नवी दिल्ली, 9 मार्च : सध्या अनेकांचं मानसिक स्वास्थ्य अतिशय कमी असल्याचं चित्र आहे. या धावपळीच्या जगात माणसाला स्वतःसाठी सुद्धा वेळ नाही. अशातच माणसाची चिडचिड होते, मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होतो आणि माणसाचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. सततच्या नकारात्मक विचारांमुळेही माणसाचं मानसिक आरोग्य बिघडत चाललं आहे. बऱ्याचवेळा लोक छोटी-मोठी गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतात, मात्र हीच गोष्ट आरोग्यासाठी फार घातक ठरू शकते. त्यामुळे वेळीच मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
शारीरक थकवा, कामाचा व्याप, आयुष्यात घडणाऱ्या अनेक लहान मोठ्या गोष्टींमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडतं. त्यामुळे सतत आपल्याला डोक जड झाल्यासारखं भासतं अशावेळी एखादी गोळी घेऊन ती परिस्थिती हाताळतो. मात्र प्रत्येकवेळी असं करणं योग्य नाही. आपल्या रोजच्या आयुष्यातील काही लहान-लहान गोष्टींत बदल करून तुम्ही तणावापासून मुक्ती मिळवू शकता आणि आपलं मानसिक स्वास्थ्यही सुधारू शकता.
सकाळी हेल्दी नाष्टा करा-
बऱ्याच वेळा ऑफिस किंवा कॉलेजच्या वेळेत पोहचण्यासाठी सकाळी घरातून नाष्टा न करताच अनेक जण बाहेर पडतात. त्यानंतर वेळ मिळेल तसं बाहेरून पदार्थ घेऊन खाल्ले जातात. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे सर्वात आधी घरातून नाष्टा करूनच बाहेर पडा आणि बाहेरचं खाण टाळां.
विविध उपक्रमात सहभाग घ्या-
अनेकदा अभ्यास, कामं ही कारण पुढे करून विविध उपक्रमात भाग घेणं टाळलं जातं. वेळ नाही असं म्हणण्याऐवजी, आहे त्या वेळेतून वेळ काढून ऑफिस, कॉलनी किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या योगा, नृत्य, मेडीटेशन अशा विविध उपक्रमांत आपला सहभाग नोंदवा. त्यामुळे तणाव दूर होईल आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होईल.
मित्रांशी किंवा नातेवाईकांशी गप्पा मारा-
बऱ्याचवेळा एखादी गोष्ट डोक्यात असते. त्या गोष्टीचा सतत विचार करून मानसिक आजाराला निमंत्रणचं दिलं जातं. त्यामुळे जी गोष्ट तुम्हाला मानसिकरित्या त्रास देत असते, ती एखाद्या जवळच्या मित्राशी किंवा जवळच्या व्यक्तीशी शेअर करा. त्यामुळे मानसिक तणाव कमी होतो. तुम्हाला जी गोष्ट त्रास देते ती गोष्ट जवळच्या व्यक्तीला सांगून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे विचारांचं ओझं कमी होईल आणि मानसिक स्वास्थ्यसुद्धा काही प्रमाणात राखलं जाईल.
(वाचा : केळीला का म्हटलं जातं Happy Food? जाणून घ्या केळीचा इतिहास, फायदे आणि बरंच काही )
खाजगी आणि प्रोफेशनल आयुष्यात संतुलन राखा -
अनेकदा असं होतं की आपलं खाजगी आणि प्रोफेशनल आयुष्य एकत्र करतो आणि मानसिक स्वास्थ्य बिघडवून घेतलं जातं. मात्र नेहमी कौटुंबिक गोष्टी या घरातच ठेवा आणि ऑफिसच्या कामाचा व्याप ऑफिसमध्येच ठेवा. असं केल्याने तुमचा निम्मा तणाव दूर होतो.
कामाच्या जागेची सजावट -
अनेकदा जागेवरसुद्धा आपला मूड बदलू शकतो. आपण काम करणाऱ्या जागेची किवा त्या डेस्कची थोडीशी सजावट केली, तर मनामध्ये सकारात्मक बदल होतात आणि मूडसुद्धा चांगला होतो. त्यामुळे अतिरिक्त तणाव येत नाही आणि मानसिक स्वास्थ्यसुद्धा बिघडत नाही.
नकारात्मकता दूर ठेवा-
काही लोकांपासून किंवा एखाद्या जागेपासून आपल्याला नकारात्मकता जाणवत असते. अशा व्यक्ती किंवा जागेपासून स्वतःला दूर ठेवा आणि आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवा.