मुंबई, 21 नोव्हेंबर : मद्यपान करणं आरोग्यासाठी घातक मानलं जातं. मद्यपानामुळे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका असतो; पण कोणे एके काळी मद्याचा वापर उत्तम औषध म्हणून केला जायचा. अनेक आजारांवर उपचार म्हणून अल्कोहोलचा वापर केला जात होता. पोटदुखी, बद्धकोष्ठता, इतकंच नाही, तर फ्लू आणि मलेरिया यांसारख्या महामारीत मद्य हे महत्त्वपूर्ण औषध ठरलं; पण हे औषध नाही तर दारू आहे, असं लक्षात येऊ लागलं आणि मग संपूर्ण जग दारूच्या व्यसनात अडकत गेलं. मद्याचा वापर औषधोपचार म्हणून नेमका केव्हा केला गेला हे जाणून घेणं आवश्यक आहे.
डब्लूएचओच्या अहवालानुसार, दर वर्षी जगभरात मद्यपानामुळे 30 लाखांहून अधिक मृत्यू होतात. मद्यामुळे होणारे आजार आणि रस्ते अपघातांचा यात समावेश आहे. पूर्वीच्या काळी मद्याचा वापर औषधोपचार म्हणून केला जाई. कालपरत्वे ही दारू असल्याचं लक्षात आलं; पण तोपर्यंत जगभरातले अनेक जण दारूच्या व्यसनाधीन झाले होते.
औषध म्हणून अल्कोहोल वापरण्याची सर्वांत जुनी उदाहरणं प्राचीन इजिप्त आणि चीनमध्ये आढळतात. टेलिग्राफच्या एका वृत्तानुसार, प्राचीन इजिप्शियन लोक अल्कोहोलमध्ये औषधी गुणधर्म यावेत, यासाठी विविध प्रकारच्या औषधी वनस्पती मिसळत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ख्रिस्तपूर्व 3100 वर्षांपूर्वी हे घडत होतं. ख्रिस्तपूर्व 460 ते 370 या काळात प्रसिद्ध ग्रीक युनानी अभ्यासक हिप्पोक्रेटिस यांनी लिहिलं आहे, की वाइन हा मानवजातीसाठी, निरोगी शरीरासाठी आणि आजारी माणसासाठी योग्य उतारा आहे. जगभरातले अॅलोपॅथी डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात उतरण्यापूर्वी ज्यांच्या नावे शपथ घेतात, ती हिप्पोक्रेटिक ओथ म्हणून प्रसिद्ध आहे. प्राचीन काळी औषधी वनस्पतींपासून मिळणारं अल्कोहोल दमा, खोकला, बद्धकोष्ठता, कावीळ आदी आजारांवर उपचारांसाठी वापरलं जात होतं.
हेही वाचा - डायबेटिस टाइप -1 आता तीन वर्षांसाठी रोखता येणार; औषधाला मंजुरी
आजही अनेक वडीलधाऱ्या व्यक्ती सर्दी आणि कफावर उपचारांसाठी ब्रॅंडीचे काही घोट घेण्याचा सल्ला देतात. हा उपाय गेल्या कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीस कार्डिअॅक स्टिम्युलंट म्हणून ब्रॅंडीचा वापर केला जात होता. अंटार्क्टिकाच्या साहसी मोहिमांदरम्यान ब्रॅंडीचा वापर औषध म्हणून केला जात असे. 1960च्या दशकात ब्रॅंडी हे भुलीचं औषध म्हणून वापरलं जात होतं.
1918च्या सुमारास भारतासह जगभरातले अनेक देश स्पॅनिश फ्लू महामारीच्या विळख्यात सापडले होते. या आजारामुळे 5 कोटींहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. हा असा काळ होता, जेव्हा कोणत्याही प्रकारची अँटिबायोटिक्स किंवा प्रभावी औषधं उपलब्ध नव्हती. त्या काळी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्ण असे सर्व जण या महामारीचा सामना करण्यासाठी व्हिस्की प्यायले होते. त्या काळी शास्त्रज्ञ आणि डॉक्टर रुग्णांना व्हिस्की घेण्याचा सल्ला देत होते. यामुळे रुग्णांना अस्वस्थतेपासून तात्पुरता दिलासा मिळत असे.
हेही वाचा - हिवाळ्यात श्वसनाचा आजार टाळायचाय? मग फॉलो करा 'या' टिप्स
17व्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारत काबीज करण्यासाठी आली तेव्हा येथे मलेरियासारखा आजार पसरला होता. यावर क्विनाइन हे औषध शोधलं गेलं होतं. क्विनाइन हे एक रसायन असून, ते टॉनिक वॉटरला चव देण्यासाठी वापरलं जात असे. ते चवीला खूप कडू असते. त्यामुळे हे औषध घेणं इंग्रजांना नकोसं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी या औषधाऐवजी टॉनिक वॉटर घेण्यास सुरुवात केली. हळूहळू हे कॉकटेल इंग्रजांसाठी हेल्दी ड्रिंक बनलं. यामुळे ब्रिटिश सैनिकांचे प्राण वाचले. जीन आणि टॉनिकने ब्रिटिश साम्राज्यातल्या डॉक्टरांच्या तुलनेत सर्वाधिक इंग्रजांचे प्राण वाचवले, असं ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी एकदा म्हटलं होतं.
अॅबसिंथ हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे. ते जास्त प्रमाणात घेतल्यास एखाद्या व्यक्तीला हॅंगओव्हर येऊ शकतो; मात्र एके काळी त्याचा वापर पोटातले जंत मारण्यासाठी केला जात असे. हिप्पोक्रेटिसने मासिक पाळीच्या वेदना, कावीळ आणि अॅनेमिया आदींवर उपचार म्हणून याचा वापर सुचविला होता. 19व्या शतकात जेव्हा हजारो फ्रेंच सैनिक उत्तर आफ्रिकेत पोहोचले, तेव्हा त्यांनी अॅबसिंथ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वॉर्मवुडचा ताप, मलेरिया आणि अतिसार आदींवर औषध म्हणून वापर केला. जेव्हा हे सैनिक परतले तेव्हा संपूर्ण फ्रान्स या हिरव्या रंगाच्या मद्यासाठी वेडा झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.