अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 10 जून: जून महिना सुरू झाला तरीही वर्ध्यातील वातावरणात प्रचंड उकाडा आहे. त्यामुळे वर्ध्यातील गोरस भांडारच्या ताकाची मागणी देखील वाढताना दिसून येत आहे. महात्मा गांधी यांनी गोरस भांडारची स्थापना 1939 साली केली. 1961 पासून हे भांडार सहकारी तत्वावर सुरू आहे. या ठिकाणी शुद्ध गायीच्या दुधापासून बनलेल्या सर्वच वस्तूंची विक्री केली जाते. वाढत्या उकाड्यामुळे गोरस भांडार मध्ये ग्राहक आणि वर्ध्यातील ताकाचे किरकोळ विक्रेतेही खरेदीसाठी रांगा लावताना दिसून येत आहेत. दूध विक्री प्रथम स्थानी गोरस भांडारा येथे विविध दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जाते. प्रथमतः मोठ्या प्रमाणात दूध विक्री केले जाते. महात्मा गांधींच्या काळापासून गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेल्या सर्वच पदार्थांची विक्री येथे होते. रोज विक्री केले गेलेल्या दुधातून उरलेले दूध ताक बनवण्यासाठी वापरले जाते.
ताक कसे बनते? विक्री झालेले दूध उरले असल्यास सुरुवातीला दूध तापवले जाते. त्यानंतर एका स्वच्छ भांड्यात विरजण लावून दही बनण्यासाठी ठेवले जाते. दही बनल्यानंतर मोठ्या भांड्यात मशीनच्या साह्याने घुसळले जाते. या प्रक्रियेत लोणी आणि ताक वेगळे होते. ताक विक्री केली जाते तर लोण्याचा तूप बनविण्याकरिता वापर केला जातो. लोणीही या ठिकाणी विक्री केली जाते. सणासुदीच्या दिवशी ताक खरेदीसाठी प्रचंड गर्दी दिसून येते. सध्या 16 रुपये प्रति लिटर प्रमाणे ताकाची विक्री केली जात आहे. ताक बनवण्याच्या प्रक्रिया करीता 4 ते5 व्यक्ती काम करतात. काय आहे गोरस भांडार महात्मा गांधी, जमनालाल बजाज आणि विनोबा भावे यांच्या संकल्पनेतून गाईचा प्रचार, प्रसार, गाईचे संवर्धन याशिवाय शेतकऱ्यांना खत व उत्तम बैल मिळावे याकरिता गोसंवर्धन गोरस भांडारची निर्मिती 1939 साली झाली. सुरवातीला 200 ते 300 लिटर दुधाचे संकलन होऊन विक्री व्हायची. त्याचवेळी अखिल भारत गो-सेवा संघाचा एक भाग म्हणून अखिल भारत गो-सेवा संघ द्वारा संचालित गोसंवर्धन गोरस भांडार या नावाने चालू होते. 1961 साली (12-10-1961) सहकारी तत्वावर नोंदणी करून वर्धा तहसील गो- दुग्ध उत्पादक सहकारी संघ मर्या., गो- संवर्धन गोरस भांडार र. न. डी 755 या नावाने कार्यरत झाले. कोणाकडूनही अर्थ सहाय्य नसताना ना नफा ना तोटा या तत्वावर हे केंद्र कार्यरत आहे. हे केंद्र यशस्वी वाटचाल करत असून आज 84 वर्षांचा कालावधी झाला आहे. महात्मा गांधींच्या ‘आखरी निवास’चं होणार जतन, पाहा कसं सुरूय काम, Video नागरिकांचा चांगला प्रतिसाद या संघाला निव्वळ गाईच्या 15 प्राथमिक संकलन संस्था संलग्न आहेत. त्या सातत्याने संघाला दुधाचा पुरवठा करतात. संघ दुध संकलना बरोबरच दुध विक्री करणे, दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन (खवा, बासुंदी, पेढा, श्रीखंड, पनीर, तूप, गोरसपाक) करून विक्री करीत आहे. संघाच्या उत्पादित मालास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. 84 वर्षानंतरही मागणी कायम वातावरणात वाढलेला कमालीचा उकाडा शीतपयांकडे धाव घेण्यास भाग पाडत आहे. ताक शरीरातील दाह कमी करण्यास मदत करते. तसेच ताकाचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. सोबतच गोरस भांडारच्या शुद्धतेवर नागरिकांचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे ताकाची मागणी ही असतेच. महात्मा गांधींच्या काळापासून सुरू झालेल्या या गो संवर्धन गोरस भंडारच्या वस्तूंना 84 वर्षांनंतर आजही मागणी कायम आहे.