मुंबई, 22 डिसेंबर: हवामान बदलल्यामुळे अनेकवेळा आपल्याला सर्दी, खोकला आणि डोकेदुखीचा त्रास होतो. काही जणांना थंडीमुळे त्रास होतो. हिवाळ्यात थंडी वाढल्यानंतर सायनस असणाऱ्यांना तर जास्त त्रास होतो. सर्दी होते आणि डोकही कायम दुखत राहातं. डोकेदुखी, चेहऱ्याला सूज येणं, सर्दी होणे अशा समस्या उद्भवतात. डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहेच पण काही घरगुती उपाय तुम्ही करू शकतो. वाफ घ्यावी- सर्दीमुळे नाकपुड्या बंद होतात अशावेळी आपल्याला श्वास घेणं कठीण होतं. अशावेळी पाण्यात कापूर टाकून त्या पाण्याची वाफ घ्यावी. अथवा नुसत्या पाण्याने वाफ घेतली तरीही नाक मोकळं होतं. गरम पाण्याने चेहरा धुवावा. चेहऱ्यावर गरम पाण्यातून भिजवलेला कपडा पिळून ठेवावा. त्यामुळे तुमचं सर्दीनं बंद झालेलं नाक सुटण्यास मदत होईल. गरम पदार्थ खा- सर्दी झाली असताना सूप, हळद घातलेलं गरम दूध अशाप्रकारचं सेवन करावं. सर्दी झाली असेल तर चुकूनही मद्यपान किंवा धुम्रपान करू नका. त्यामुळे श्वसनाचे गंभीर आजार होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आराम करा- सर्दी झाली असेल तर डोकं जड झाल्यामुळे अधिक त्रास होत असतो. अशावेळी शक्यतो आराम करावा. सर्दीचा बहर तीन दिवस राहातोच त्यामुळे जेवढा जास्त आराम करता येईल तेवढं लवकर बरं वाटतं. वाचा- कोंड्यामुळे डोकं खाजवून झालात बेजार तर करून पाहा ‘हा’ घरगुती उपाय स्वयंपाक घरातील काही झटपट उपाय सर्दी झाली असेल तर काबुली चणे आणि चुरमुरे खावेत त्यावर पाणी पिऊ नये म्हणजे सर्दी लवकर बरी होते. सुंठ उगाळून डोक्याला लावली तरीही सर्दी कमी होण्यास मदत होते. हळद आणि मीठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. त्यामुळे कफ कमी होतो. शक्य असेल तर हळद घालून कोमट पाणी घ्यावं. वेलची खाल्ल्यानं किंवा वेलचिचं पाणी घेतल्यामुळे सर्दीवर आराम मिळतो. आल्याचा रस लिंबू आणि गूळ एकत्र करून घ्यावा. याचे सेवन दिवसातून तीन वेळा केल्यास सर्दी खोकल्यावर आराम मिळतो. सर्दीसाठी वापरलेला रुमाल गरम पाण्यात भीजवावा त्यामुळे जंतू निघून जातात. अन्यथा पुन्हा इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. शक्य असेल आणि झेपल्यास निलगिरीचं तेल कापसाला लावून त्याचा वास घ्यावा त्यामुळे सर्दी बरी होते. वाचा- सांभाळा लहान मुलांचं आरोग्य, असं करा त्यांच्या आहाराचं नियोजन टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







