साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर 10 एप्रिल : चैत्र महिन्यातील गौरीच्या नवरात्रीसाठी वेगवेगळे पदार्थ केले जातात. या महिन्यात आंबे डाळ हा एक खास पदार्थ घरोघरी केला जातो. या पदार्थाला काही ठिकाणी कैरी डाळ किंवा वाटली डाळ असंही म्हणतात. हा एक पारंपारिक पदार्थ आहे. या पदार्थाची चव लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या जिभेवर रेंगाळते. उन्हाळ्याच्या दिवसात घरोघरी आंबेडाळ बनवली जाते. कोल्हापूरच्या गृहिणी जयश्री टिकारे यांनी या खास पदार्थाची रेसिपी सांगितली आहे. उन्हाळा वाढू लागला की बाजारपेठेत कैऱ्या विक्रीला येऊ लागतात. या कच्च्या कैरी पासून बनवण्यात येणारे कैरीचे लोणचे, कैरीचं पन्हं असे पदार्थ आवडीने बनवले आणि खाल्ले देखील जातात. त्यातीलच एक कैरी वापरून आंबेडाळ बनवण्यात येते. प्रत्येक सण हा काहीतरी वैज्ञानिक कारण घेऊनच त्याच्यासोबत परंपरा घेऊन येतो. अशाच प्रकारे या आंबे डाळीच्या माध्यमातून या दिवसात गरजेचे असणारे प्रोटीन आणि इतर घटक आपल्या शरीराला मिळत असतात. त्यामुळे या दिवसात ही आंबेडाळ मोठ्या आवडीने खाल्ली जाते. ही आंबेडाळ घरच्या घरी बनवणे देखील अगदी सोपे आहे.
कोणते साहित्य हवे? आंबेडाळ बनवण्यासाठी 1 कैरी (किसून किंवा बारीक चिरून), 3/4 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 चमचा जिरे, 1 चमचा जिरे, गुळाचा खडा, मीठ, 3/4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, हिंग, कडीपत्ता हे साहित्य लागते. आंबेडाळ करण्याची पद्धत 1. हरभऱ्याची डाळ दोन ते तीन तास भिजत ठेवा.2. एक कैरी किसून/बारीक चिरून घ्या.3. आता कैरीतील सर्व पाणी काढून घ्या.4. मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीच्या फोडी, हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ, जिरे, गुळाचा खडा, थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला दरदरीत वाटून घ्या.5. हे मिश्रण जास्त बारीक सुद्धा वाटून घेऊ नये आणि जास्त मोठ देखील ठेवू नये.6. जर कैरी किसून घेणार असाल, तर मिक्सरमध्ये थोडीशी कैरी वापरून नंतर वाटलेल्या डाळीच्या तयार मिश्रणातही किसलेली कैरी एकजीव करून घ्यावे.7. साधारणतः अशी ही आंबेडाळ तयार झाली आहे. बरेच जण यापुढेही जाऊन फोडणीचा वापर करतात.8. छोट्या कढईमध्ये तेलाची फोडणी करावी. तेलात मोहरी टाकून तडतडल्यावर जिरे, हिंग, हळद आणि कढीपत्ता घालावा. कढीपत्ता जळला नाही पाहिजे.9. फोडणी थंड करत ठेवावी. थंड झाल्यानंतर डाळकैरीच्या मिश्रणावर ओतून पूर्ण मिक्स करावी. फणसाची चवदार भाजी कशी करतात हे माहिती आहे? पाहा घरीच करण्याची सोपी पद्धत, Video अशी ही साधी सोपी पाककृती असणारी आंबेडाळ लहान मुलांना खूप आवडते. ही डाळ फ्रिजमध्ये काही दिवस ठेवून जेवताना लोणच्या ताटाला लावून किंवा लहान मुलांना चपाती किंवा ब्रेडला लावून देखील खायला देता येते. ही आंबेडाळ महाराष्ट्रात जशी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते तशी ती बनवण्याची पद्धत देखील थोडीफार वेगळी असू शकते, असे देखील जयश्री टिकारे यांनी सांगितले आहेत.