कोलकाता, 30 मार्च : माणसांना होणारे आजार, प्राण्यांना होणारे आजार आणि वनस्पतींवर पडणारे रोग वेगवेगळे असतात. काही वेळा प्राण्यांमधल्या आजाराचा संसर्ग माणसांना होऊ शकतो; मात्र आतापर्यंत वनस्पतींमधल्या रोगाचा थेट संसर्ग माणसाला होण्याची घटना घडली नव्हती. आता भारतात कोलकात्यात अशा प्रकारच्या संसर्गाची घटना समोर आली आहे. ही जगातली पहिलीच घटना आहे
61 वर्षीय व्यक्तीमध्ये फ्लूची लक्षणं दिसू लागली. तिला सतत खोकला येत होता, आवाज बसला होता, थकवा जाणवत होता, अन्न गिळण्यासही त्रास होत होता. तब्बल 3 महिने असा त्रास झाल्यावर तिला रुग्णालयाच दाखल करण्यात आलं. सिटी स्कॅन केलं असता त्यांच्या घशात पू झाला असल्याचं लक्षात आलं. घशातल्या त्या पूची तपासणी करण्यात आली, तेव्हा रिपोर्टमध्ये Chondrostereum purpureum नावाच्या एका बुरशीचा संसर्ग झाल्याचं आढळलं.
ही बुरशी झाडांमध्ये ‘सिल्व्हर लीफ डिसिज’ नावाचा रोग निर्माण करते. तसंच ही बुरशी हवेत अगदी सूक्ष्म कणांच्या रूपात मिसळते व पसरते. ज्या झाडांच्या पानांवर हे कण जाऊन बसतात, त्या पानांचा रंग उडतो व नंतर ती पानं वाळतात.
VIDEO - एका महिलेची एक सवय अख्ख्या जगाला भारी पडणार; सर्वात भयानक संकटाचा धोका
माहितीनुसार मेडिकल मायकोलॉजी केस रिपोर्ट्समध्ये हे प्रकरण प्रसिद्ध करण्यात आलं आहे. संबंधित व्यक्ती वनस्पतींवरच्या बुरशीवर संशोधन करणारी म्हणजेच प्लांट मायकोलॉजिस्ट असून, संशोधनादरम्यानच त्या व्यक्तीला हा संसर्ग झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तिला मशरूमपासून हा संसर्ग झाला आहे. संसर्ग नेमका कधी झाला हे शोधता आलं नसलं, तरी संसर्गानंतर रुग्णाचं आरोग्य धोक्यात आलं होतं. वेळेवर उपचार मिळाले नसते, तर श्वासनलिकेला संसर्ग झाला असता व जीव धोक्यात आला असता.
रुग्णाला 2 महिने अँटी फंगल औषधं देण्यात आली. घशातला पू काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता हा संसर्ग संपूर्णपणे गेला आहे. 'डेलीमेल'च्या रिपोर्टनुसार, रुग्णाच्या पूचा नमुना जागतिक आरोग्य संघटनेकडे पाठवण्यात आला आहे. त्यावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी Chondrostereum purpureum या बुरशीमुळे हा रोग झाल्याचं निदान केलं. वनस्पतींमध्ये रोगकारक ठरणाऱ्या या बुरशीचा संसर्ग माणसातही झाल्याचं दिसून आलं आहे.
दररोज पिते 3 लीटर पाणी, तरी 14 महिने झाली नाही लघवी; वैद्यकीय तपासणीत समोर आलं धक्कादायक कारण
काही प्रकारच्या बुरशीपासून माणूस किंवा प्राण्यांना संसर्ग होऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तापमानवाढीमुळे बुरशीमध्ये बदल होत आहेत. त्यांच्यावर औषधांचा परिणामही कमी होतोय. सगळ्या प्रकारची बुरशी हानिकारक नसली, तरी काही प्रजाती मात्र वनस्पतींबरोबरच माणूस व प्राण्यांसाठीही घातक ठरू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Rare disease