अहमदनगर, 26 जून: प्रत्येक शहराची खास अशी खाद्य संस्कृती असते आणि शहरात काही फेमस खाद्यपदार्थ मिळतात. अहमदनगरमधील अकोला शहरात पंतांचे वडे, डोसे प्रसिद्ध आहेत. पदवीधर असणाऱ्या दत्तात्रय महाले यांनी 11 वर्षांपूर्वी वडापाव विक्री सुरू केली. व्यवसायात पत्तीचीही साथ मिळाली आणि आता पंतांचे वडे, डोसे खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी होत असते. आता सामान्य वडापाव विक्रेता ते व्यावसायिक असा महाले दाम्पत्याचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. असा सुरू झाला व्यवसाय अकोल्यातील दत्तात्रय महाले यांनी पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना एका 10 बाय 12 च्या खोलीत 11 वर्षांपूर्वी त्यांनी वडापाव विक्री सुरू केली. महाले यांच्या वडापावला खवय्यांची चांगली पसंती मिळू लागली. ग्राहकांची मागणी आणि पत्नीची साथ यांमुळे वड्यासोबत डोसा, उत्तप्पाही बनवायला सुरुवात केली. या पदार्थांनाही चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने त्यांना मोठ्या जागी व्यवसाय सुरू करावा लागला.
व्यवसायात चढ-उतार कुठलीही व्यवसायिक पार्श्वभूमी नसल्यामुळे दत्तात्रय महाले यांना व्यवसायात सुरुवातीला खूप चढ-उतार पहावे लागले. मात्र डगमगून न जाता त्यांनी आपल्या पदार्थांची चव अबाधित ठेवली व ग्राहकांची सेवा करू लागले. पहिल्यांदा निव्वळ तालुक्यात प्रसिद्ध असणारा वडापाव, डोसा व उत्तप्पा हळूहळू ग्रामीण भागात तसेच शेजारील तालुक्यांमध्ये नावलौकिक मिळवू लागला. फक्त महाले यांच्या या पदार्थांची चव चाखण्यासाठी जिल्हाभरातून खवय्ये त्यांच्या दुकानाला भेट देऊ लागले. पदार्थांची प्रशंसा करू लागले. सुजाता महाले यशस्वी उद्योजिका कौटुंबिक पार्श्वभूमी शेती असताना मनात व्यवसायाबद्दल असणाऱ्या ओढीमुळे दत्तात्रय व सुजाता महाले एका छोट्याशा खेडेगावातून व्यवसायासाठी तालुक्याच्या ठिकाणी आले. सुरुवातीला पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्याने त्यांनी एका अल्पशा जागेतून व्यवसायाला सुरुवात केली. सातत्य, जिद्द, चिकाटी व चव या गोष्टींचा मीलाप झाल्यामुळे आज महाले यांचे नाव नामांकित वडापाव, डोसे व उत्तप्पा विक्रेत्यांमध्ये घेतले जाते. महाले यांच्या व्यवसायाची कमी कालावधीत झालेली भरभराट लक्षात घेता अकोले तालुक्याच्या यशस्वी उद्योजिका म्हणून सुजाता महाले यांना गौरविण्यात आले. आता बोला! आला चॅाकलेट ब्राउनी मोमो, पण व्हेज आहे की नॅान व्हेज? 11 जणांना दिला रोजगार ग्रामीण भागातील ग्राहकांना परवडणारी किंमत तसेच आवडणारी चव आणि विक्रेत्यांमध्ये असणारी आपुलकी यामुळे पंतांचे वडे, डोसे खाण्यासाठी खवय्यांची पाऊले आपसुकच वळतता. आता महाले यांनी तब्बल 11 जणांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कुठलीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते यशस्वी व्यवसायिक बनण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास निश्चितच युवा व्यवसायिकांसाठी प्रेरणादायक ठरू शकतो.