व्यक्तींचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो आणि लग्नसंबंधात याचं भान बाळगणं आवश्यक असतं. तुमच्या जोडीदारापेक्षा तुम्ही खूप वेगळे असू शकता. पैशांबाबत कदाचित तुम्ही व्यावहारिक असाल आणि कदाचित तुमचा जोडीदार खूपच उथळ किंवा स्वप्नाळूही असू शकतो. एकमेकांच्या निवडींचा किंवा निर्णयांचा आदर केल्यामुळे वैवाहिक नातेसंबंध भक्कम होतात. आर्थिक वादांमुळे वैवाहिक नातेसंबंध बिघडू नयेत म्हणून काही टिप्स तुमच्या आर्थिक व्यवहारांबाबत पारदर्शक राहा. एखाद्या कर्णधाराकडे त्याचा पहिला सोबती असतो तसं तुमचा जोडीदार हा तुमचा सर्वात चांगला मित्र असावा. वैवाहिक नात्यात कोणतंही गुपित असू नये. जेव्हा तुम्ही पारदर्शक असता, तुमच्या वैयक्तिक ध्येयाबाबत जोडीदाराशी खुलेपणाने बोलता तेव्हा तुमचं वैवाहिक नातं अधिक बळकट होतं. लग्नापूर्वीचा बराचसा काळ हा तसा एकटेपणाचाच असतो. त्यामुळे दुस-या व्यक्तीसोबत स्पेस शेअर करणं कठीण जाऊ शकतं. लग्नासोबत तडजोडी करणं, काळजी घेणं आणि समजूतदारपणे वागणं या गोष्टी येतातच. त्यामुळे लवचिक राहता येणं महत्वाचं. दोघांचेही पगार किंवा उत्पन्न आणि खर्च हे दोघांनाही पूर्ण स्पष्ट असावेत. कर्ज लपवू नका- आपल्या जोडीदारापासून आर्थिक समस्या कधीही लपवू नका. क्रेडिट कार्ड्स आणि बॅंक खाती जोडीदारापासून लपवून ठेवणं हे शारीरिक व्यभिचाराइतकंच गंभीर आहे. कर्ज कोणत्याही प्रकारचं किंवा कोणत्याही कारणासाठी काढलेलं असो, तुमच्या जोडीदाराला कर्जाविषयी तसंच आर्थिक व्यवहारांविषयी योग्य ती माहिती असायलाच हवी. पॉवरप्ले टाळा- "हे मी कमावलेले पैसे आहे, तुझे नाहीत." जोडप्यांमध्ये पैशांवरुन जेव्हा भांडणं होतात, तेव्हा संतापाच्या भरात अशी वाक्यं तोंडातून बाहेर पडतात. पण एक लक्षात घ्यायला हवं की, लग्नासोबत जोडीदाराची सामाजिक आणि आर्थिक जबाबदारी ही घ्यावीच लागते. संयम ही प्रत्येक समस्येची गुरुकिल्ली आहे. चिकाटी आणि धीराने तुम्ही सर्व काही जिंकू शकता. अगदी तुमच्या जोडीदाराचा संपूर्ण विश्वासही. (लेखिका लीना परांजपे समुपदेशक आहेत आणि मॅरेज कोच म्हणून काम करतात.)
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Lockdown, Relationship

    पुढील बातम्या