• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • OMG! फक्त एक Hot Dog सुद्धा लाइफवर भारी; कमी करतोय तुमच्या आयुष्याची 36 मिनिटं

OMG! फक्त एक Hot Dog सुद्धा लाइफवर भारी; कमी करतोय तुमच्या आयुष्याची 36 मिनिटं

तुम्ही हॉट डॉग खात असाल तर आधी ही बातमी वाचा.

  • Share this:
वॉशिंग्टन, 31 ऑगस्ट : हॉट डॉग (Hot Dog) हा किती स्वादिष्ट खाद्यपदार्थ आहे, हे अस्सल खवय्यांना नक्कीच माहिती असेल. परदेशात हॉट डॉग हा पदार्थ अगदी सहज मिळतो. एवढंच नाही तर आता हा पदार्थ भारतातही मोठमोठ्या हॉटेल्ससह स्ट्रीट फूडच्या रूपातही उपलब्ध होऊ लागला आहे. पण तुम्ही हॉट डॉग खात असाल, तर ही बातमी वाचून तुम्ही ते खाणं कदाचित बंद कराल. अमेरिकेतल्या मिशिगन विद्यापीठातल्या (Michigan University, USA) शास्त्रज्ञांनी अलीकडेच हॉट डॉगशी संबंधित एक संशोधन केलं असून, त्याचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. एक हॉट डॉग खाल्ल्याने माणसाचं आयुष्य 36 मिनिटांनी कमी होऊ शकतं, असं या संशोधनात शास्त्रज्ञांना आढळलं आहे. ऑगस्ट महिन्यातच नेचर फूड जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात शास्त्रज्ञांनी याबद्दलची माहिती दिली आहे. अमेरिकेतल्या नागरिकांकडून खाल्ल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या 5853 खाद्यपदार्थांबद्दल शास्त्रज्ञांनी संशोधन केलं. ते खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर माणसाचं आयुष्य किती वाढू शकतं किंवा कमी होऊ शकतं, याचं मिनिटांमध्ये रूपांतर त्यांनी केलं आहे. संशोधनात सहभागी असलेल्या ऑलिव्हियर जोलिएट यांनी सांगितलं, की शास्त्रज्ञांना आहारात समाविष्ट असलेल्या खाद्यपदार्थांचं मूल्यांकन (Valuation) स्वास्थ्याच्या आधारे करायचं होतं. हे वाचा - health tips प्रोटिन शेक पिण्याचे हे आहेत बहुमोल फायदे, असा तयार करा घरच्या घरी शास्त्रज्ञांनी केलेल्या विश्लेषणात असं आढळलं, की प्रक्रियायुक्त मांसाचा (Processed Meat) एक ग्रॅम वजनाचा एक तुकडा खाल्ल्यामुळेही आयुष्याची 0.45 मिनिटं कमी होतात. एक ग्रॅम एवढ्या वजनाचा फलाहार घेतला तर मात्र आयुष्य 0.1 मिनिटाने वाढतं. या आकड्याच्या आधारे शास्त्रज्ञांनी अन्य खाद्यपदार्थांच्या बाबतीतही गणित मांडलं. त्यात बनचा वापर केलेल्या बीफ हॉट डॉगबद्दलही संशोधन करण्यात आलं. त्यात असं आढळलं, की अशा प्रकारचा 61 ग्रॅम वजनाचा हॉट डॉग खाल्ला, तर 27 मिनिटांनी आयुष्य कमी होतं. त्यात सोडियम, ट्रान्स फॅटी अॅसिड्स आदींचाही विचार केला, तर आयुष्याची 36 मिनिटं कमी होतात. हे वाचा - फक्त फळं खाल्ल्यानेही होतं युरिक ॲसिड कमी; पाहा काय खावं काय टाळावं सीफूड, फळं, स्टार्च नसलेले खाद्यपदार्थ खाल्ले, तर आरोग्याला लाभ होतो आणि आयुष्याचा कालावधी काही मिनिटांनी वाढतो, असं शास्त्रज्ञ म्हणतात. ते म्हणतात, की ही वेळ गणितं मांडण्याची नाही, तर चांगलं, आरोग्यदायी खाद्यपदार्थांची निवड करण्याची आहे. खाद्यपदार्थांची गुणवत्ता मोजण्याचा हा एकमेव निकष किंवा पद्धत नाही; मात्र कोणते पदार्थ चांगले, कोणते आरोग्यासाठी वाईट याचा अंदाज या पद्धतीने येऊ शकतो. त्याचप्रमाणे कायम चांगलंच अन्न खाल्ला, तर माणूस आपलं आयुष्य 100 वर्षांपर्यंत वाढवू शकतो, असाही याचा अर्थ घेऊ नये, असंही शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे; मात्र चांगला आहार घेतला तर आरोग्य चांगलं राहू शकतं, असा याचा मथितार्थ आहे.
First published: