मुंबई 2 सप्टेंबर : काळे केस सौंदर्याचं प्रतीक असतात, या समजुतीचा प्रभाव काही पिढ्यांवर खूप मोठा होता. त्यामुळेच अकाली पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी हेअर डाय किंवा मेंदी वापरली जाऊ लागली. मेंदीच्या वापरामुळे केस लाल होतात, तर हेअर डाय केल्यामुळे केसांवर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे केस काळे करण्यासाठी महागडे हेअर कलर वापरावे लागतात. अशा परिस्थितीत केस काळे करण्यासाठी काही घरगुती उपायही (Home Remedies For Naturally Black Hairs) करता येतात. ओन्ली माय हेल्थ डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
हेअर डाय हा केस काळे करण्यासाठी स्वस्त पर्याय असला तरी त्यातील केमिकल्समुळे केसांवर दुष्परिणाम होतात. केस गळणं, कोंडा होणं, अलर्जी हेदेखील डायमुळे (Hair Dye) होऊ शकतं. इतकं करून थोड्याच दिवसांत पुन्हा केस पांढरे होतात. त्यामुळे केस काळे करण्यासाठी नैसर्गिक (Natural Remedies) उपाय शोधणं हिताचं ठरतं. असे काही उपाय जाणून घेऊ या.
आवळा
केस काळे करण्यासाठी आवळ्याचा (Amla) हेअर पॅकसारखा वापर करू शकता. अख्खा आवळा किसून किंवा त्याचा रस काढून तो वापरता येईल. केसांसाठीच्या तेलात आवळा किंवा त्याचा रस मिसळून ते तेल केसांवर लावा. 4-5 तास ठेवून शॅम्पूनं धुवून टाका. आठवड्यातून 2-3 वेळा याचा वापर केल्यास चांगले परिणाम दिसतात.
हे वाचा : Pomegranate Peels: डाळिंबाची सालही आहे बहुगुणी; इतक्या आरोग्य समस्यांवर उपयोगी
अंडी
अंड्यांमध्ये (Eggs) प्रथिनं असतात. त्यामुळे अंडी केसांसाठी फायदेशीर असतात. अंड्यापासून हेअर मास्क तयार करून तो केसांवर लावू शकता. त्यासाठी मोहरी, खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह तेलात अंड्यातील पांढरा भाग मिसळा. यात लिंबाचा रसही मिसळू शकता. सगळं एकत्र करून आठवड्यातून 2-3 वेळा हा हेअर मास्क लावा. हा मास्क 20-25 मिनिटं, 4-5 तास किंवा रात्रभरही ठेवता येतो.
अॅलोव्हेरा आणि तेल
मोहरी, एरंडेल किंवा ऑलिव्ह, खोबरेल तेल यात कोरफडीचा गर मिसळून किंवा अॅलोव्हेरा जेल (Aloe vera) मिसळून ते केसांवर लावा. यात लिंबू किंवा आवळ्याचा रसही मिसळता येतो. हे मिश्रण 3-4 तास केसांवर लावून मग शॅम्पूने धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा हा उपाय केल्यास पांढरे केस लवकरच नैसर्गिकरीत्या काळे होतील.
कांद्याचा रस
कांदा (Onion) केसांसाठी गुणकारी समजला जातो. केस काळे करण्यासाठीही त्याचा भरपूर फायदा होतो. केसांसाठी कांदा वापरताना कांद्याचा रस तसाच केसांवर लावता येतो किंवा केसांसाठीच्या तेलात हा रस मिसळून केसांवर लावता येतो. तेल थोडं गरम करून त्यात लिंबू किंवा आवळ्याचा रस मिसळा. हे तेल लावल्याने केस वेगानं काळे होतील. आठवड्यातून 2-3 वेळा 3-4 तासांसाठी केसांवर लावल्यानं योग्य परिणाम दिसतो.
भाज्यांचा रस प्या
सकाळी उपाशीपोटी गाजर, आवळा, बीट, लिंबू अशा भाज्यांचा रस प्यायल्यानं केस आतून काळे करण्यासाठी मदत होते. तसंच केस मजबूत आणि चमकदारही होतात.
केस काळे करण्यासाठी आहारही तितकाच महत्त्वाचा असतो. काही वैद्यकीय समस्यांचा परिणाम म्हणूनही केस अकाली पांढरे होतात. अशा वेळी घरगुती उपायांनी केस काळे न झाल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Home remedies, Proper care, Woman hair