नवी दिल्ली, 11 मार्च : आपली त्वचा (Skin) तजेलदार आणि आकर्षक दिसावी तसंच आपण गोरं दिसावं असं अनेक स्त्रियांना (Women) वाटतं. यासाठी त्या स्त्रिया बाजारातील सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. आता सर्व प्रकारची सौंदर्य प्रसाधनं ई-कॉमर्स वेबसाईट्सवरही उपलब्ध आहेत. ही प्रसाधनं खरेदी करताना त्यात कोणते घटक किती प्रमाणात वापरले आहेत, याविषयीची माहिती फारशी कोणी घेत नाही. या गोष्टीचा गैरफायदा घेत ई-कॉमर्स वेबासाईट्स (E-Commerce Websites) जगभरात हाय मर्क्युरी मिक्स्ड फेअरनेस क्रिमची (High Mercury Mixed Fairness Cream) विक्री करत आहेत. त्यामुळे गोरं दिसण्याच्या नादात तुम्हीही अशा वेबसाईट्सवरून फेअरनेस क्रीम ऑर्डर करत असाल तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण अशा क्रिमचा वापर तुमच्या त्वचेसाठी धोकादायक ठरु शकतो. कारण यापूर्वीदेखील अशा क्रिम्सबाबत दुष्परिणामांविषयी तक्रारी आलेल्या आहेत. याविषयीची माहिती दैनिक भास्कर ने दिली आहे. उत्तम त्वचा आणि गोरेपणासाठी फेअरनेस क्रिमचा (Fairness Cream) वापर वाढला आहे. पण ऑनलाइन म्हणजेच ई-कॉमर्स वेबसाईट्सवर उपलब्ध होणारी फेअरनेस क्रिम तुमच्यासाठी घातक ठरू शकतात. या साईट्सवर हाय मर्क्युरी मिक्स्ड फेअरनेस क्रिमची विक्री होत असल्याचं दिसून आलं आहे. अशा क्रिममुळे दुष्परिणाम होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी आल्यानं मिनामाता कन्व्हेंशन ऑन मर्क्युरी मध्ये (Minamata Convention on Mercury) कॉस्मेटिक्समध्ये पाऱ्याचं प्रमाण किती असावं हे ठरवण्यात आलं होतं. एक किलो सौंदर्यप्रसाधने किंवा क्रिम बनवण्यासाठी जास्तीत जास्त एक मिलीग्रॅम पारा वापरावा. म्हणजेच सौंदर्य प्रसाधनांमध्ये पाऱ्याचा हिस्सा दहा लाखाव्या भागाइतका कमी (PPM) असेल, असं सांगण्यात आलं होतं. तसंच क्रिममधली पाऱ्याची मर्यादा निश्चित करण्यासोबतच या कन्व्हेंशनमध्ये अधिक पारा वापरलेल्या उत्पादनांच्या आयात -निर्यातीवरही बंदी घालण्यात आली होती. फेअरनेस कॉस्मेटिक्सची सध्या जगभरात 8 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 61 हजार कोटी रुपयांची बाजारपेठ (Market) आहे. एका अहवालानुसार, पुढील चार वर्षांत ही बाजारपेठ 11.8 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 90 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. याचाच अर्थ आगामी काळात या बाजारात सुमारे 45 टक्के वाढ होऊ शकते. हे वाचा - आजार कित्येक उपाय फक्त एक; कडुलिंबाच्या पानांचा ज्युस यामुळे ठरतो गुणकारी एकीकडे हे असं चित्र असताना दुसरीकडे फेअरनेस सौंदर्य प्रसाधनांमध्ये पाऱ्याचा अतिवापर ग्राहकांसाठी धोकादायक ठरू शकतो. 2013 मध्ये अनेक देशांनी क्रिममध्ये पाऱ्याचा वापर करण्यास बंदी घातली होती. परंतु, झिरो मर्क्युरी वर्किंग ग्रुपने (Zero Mercury Working Group) अलीकडे केलेल्या तपासणीतून असं आढळून आलं की, सुमारे 47 टक्के स्किन क्रिममध्ये पाऱ्याचं प्रमाण 10 हजार PPM पासून ते 50 हजार PPM पर्यंत आहे. याचाच अर्थ हे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा 10 हजार ते 50 हजार पट जास्त आहे. हे वाचा - डोळ्यांच्या सिंपल मेकअपसाठी फॉलो करा या सोप्या टिप्स; अनेक प्रसंगी येतील कामी या ग्रुपनं आशिया, युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेतल्या 17 देशांमध्ये 40 ई-कॉमर्स वेबसाईट्सच्या माध्यमातून विकल्या जाणाऱ्या 271 प्रकारच्या स्किन फेअरनेस कॉस्मेटिक्स उत्पादनांचे नमुने घेतले. यातील 129 नमुने हे युरोपातील (Europe) 16 देशांमधून घेण्यात आले होते. ज्यात 30 वेबसाईट्सवर पारा जास्त असलेली कॉस्मेटिक्स उत्पादने आढळून आली. 55 हून अधिक देशांतील 110 हून अधिक आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या एनजीओंनी (NGO) ई-कॉमर्स वेबसाईट्सवर विकल्या जाणाऱ्या अशा उत्पादनांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.