वर्धा, 15 जुलै: अंबाडीची भाजी आपल्या सर्वांच्या परिचित असेल. चवीला आंबट अशी ही भाजी रानभाजी म्हणून प्रसिद्ध आहे. विदर्भात नागरिक मोठ्या संख्येने या भाजीला पसंती देतात. भाजीच नाही तर या भाजीपासून बनलेल्या भाकरी देखील मोठ्या चवीने खातात. विशेषतः पावसाळ्यामध्ये ही भाजी येते. त्यामुळे वर्धा जिल्ह्यासह विदर्भाच्या ग्रामीण भागातील महिला स्वतः शेतात जाऊन ही भाजी तोडून आणणं पसंत करतात. विदर्भात अंबाडी भाजीचे विविध पदार्थ पावसाळ्यामध्ये अंबाडीच्या भाजीची आंबट चव अनेकांना आवडते. विदर्भामध्ये जुन्या काळापासून अंबाडीच्या भाजीपासून भाजी भाकरी, चटणी, पराठे अशा प्रकारचे पदार्थ बनवून खाल्ले जातात. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत देखील हेल्दी आणि चविष्ट अशी ही भाजी आवडीची आहे.
अंबाडीची भाकरी बनवण्यासाठी साहित्य अंबाडीची भाकरी बनवण्यासाठी केवळ तीन साहित्याची आवश्यकता आहे. अंबाडीच्या भाजीचे पाने, ज्वारीचे पीठ आणि चवीनुसार मीठ या साहित्यावरच अंबाडीची भाकरी केली जाते. कशी बनवतात अंबाडीची भाकरी? अंबाडीची पाने तोडून स्वच्छ धुऊन घ्यायची. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचं. पाण्याला उकळी आली की त्यात अंबाडीची पानं आणि एक चमचा मीठ घालून ते चांगलं उकळून घ्यायचं. किंवा याव्यतिरिक्त सोयीनुसार तुम्ही भाजी कुकर मधूनही शिजवून घेऊ शकता. शिजवून घेतल्यानंतर त्यातलं पाणी थोडं काढून घ्यायचं. एका परातीत या शिजवलेल्या भाजीमध्ये ज्वारीचं पीठ ऍड करायचं. तुम्ही बाजरीचं पीठ देखील वापरू शकता. त्यात मीठ ऍड करून चांगलं मळून घ्या. आता त्याचे गोळे करून त्याची भाकरी थापायची. ती तव्यावर घालून वरच्या भागाला थोडा पाण्याचा हात लावा आणि दोन्ही बाजूने शेकून शेवटी गॅसवर चांगली शेकून घ्या. आपल्याला हवी तशी कुरकुरीतही शेकू शकता. Local Food: ‘मौसम मस्ताना..’ मसाला शेंगदाणे असताना! घरीच बनवण्याची सोपी रेसिपी खास चवीसाठी हे करा अंबाडीची भाकरी थोडी चवीला आंबट असते. त्यात आपण लाल मिरची आणि लसूणचा ठेचा ऍड केला तर त्याने ही भाकरी चटपटीत होईल. आता ही भाकरी तुम्ही अशीच कांदा आणि ठेचा बरोबर किंवा वांग्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता. अंबाडी भाजीची भाकरी बनवण्याची रेसिपी खूप सोपी असून तुम्हीही घरात नक्की ट्राय करू शकता.