मुंबई, 11 मार्च : रात्री झोपताना तोंड (Mouth) कोरडं पडण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येते. विशेषत: वयोवृद्ध लोकांना याचा जास्त त्रास होतो. याचं कारण वाढत्या वयाबरोबर तोंडातील लाळ कमी होणं. तोंडाला कोरडेपणा (Dryness) येण्याचं हे एक प्रमुख कारण आहे. याशिवाय, औषधांच्या दुष्परिणामांमुळं किंवा तोंडानं श्वास घेतल्यानंही रात्री झोपताना तोंड कोरडं पडण्याची समस्या होऊ शकते. यासोबत असंही होऊ शकतं की, काही लोक खूप कमी पाणी पितात आणि त्यामुळे त्यांना अनेकदा तोंडात कोरडेपणा (Dry Mouth Home Remedies) जाणवतो. तोंडाच्या कोरडेपणाच्या समस्येमागे इतर अनेक कारणं असू शकतात. काही गोष्टींची काळजी घेतल्यास आपला हा त्रास कमी होऊ शकतो. इथं आम्ही अशाच काही टिप्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा अवलंब करून रात्री झोपताना किंवा सर्वसाधारणपणे तोंडाच्या कोरडेपणाच्या समस्येवर मात करता येते. नाकानं श्वास घ्या अनेकदा श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं काही लोकांचं तोंड झोपल्यानंतर उघडं राहतं आणि ते नाकाऐवजी तोंडातून श्वास घेऊ लागतात. यामुळं नैसर्गिकरित्या तोंड कोरडं होतं. म्हणून, शक्यतो नाकातून श्वास घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला सर्दी आणि फ्लूची समस्या असेल तर, त्याची विशेष काळजी घ्या. झोपताना कोणत्याही कारणानं नाक बंद झालं असेल तर तोंडानं श्वास घेण्याऐवजी उठून ती समस्या दूर करा. हे वाचा - मधुमेह नियंत्रणात ठेवणं अवघड नाही; हे 4 हर्बल टी दाखवून देतील जबरदस्त परिणाम कॅफिन आणि निकोटीनपासून दूर राहा कॅफिन आणि निकोटीनसारखे पदार्थ शरीरातील पाण्याची पातळी कमी (डिहायड्रेट - dehydrate) करतात. त्यामुळं तोंडाच्या कोरडेपणाची समस्या वाढते. त्यामुळं चहा आणि कॉफीसारख्या कॅफिनयुक्त पदार्थांचं सेवन मर्यादित ठेवा. तसंच विडी-सिगारेटसारख्या निकोटीनयुक्त पदार्थांचा वापर शक्यतो टाळावा. अन्यथा, तोंडातील कोरडेपणाच्या समस्येपासून मुक्त होणं कठीण होतं. दारूपासून दूर राहा अल्कोहोलचं सेवन करणं किंवा माऊथवॉश म्हणून वापरणंदेखील तोंड कोरडं पडण्याची समस्या वाढवतं. त्यामुळं या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अल्कोहोलचं सेवन करू नका किंवा अल्कोहोलयुक्त माउथवॉश वापरू नका. हे वाचा - फेअरनेस क्रिममध्ये होतोय या घातक घटकाचा अतिवापर; खरेदी करताना तपासा या गोष्टी भरपूर पाणी प्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवण्यासाठी प्रौढ व्यक्तीनं दिवसभरात किमान तीन ते साडेतीन लिटर पाणी प्यावं. शरीरात पाण्याची कमतरता हे तोंड कोरडं होण्याचं प्रमुख कारण असू शकतं. तसंच मिठाचं सेवनही कमी करावं. कारण हे देखील तोंड कोरडे होण्याचे कारण असू शकते. याशिवाय वातावरणातील ओलावा टिकवून ठेवल्यानं या समस्येत मोठा आराम मिळतो. यासाठी तुम्ही रूममध्ये ह्युमिडिफायर (Humidifier) देखील ठेवू शकता. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.