मुंबई, 08 फेब्रुवारी: निरोगी राहण्यासाठी तोंडाच्या स्वच्छतेची (Mouth cleaning) काळजी घेणंदेखील खूप महत्वाचं (Health Care) आहे. तोंडाची स्वच्छता ही तोंड, दात स्वच्छ ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. विविध आजारांपासून दूर राहण्यासाठीतोंडाची, दातांची स्वच्छता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ही स्वच्छता कशी ठेवावी, याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तोंडाची स्वच्छता हा प्रत्येकाच्या दैनंदिन दिनचर्येचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात, ज्यामध्ये जीभ, दात आणि तोंडातील घाण काढून टाकली जाते. डॉक्टरांच्या मते, सकाळची दिनचर्या तुम्हाला काही गंभीर आजारांपासून वाचवू शकते. त्यामुळे सकाळी तोंड स्वच्छ करणं आणि त्याची योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मौखिक आरोग्य (Oral health) चांगलं राहण्यासाठी, ओरल केअर रुटीनला प्राधान्य द्यावं. नियमित ओरल केअर चेकअप करण्यासाठी डेंटिस्टला भेट द्यावी. तसंच तोंडाचं आरोग्य चांगलं राहावं, यासाठी दिवसातून दोनदा 2 मिनिटं ब्रश करा. तसंच दर 3 महिन्यांनी ब्रश बदला, कारण तो खराब होतो. दात स्वच्छ करण्यासाठी, फ्लॉसिंग करणं आवश्यक आहे. हे वाचा- सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय असलेली खडीसाखरेविषयी हे माहीत आहे का? ‘आस्क द डेंटिस्ट’ नावाचं चॅनल चालवणारे डॉ. मार्क बुर्हेन (Dr. Mark Burhenne) सांगतात की, ‘तुमचं तोंड हेल्दी नसेल, तर तुम्हीही निरोगी राहू शकत नाही’. त्यामुळेच फ्लॉसिंग (Flossing) हा बहुतेक लोकांच्या दैनंदिन दिनक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. फ्लॉसिंगमुळे दात स्वच्छ तर राहतातच, पण काही जीवघेण्या आजारांपासून संरक्षण मिळू शकतं. त्यांच्या मते, फ्लॉसिंगची अशी काही कारणं आहेत, जी दातांव्यतिरिक्त शरीराच्या तंदुरुस्तीसाठीही खूप फायदेशीर आहेत. जाणून घ्या फ्लॉसिंगचे फायदे - डॉ. मार्क बुर्हेन म्हणाले की, संशोधनातून असं दिसून आलं आहे की, ज्या लोकांची ओरल हेल्थ चांगली आहे, त्यांच्या तुलनेत ज्या लोकांची ओरल हेल्थ खराब आहे, हिरड्यांचे आजार किंवा दात खराब आहेत, त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. -फ्लॉसिंग सूज आणि सी-रिअॅक्शन प्रोटिन कमी करतं, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हे वाचा- निरसं दूध खरंच चेहऱ्यावर असा जादूई परिणाम करतं का? जाणून घ्या सत्य -ब्रिटिश डेंटल फाउंडेशनचे प्रमुख डॉ. निगेल कार्टर यांच्या मते, जर एखाद्याच्या तोंडात सूज आलेली असेल तर त्याच्या शरीराच्या इतर अवयवांवर कुठेतरी सूज आलेली असू शकते. तोंड मध्यस्थ म्हणून कार्य करते, आणि मोठ्या प्रमाणात रसायनांचा प्रवाह वाढवू शकतं. -ब्रिस्टल विद्यापीठातील तज्ज्ञांनी 2008 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, जर बॅक्टेरियांनी हिरड्यांमधून रक्तात प्रवेश केला, तर ते प्लेटलेट्ससह एकत्रित होऊन रक्ताच्या गुठळ्या तयार करू शकतात. जर या रक्ताच्या गुठळ्या रक्तापर्यंत पोहोचल्या तर निरोगी लोकांमध्ये सुद्धा हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. - स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये प्रजनन क्षमता वाढवण्याचे काम फ्लॉसिंग करते. 2011 मध्ये, स्वीडनमधील तज्ज्ञांना असं आढळून आलं की, हिरड्यांचा आजार नसलेल्या स्त्रियांपेक्षा हिरड्यांचा आजार असलेल्या महिलांमध्ये गर्भधारणेसंबंधी समस्या अधिक होत्या. फ्लॉसिंग म्हणजे काय ? फ्लॉसिंग ही दात खोलवर स्वच्छ करण्याची एक पद्धत आहे. जेवण करताना, एखादा पदार्थ खाताना दातांमध्ये अन्नाचे कण अडकतात. त्यामुळे तोंडात अनेक बॅक्टेरिया तयार होतात. दातांमध्ये अडकलेली घाण आणि अन्न काढून टाकण्यासाठी, दात पातळ धाग्याने स्वच्छ केले जातात, या पद्धतीला फ्लॉसिंग म्हणतात. स्मृतिभ्रंश, हृदयरोग आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होणं या समस्या कमी करण्यासोबतच प्रजनन क्षमता वाढण्यास फ्लॉसिंगमुळे मदत होते. 2019 च्या संशोधनानुसार, तोंडात असलेले बॅक्टेरिया तोंडात आणखी हानिकारक बॅक्टेरिया तयार करतात, जे मेंदूपर्यंत जाऊ शकतात, ज्यामुळे स्मृतिभ्रंश होऊ शकतो. तर, हृदयविकारापासून दूर राहण्यासाठी तोंडाचं आरोग्य चांगलं असणं अत्यंत आवश्यक असल्याचं हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. माणूस आपल्या कामात कितीही व्यस्त असला तरी तो स्वतःच्या तोंडाच्या स्वच्छतेची, दातांची काळजी सहज घेऊ शकतो. त्यासाठी अगदी वेगळा वेळ काढावा असं काही नाही. दातांमध्ये जेवणाचे कण अडकू न देणं, सकाळी आणि रात्री नियमित दात घासणं, असे उपाय तो सहज करू शकतो. त्यामुळे नक्कीच फायदा होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.