वर्धा, 5 जुलै: असं म्हणतात की तुमच्या हातातील कला, मनातील सकारात्मकता आणि तुमची जिद्द, चिकाटी तुम्हाला कधी उपाशी ठेवत नाही. याचाच प्रत्यय वर्ध्यातील कुक राजू बावणे यांना आला आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय बंद झाला आणि नोकरी गेली. तेव्हा त्यांना कलेनं सावरलं. ते गावी आले आणि बटाटा वडा विकण्यास सुरुवात केली. त्यांच्या हातची चव अनेकांना आवडली. आता बावणे यांनी मुंबईला परतण्याचा विचारच सोडला आहे. कोरोना काळात गेली नोकरी वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे 46 वर्षीय राजू बावणे यांचं गाव आहे. राजू यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून मुंबईत हॉटेलमध्ये नोकरी केली. त्याच काळात कोरोनाच्या महाभयंकर काळात लॉकडाऊन लागलं आणि राजू यांना आपल्या स्वगावी परतावं लागलं. त्या काळात आईलाही कॅन्सर आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक समस्या समोर होत्या. या काळात काय करावं सुचत नव्हतं. तेव्हा आपल्या कलेच्या जीवावर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. नागपूर वर्धा रोडवर खडकी येथे बटाटा वडा विकण्यास सुरुवात केली. या बटाटा वड्याची चव अनेकांना आवडू लागली. त्यामुळे त्यांचा वडा खाण्यासाठी लोकांची गर्दी वाढू लागली.
व्यवसायाने सांभाळली परिस्थिती कोरोना काळाने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तशीच काहीशी परिस्थिती बावणे कुटुंबीयांवर होती. आईला कॅन्सर होता कोरोनानेही ग्रासलं. त्यानंतर आईचं निधन झालं. मात्र आईने दिलेला व्यवसायाचा सल्ला त्यांनी लक्षात ठेवला आणि काम सुरू केलं. त्यांनी या परिस्थितीतून सावरत आपल्या हॉटेल मॅनेजमेंटच्या कलेला वाव दिला. नवी सुरुवात केली आणि परिसरातील ग्रामीण महिलांच्या हाताला काम दिलं. आता त्यांच्या दुकानातील बटाटावडा आणि डोसा यांना चांगली मागणी आहे. तसेच त्यांनी आता मुंबईला परतण्याचा विचारच मनातून काढून टाकला आहे. आलू बोंडा खाल्लात काय? पाहा वर्ध्यातील फेमस रेसिपी बनते कशी? पतीचे निधन झालेल्या महिलेचं सावरलं कुटुंब विशेष म्हणजे राजू यांनी लॉकडाऊनमध्ये कामाला ठेवलेल्या महिला या अत्यंत गरजू होत्या. त्या महिलांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे बटाटेवडे आणि डोसा तसेच इतर पदार्थांचं ट्रेनिंग दिलं. महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने कार्य सुरू केलं. महिलांनीही राजू यांच्या व्यवसायाला चांगली साथ दिलीय. त्यामुळे त्यांना समाधानकारक पगारासह हॉटेलमध्ये काम मिळालं. महिलांना त्यांच्या गरजेनुसार दर आठवड्यालाच पगार दिला जातो. आता या महिला स्वतःच्या पायावर उभे राहून कोरोना काळात उध्वस्त झालेलं आपलं कुटुंब सावरत आहेत.